Breaking
अहमदनगरआरोग्य व शिक्षणई-पेपरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रसाहित्यगंध

माणसं घडवणारं ‘लोकसाहित्य’

कार्तिक झेंडे पाटील श्रीगोंदा ता.श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर

0 4 8 2 8 6

माणसं घडवणारं ‘लोकसाहित्य’

महाराष्ट्र घडला तो इथल्या शाश्वत संस्कृतीतून. ही संस्कृती इथल्या पिढ्यानपिढ्यांनी मनोभावे जपली. इथल्या संस्कृतीच्या जडणघडणीत लोकसाहित्याचं मोठं योगदान आहे. लोककथा, लोकगीते, ओव्या, पोवाडे, भारुड यांसारख्या लोकसाहित्यातून ग्रामीण जीवनाचं अस्सल प्रतिबिंब मांडलं गेलं. हे साहित्य साध्या सोप्या गाव खेड्यातल्या भाषेत निर्माण झालं. महाराष्ट्रातील जनमाणसांचं जीवन समृद्ध झालं ते या लोकसाहित्यामुळेच. ‘मराठी भाषा’ ही आपली आई आहे. याच अस्सल मराठीतील हे शाश्वत साहित्य म्हणजे आपल्या आईकडून आपल्याला मिळालेली जन्मभराची संस्कार शिदोरी. ही शिदोरी जपणं आपलं नैतिक कर्तव्य आहे. याचा विसर आपल्याला पडता कामा नये.

“लोकसाहित्य हा मराठी संस्कृतीचा आत्माच म्हणावा लागेल”. इथल्या जनमाणसांच्या रोजच्या जीवनातून, सुखदुःखातून आणि परंपरातून हे साहित्य जन्माला आलं. या साहित्याला मानवी भावनांचा आणि जाणीवांचा स्पर्श मिळाला म्हणून हे साहित्य शाश्वत ठरलं. या लोकसाहित्याने माणसाला आत्मभान दिलं. जगण्याची रीत शिकवली. आई लेकराला शिकवते तसंच, या लोकसाहित्याने माणसांना शिकवलं आणि घडवलं देखील.

ग्रामीण जीवनाच्या वेदना आणि संवेदना या कधी गीतांमधून, कथेमधून तर कधी जात्यावरच्या ओव्यामधून प्रकट झाल्या. हे साहित्य कुण्या पुस्तकात वाचायला मिळणार नाही, मात्र इथल्या जनमाणसांच्या जीवनात ते संचारलेलं नक्की दिसेल. जात्यावर दळण दळणाऱ्या माय माऊल्यांनी त्यांच्या व्यथा वेदनांना ओव्यांमधून बोलत केलं, मातीत राबणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्याने मातीच गुणगान आपल्या गाण्यामधून हिरव्या रानात उभं केलं, आजीने सांगितलेल्या लोककथांमधून आयुष्याला आकार मिळाला. आयुष्य जगण्याच शहाणपण या लोककथांमधूनच मिळालं.

आजही संत एकनाथांची भारुडे गावोगावी गायली जातात. आजही या भारुडांच्या माध्यमातून समाजमनांची मशागत होते, शाहिरांच्या पोवाड्यातून मराठी मनांचा रोम रोम आजही पेटून उठतो. शिवाजी महाराजांचा पराक्रम याच साहित्याने धगधगता ठेवला आहे. लिखित स्वरूपात नसेल तरीही हा मौखिक ठेवा महाराष्ट्राची अनमोल संपत्ती आहे. वासुदेवाची गाणी, गोंधळ, लग्नात गायली जाणारी गीते यांसारख्या अनेक मौखिक साहित्यातून मराठी भाषा आणि संस्कृती संपन्न झाली. लोकसाहित्य हा सामाजिक आणि सांस्कृतिक विचारांचा दस्ताऐवज आहे. समाज जीवनाचं भावविश्व हे लोकसाहित्यातून अभ्यासायला मिळतं. सामूहिक निर्मितीतून तयार झालेली ही पुंजी इथल्या मातीला, माणसांना आणि संस्कृतीला समृद्ध करणारी आहे. कित्येक पिढ्यानपिढ्या या लोकसाहित्याचा वारसा एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे चालत आला. या आधीच्या पिढ्यांनी तो समर्थपणे सांभाळला देखील. आता आपणही हा वारसा सांभाळण्यासाठी सक्षम झालं पाहिजे इतकच.

कार्तिक झेंडे पाटील
श्रीगोंदा ता.श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे