भावनांना रफू करून पहावे
रजनी भागवत ऐरोली, ठाणे
भावनांना रफू करून पहावे
” ए मम्मी बघ ना हा माझा खूप आवडता कुर्ता रिक्शाच्या दरवाज्यात अडकून फाटला आता मी हा कसा वापरणार ?” ती हिरमुसुन सोफ्यावर बसत बोलली. आई ने जवळ जाऊन कुर्ता पाहिला व तिला समजावित बोलली ,” नको नाराज होऊ आपण रफू करून घेऊ मग तुला नेहमीसारखा वापरता येईल.” आता दूसरा पर्याय काय आहे अश्या अर्थाने चिडचिडत ती रुम मध्ये निघून गेली. मंडळी रफू म्हणजे , अश्या छोट्याशा फाटलेल्या कपड्यांवर धाग्यांनी केलेली करागिरी . हे धागे वापरून केलेले बारिक काम इतके बेमालूमपणे मूळ कपड्यात समावून जाते की दिसूनही येत नाही त्या ठिकाणी तो कपडा फाटला होता.
पूर्वीच्या काळी आतासारखे कपाट ऊतू जाईल इतके कपडे नसायचे. त्यामुळे रफू करून कपडे वापरणे हा पर्याय अगदीच वापरला जायचा. त्यामुळे कपडा अगदी जीर्ण होईपर्यंत वापरला जायचा किंवा इतर कुणा गरजूच्या कामी यायचा. थोडक्यात काय अगदीच अडगळीत न टाकता एखादया गोष्टीचा थोड्या वेगळ्या पद्धतीने पुर्नवापर करता यायचा. हे विचार किंवा जीवनशैली अगोदरच्या पिढीत रुजली असल्यामुळे बहुतेक त्यांच जगणं हे अगदी साध आणि सामान्य होतं
आजच्या या ग्लोबलायजेशनच्या जमान्यात सामान्यपणे जगणं खरचं कठीण झाल आहे . पूर्वीच्या काळी असायचे असे चौसपी वाडे आणि त्या वाड्यात गुण्यागोविंदाने नांदणारे भावंडे हे दृश्य दुर्मिळ झाले आहे. पूर्वीच्या एकत्र कुटुंबपद्धती मध्ये माणूस सहसा एकटा पडायचा नाही . त्याला समजून घेणारे किंवा समजावून सांगणारे कुणीतरी घरात असायचे.
मनुष्य अत्यंत भावनाशील प्राणी आहे . माझ्या या प्राणी संबोधनावर कित्येकांचा आक्षेप असू शकतो परंतु खरचं प्रसंगी प्राणी जसे काही गोष्टी शिकवून किंवा सहवासात राहून समजूतीने वागतात तसे माणसं वागताना दिसत नाही . एकूणच माणसांचा संयम सुटताना दिसतोय आणि ती जास्त एकलकोंडी व आत्मकेंद्री होताना दिसत आहे. सध्याच्या सो कॉल्ड प्रायव्हसीच्या अतिरेकाने माणसे माणसांपासून लांब होत चालली आहे . कित्येक वेळा तर कारण अगदीच क्षुल्लक असते परंतु वर्षानुवर्ष एकमेकांची साधी चौकशी देखील केली जात नाही.
आता कपड्यांना रफू करण्याची पद्धत जरी हळुहळु कालबाहय होत असली तरी भावनांना रफू करण्याची नवी गरज उत्पन्न होत आहे . या जगात कुणीच परिपूर्ण नसते त्यामुळे लोकांना आहे तसे स्वीकारणे क्रमप्राप्तच आहे. अशावेळी जर आपल्या भावनांना रफू केले तर नात्याचे वस्त्र आणखी काही काळ टिकू शकते . असा रफू केलेला कपडा वापराण्याची कुणी आपल्यावर सक्ती करत नाही परंतु कधी गरज तर कधी त्या कपड्याविषयी प्रेम किंवा आसक्ती मुळे आपण ते वस्त्र वापरतो, तद्वतच भावनांना रफू करून तयार झालेले नवीन नाते कधी गरज तर कधी आपलं प्रेम यामुळे संभाळले तर काय हरकत आहे .
भावनांना रफू करून पहावे म्हणजे काय तर वेगवेगळे समजूतीचे धागे वापरून तुटलेल्या नात्याची वीण परत वेगळ्या पद्धतीने विणणे. नातं अगदी पूर्वीसारखे नाही झाले तरी नव्या रुपात आपल्याला ते जतन करता येईल . नाते नाहिसे होऊन आयुष्यात एक पोकळी निर्माण होण्यापेक्षा अश्या रफू केलेल्या नात्यांनी आपल्या नात्यांच वस्त्र एकसंध राहू शकते .आयुष्याच्या बागेत जास्तीत जास्त नात्यांची निकोप लागवड केली गेली तर आनंदाच आणि समाधानाच फुलपाखरू नक्कीच आपल्या मनांत बागडल्याशिवाय राहणार नाही . मला तर भावनांना रफू करून पहावे ही संकल्पना पटली आणि खूप आवडली, प्रत्यक्षात किती उतरेल माहित नाही परंतु मी प्रयत्न नक्की करणार . तुम्ही ही बघा प्रयत्न करून .
रजनी भागवत
ऐरोली, ठाणे





