‘पूर्वांचलातील स्थिती आता सुधारत आहे’; -डॉ. मोहन भागवत
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे
‘पूर्वांचलातील स्थिती आता सुधारत आहे’; -डॉ. मोहन भागवत
भैय्याजी काणे जन्मशताब्दी कार्यक्रम साजरा
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे
पुणे: (प्रतिनिधी) मणिपूरमध्ये अत्यंत कठीण परिस्थितीत सुध्दा समर्पित वृत्तीचे भैय्याजी काणे यांच्यासारखे कार्यकर्ते कणखरपणे उभे राहीले, त्यांनी आपले जनकल्याणाचे इप्सित साध्य करण्यासाठी आणि येथील वंचित लोकांचा संघर्ष थांबावा म्हणून ५० वर्षे झोकून देऊन कार्य केले. अशा व्यक्ती आणि संघटनांमुळेच तिथे शिक्षणाचे मूल्य रूजले आहे,आणि त्यातूनच आता पूर्वांचलाची स्थिती चांगली सुधारत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
पूर्वसीमा विकास प्रतिष्ठान आयोजित भैय्याजी काणे जन्म शताब्दी कार्यक्रमात ते बोलत होते. कोथरूड येथील बाल शिक्षण मंदिराच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. देवराव पाटील, प्रमुख पाहुणे विकासक नितीन न्याती, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक नाना जाधव, प्रतिष्ठानचे सचिव जयवंत कोंडविलकर हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
मणिपूरमधील सतत द्वेषाची आग भडकलेली असते. ती थांबवून वातावरण शांत करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून तेथील लोकांच्या उन्नतीचे प्रयत्न केले पाहिजेत, असे उपस्थितांना आवाहन करून डॉ. भागवत पुढे म्हणाले, असे ठोस प्रयत्न सातत्याने होत राहिले तर मणिपूरातील आजची परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही. पण तशी सकारात्मकता निर्माण होण्यासाठी प्रत्येकाला आपल्या परीने योगदान द्यावे लागेल. किमान आणखी दोन पिढ्यांना यासाठी झिजावे लागेल. मनातली नितांत देशभक्ती, ईथली प्राचीन समृध्द संस्कृती आणि त्यागी वृती ही भारतीयांना एकमेकांशी जोडणारी त्रिसूत्री आहे. पण भारताचा उत्कर्ष ज्यांच्या नको आहे, अशा विरोधी शक्ती इथले सर्वकाही बिघडवण्याचा प्रयत्न करीत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
“न्याती फाउंडेशन”च्या वतीने सर्व सामाजिक उपक्रमात योगदान दिले जाईल, आणि समाजातील प्रबुद्ध जनांनीही या कामी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी नितीन न्याती यांनी केले. पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानचे समन्वयक श्रीपाद दाबक यांनी प्रास्ताविकात भैय्याजी काणे जन्मशताब्दी निमित्त त्यांचे कार्य समाजापर्यंत पोहचावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. सुधीर जोगळेकर यांनी भैय्याजी काणे यांचा जीवनपट उलगडून दाखवला. अतुल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी भैयाजी काणे यांचे कार्य व जीवन चरित्र यांची ओळख करून देणा-या दोन चित्रफितींचे प्रसारण करण्यात आले. तसेच “एकता” मासिकाचा “मणिपूर विशेषांक” उपस्थितांना भेट देण्यात आला. एकताच्या संपादक रूपाली भुसारी, मणिपूरमध्ये जाऊन कार्य करणारे ज्ञान प्रबोधिनीचे सेवाभावी कार्यकर्ते, पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानचे सर्व हितचिंतक, पदाधिकारी व सदस्य तसेच विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत मान्यवर निमंत्रित कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.



