0
4
8
2
9
3
प्रेमाचं आॉडीट
ऐक ना वर्षाअखेरीस, करू प्रेमाचं आॉडीट
थोडसं तपासून बघूया, समाधानाचं प्राॅफिट..//
करू शकलो का आपण, सुखाचा गुणाकार
होवू शकलाय का कधी , दुःखाचा भागाकार.. //
जेथे तेथे भौतिकतेची, सतत करतोय बेरीज
म्हणूनच मनःशांतीचे, चुकत असावे तेरीज.. //
वादविवादांच्या रकान्यात, शेरे ताशेरेच खूप
मात्र सुसंवादाच्या चौकटीत, का बरे गुपचूप..//
मोडतोडीची खाडाखोड, बरेच हिशेब चुकले
तडजोडीचे हातचे, ना जाणो कुठे कसे हुकले.. //
ऋण काढून सण केले, अन् हप्ते थकले सारे
बचतीचे रकाने मात्र, जसेच्या तसे उरले कोरे.. //
भविष्यकालीन तरतूद, कांहीच नाहीय दिसत
सुमार दर्जा ताळेबंद, सुधारणेस हवी फुरसत…//
विष्णू संकपाळ बजाजनगर
छ. संभाजीनगर
0
4
8
2
9
3



