मामाचे गाव
‘मामाचे गाव ‘ म्हणजे आपले आजोळ, आपल्या मनातील एक सुंदर कप्पा. या कप्प्यातील बालपणीच्या रम्य आठवणींचा ठेवा आयुष्यभर पुरुन उरणारा! उन्हाळ्याची किंवा दिवाळीची सुट्टी आणि मामाचे गाव म्हणजे आपल्या आयुष्यात अनुभवलेले दुग्धशर्करा योगच जणू! सुट्टीची चाहूल लागताच, आजी- आजोबांच्या प्रेमाचा मधाळ गोडवा चाखायला, मन गावाच्या दिशेने पळायला लागते . सासुरवाशिणीने माहेराची वाट पहावी तितक्याच अधिरतेने बालपणी मामाच्या गावी जाण्याची ओढ वाटे.
माझ्या मामाचे गाव म्हणजे, वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील ‘मांडगाव’ हे मोठे खेडेगाव. सांप्रत जाण्या-येण्यासाठी सोयीचा रस्ता , वाहनांची रेलचेल असलेले गाव. परंतु , माझे वडील माझ्या जन्माच्या वेळी रात्री वर्ध्याहून सायकलने मांडगावला पोहोचले होते, यावरून तेव्हाच्या परिस्थितीचा अंदाज सहजच बांधता येतो. जन्मानंतर माझा पहिला प्रवास शेडगावच्या नदीतून नावेतून झाल्याची आठवण आई नेहमीच सांगते. उन्हाळ्याच्या सुट्टीत येणारा माझा वाढदिवस तिथे किती कौतुकाने साजरा झाला अनेकदा ! एकदा वाढदिवसानिमित्त नवे कपडे घेण्यासाठी हिंगणघाटला गेलो होतो .परतीच्या वेळी बराच उशीर झाला. अंधार दाटला आणि वाहने अंधारात गुडूप झाली. त्यावेळी शेडगाव पाटीवरून पायी चालत मांडगाव गाठल्याच्या आठवणीचे ठसे स्मृतीपटलावर कायमचे कोंदले गेले आहेत.
परतीच्या प्रवासात बस स्टाॕपवर मोठ्या चिंचेच्या सावली खाली बसची वाट बघताना, उन्हं कधी जाणवलं नाही. चिंचेची कोवळी पाने अलगद तोडून मामा आम्हाला द्यायचा त्याची गोडी हल्लीच्या महागड्या चाॕकलेटलाही येणार नाही .कधी त्या फांद्यांना आमचा हात पुरतो का हे बघण्याची आम्हा भावंडांची चढाओढ, तर कधी त्याच्या विस्तीर्ण खोडाभोवती खेळलेली पकडापकडी किंवा लपाछपी, ह्यांचे स्मरण तर ओठावर हसू पसरवूनच जाते.
काळाच्या ओघात सुधारणेच्या नावाखाली मामाच्या गावाच्या रस्त्याचे रुंदीकरण झाले खरे; पण मजल दरमजल करीत मागे जाणारी गावे, ओळखीचे रस्ते अनोळखी झाले. मायेची सावली देणारे चिंचेचे झाड काढून टाकताना असंख्य भाच्यांच्या मनातून ते झाड उपटता येईल का? हा विचार शासनाने केला नसावा. अताशा त्याठिकाणी उभे राहिल्यावर बसणारे उन्हाचे चटके मात्र कायम त्या उणिवेची जाणीव करुन देतात.
सौ स्वाती लभाने
ता. जिल्हा वर्धा



