प्रवासातील असाही एक अनुभव
पुरूष, स्त्री व मुले असे एकूण 27 लोक आम्ही नागपूर विमानतळावर पोहचलोत. दिनांक 14 डिसेंबर 2022 ते 22 डिसेंबर 2022 पर्यंतच्या अशा नऊ दिवसीय थायलंड प्रवासाकरीता होतो. या प्रवासात एक वाईट घटना अशी घडली की, आमच्यासोबत सहप्रवासी म्हणून 35 वर्षीय सौ. प्राजक्ता चौधरी सुनबाई व त्याच्या 75 वर्षीय सासुबाई सुध्दा आल्या होत्या. सासुबाई नुकतेच बाहेर पंढरपूर वरून प्रवास करून घरी फक्त दोनच दिवस विश्रांती घेतली व थायलंडच्या प्रवासाला आमच्या सोबत निघाल्यात. वास्तविक प्राजक्ताला आपल्या मुलीला सोबत आणावयाचे होते; पण पतीच्या आग्रहामुळे मुलीचे येणे रद्द करून सासुबाईला घेण्यात आले.
सुरूवातीचे दोन दिवस प्रवासाचा आनंद दोघीनी घेतला. पण तिसऱ्या दिवसापासून सासुबाईना उलटी व ताप सुरू झाले.आमच्या या थायलंड प्रवासचे आयोजक तसेच टिम प्रमुख असलेले राज माणिक यांनी सासुबाईना दवाखान्यात भरती केले. थायलंडला बर्याच गोष्टी महाग आहेत. आपले भारतीय चलन 1 रूपया तर त्याचे 2.60 पैसे त्यातल्या त्यात सुनबाई इंग्रजीवर पाहिजे तसे प्रभुत्व नसल्यामुळे भाषेचा घोळ व्हायचा, म्हणून राजला बरेचदा दवाखान्यात राहावे लागायचे. तेथील हॉस्पिटलचा खर्च अफाट होता बरीच धावपळ नर्स, डाॅक्टर कडून समजून घेणे औषधी मेडीकल मधून आणून देणे हे सर्व राज यांना सांभाळावे लागायचे. म्हणून आमच्या वेळापत्रकाप्रमाणे तेथील आमची नियमित ठरलेली ए.सी. टूर अन्ड ट्रॅव्हल बसमध्ये आपल्या जागेवर तेथील मित्राला हिन्दी बोलता येणाऱ्या लेडीज गाईडला आमच्या सोबत नियमित पाठवायचे.
आता परतीचा प्रवास हा दिनांक 21/12/2022 ला असल्यामुळे प्राजक्तानी भरती करण्यात आलेल्या दवाखान्यातील डाॅक्टरला डिस्चार्ज सुट्टी देण्याबाबत विनंती केली. पण ते म्हणालेतं की हे शक्य नाही. पेशंट पूर्णपणे बरा झालेला नाही. आपण भारतात परत कसे जाणार? इकडचे आपणास काहीच कळत नाही. आपली दोघीची फ्लाईट टिकीट सर्व सहका-यासोबतच आयोजक राज यांनी स्वतःची सुध्दा काढलेली होती, म्हणून त्यांनी खाजगी डाॅक्टरकडून डिस्चार्ज सर्टिफिकेट बनवून घेतले. पण जेव्हा आम्ही सर्व विमानतळावर आलोत तेव्हा पासपोर्ट, व्हीजा चेक करताना व्हील चेअरवर असलेल्या आजीला एअरपोर्ट अधिकाऱ्यांनी पुढील प्रवास करण्यास नकार दिला. प्राजक्तानी विनंती केल्यानंतर त्यांनी समजवून सांगितले की विमानाच्या आत पेशंटला श्वास घेण्यास त्रास होणार.
टीमप्रमुख राज माणिक यांनी आम्हा सर्व प्रवाश्यांना एकत्र केलेत व सांगितले की ” मला पेशंटसोबत इथे राहणे खुप गरजेचे आहे, ही माझी जबाबदारी आहे. मला तुमच्यासोबत येता येणार नाही.” त्यांची ही मदतीवृत्ती मला खुप आवडली. फ्लाईटचे पासपोर्ट टिकीट प्रत्येकांचे ज्याचे त्यांना देण्यात आले. शिक्षिकीपेशाचे नेतृत्व म्हणून मला व खोब्रागडे दादाकडे सर्वाना सांभाळून नेण्याची जबाबदारी दिली. नाईलाजास्तव सुनबाईने सासुबाईच्या प्रकृतीकडे बघून पुन्हा हाॅस्पिटला परत गेल्यात. पण डाॅक्टरांनी भरती करण्यास असमर्थता दाखविली. इथे सुध्दा राज माणिक यांनी विनंती केल्यामुळे पुन्हा सासुबाईना भरती करण्यात आले. राजला इथे हाॅस्पिटलचा खर्च भरपूर आला.नंतर तो प्राजक्तानी परत केला. सासुबाई पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यावर डाॅक्टरनी त्यांना फिटनेस सर्टिफिकेट दिले आणि हे तिघेही भारतात नागपूरला दिनांक 29 डिसेंबरला परत आल्यानंतर मी प्राजक्तला फोन करुन सासुबाईच्या प्रकृतीबद्ल विचारणा केली. आम्ही दोघे त्यांना बघण्यास त्यांचे घरी गेलोत.
कुसुमलता दिलीप वाकडे, नागपूर
=========



