खरं सांगतेय…! ‘आकाशाच्या कागदावर सप्तरंगांची उधळण झाली’; स्वाती मराडे
गुरूवारीय चित्रचारोळी स्पर्धेचे परीक्षण

खरं सांगतेय…! ‘आकाशाच्या कागदावर सप्तरंगांची उधळण झाली’; स्वाती मराडे
गुरूवारीय चित्रचारोळी स्पर्धेचे परीक्षण
‘आज हे कुठल्या ठिकाणी आणलंस तू मला.. तुला माहितीये का ? मला तुला काहीतरी सांगायचंय. पण त्यासाठी हे ठिकाण..? आता कसं सांगू मी तुला..?’ ‘तुला जे सांगायचंय ते तर मी तुझ्या डोळ्यातच वाचलंय, म्हणून तर घेऊन आले तुला इथे. बघ ना ते आकाश.. कसे खाली झुकलेय त्या क्षितिजावर, अन् सांगतंय धरणीला किती प्रेम आहे तुझ्यावर. नभ मातीला बिलगू पाहतात, ओथंबून कोसळतात नि एकरूप होतात. शीळ घालतो वारा रानात अन् राघू मैनेची कुजबूज चालते पानात. धुंद होऊन फुले, गंध सांडतात. भ्रमरासंगे डाव प्रितीचा मांडतात. चांदणं प्यायला चकोर होतो तृषार्त, थेंब पावसाचे लुटायला चातक, साद घालतो आर्त. नाजूक वेल वृक्षाला बिलगते नि दान प्रितीचं मागते. या सर्वांच्या प्रेमदुनियेत मी घेऊन आलेय तुला. डोंगरांनी हिरवाई पांघरलीय, आकाशाच्या कागदावर सप्तरंगांची उधळण झालीय. पाण्याचा सुरेल नाद मंजुळ धून निर्माण करतोय. धुक्याने आल्हादपणाची नशा आणलीय.. या सगळ्यांच्या सोबतीने प्रेम व्यक्त करायचंय मला. अन् त्या निसर्गालाही सांगायचंय..!
मम मनीचा अनुराग, निसर्गराजा ऐक ना..
रूप चिरंजिवी,मिळावे या क्षणांना..!
‘आजपर्यंत व्यक्त नाही झालं, पण त्याच्या संगतीतच आपलं प्रेम मनातल्या मनात फुलत गेलं. आठवतं तुला.! एकदा अचानक पाऊस आला नि मला चिंब भिजवायला लागला. त्यावेळी तुझ्याकडे छत्री होती. ती छत्री तू मला दिलीस अन् स्वतः भिजत राहिलास. तुझं ते माझी काळजी घेणं.. प्रेमच तर होतं. त्याच पावसात अचानक वारे सुटले नि विजेचा कडकडाट झाला, काहीच न सुचून मी तुला बिलगले, तेव्हाही तुझा स्पर्श फक्त आणि फक्त घाबरू नकोस मी आहे ना असं आश्वासन देणारा जणू.. तेव्हाही तू विश्वास सार्थ ठरवलास. धो धो वाहणारा तो ओहोळ पार करताना मी घाबरून गेले होते, तू माझा हात हातात गच्च पकडला. पण कुठलीही आसक्ती नसलेला तुझा तो स्पर्श.. तुझी माझ्या प्रती असणारी जबाबदारी निभावण्याची झलकच दाखवून गेला.. ती काळजी, तो वाटणारा विश्वास, ती जबाबदारी मी नंतर अनेक प्रसंगात अनुभवत गेले. पण सुरूवात झाली ती निसर्ग साक्षीनेच. म्हणूनच आज प्रेमाची शब्दरूपी कबुलीही मला त्याच्याच संगतीत द्यायची आहे. घ्यायची आहे. आज मनात ‘धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना शब्दरूप आले मुक्या भावनांना’ या ओळी रूंजी घालत आहेत. सांगशील ना आतातरी तुझ्या मनातलं गुपित.. निसर्गराजा ऐक ना.. ! असे म्हणत.’
आज चित्रचारोळी स्पर्धेसाठी आलेले चित्र ‘प्रेमदुनियेच्या न्यायालयात निसर्गाची साक्ष घेऊन शब्दरूपी प्रीत मोहोर उमटविण्यास आतुर झालेल्या प्रेमींचे.’ असा काव्यमयी विचार करायला लावणारे. वेड लावणारा निसर्ग अन् हवीहवीशी तुझी सोबत दे अशीच साथ आयुष्यभर, आणखी काहीच नाही मागत. या आशयाने नटलेल्या व निसर्गाशी तादात्म्य पावत लिहिलेल्या आपणा सर्वांच्या रचना मनभावनच. वैविध्यता जपत, आशयघनता राखत.. आपली लेखणी बहरत राहो. सहभागी सर्व रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार.
सौ स्वाती मराडे,इंदापूर जि.पुणे
मुख्य परीक्षक, सहप्रशासक, लेखिका
©मराठीचे शिलेदार समूह





