आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने ‘राम ध्यान शिबिराचे आयोजन’
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने ‘राम ध्यान शिबिराचे आयोजन’
अमृता खाकुर्डीकर, पुणे
पुणे दि.24 सप्टे(प्रतिनिधी) “आर्ट ऑफ लिव्हिंग” या आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या योग व ध्यानधारणा संस्थेच्या वतीने ” हर घर ध्यान ” या उपक्रमा अंतर्गत तीन दिवसीय “राम ध्यान शिबिर” या उपक्रमाचे “भारती निवास” सोसायटीत खास आयोजन करण्यात आले होते.
गेली १० वर्षे आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक म्हणून काम करणारे आर्कीटेक्ट श्री. मानस मराठे यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली योगसाधक पूजा दांडेकर यांच्या प्रात्यक्षिकासह या शिबीरात सूक्ष्म व्यायाम,अनुलोम विलोम,भ्रामरी व भस्रिका हे प्राणायाम शास्त्रशुध्द पध्दतीने शिकवण्यात आले. त्यानंतर रामनामाच्या उच्चारासह “राम ध्यान” असे विशेष ध्यानसत्र घेण्यात आले. गुरूदेव श्रीश्री रविशंकर यांच्या शांत, धीरगंभीर स्वरातील सूचनांनुसार श्वसनाकडे पूर्ण लक्ष केंद्रीत करून डोळे मिटून केलेल्या २० मिनिटांच्या या ध्यानात प्रगाढ शांतता आणि भूत, भविष्य विसरून फक्त वर्तमानात राहण्याचा अदभूत अनुभव सहभागी झालेल्या साधकांनी यावेळी घेतला.
प्राणायाम, ध्यानध्यारणा याबरोबरच योग्य आहार आणि नियमित व्यायाम याचे आरोग्याच्या दृष्टीने असलेले महत्व मानस मराठे यांनी आपल्या व्याख्यानातून विषद केले. भोवतालचे वातावरण आनंदी असेल तर त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर कसा चांगल्या पध्दतीने होतो, हे त्यांनी उपस्थितांना सोदाहरण समजावून सांगितले.
माधुरी सहस्त्रबुध्दे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.हृषिकेश दांडेकर आणि सौ. पूजा दांडेकर यांनी या शिबीर आयोजनाची संकल्पना मांडली. भारती निवास सोसायटीच्या हाॅलमध्ये झालेल्या या शिबिरात शंभरहून अधिक स्त्री- पुरूष सहभागी झाले होते.





