विजयादशमी शिस्तबध्द सघोष पथसंचलन
अमृता खाकुर्डीकर, पुणे
विजयादशमी शिस्तबध्द सघोष पथसंचलन
राष्ट्रीय स्वसयंसेवक संघाचा शताब्दी वर्षप्रारंभ
अमृता खाकुर्डीकर, पुणे
पुणे: दि१३ ऑक्टो (प्रतिनिधी) – विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुणे महानगर रचनेतील ५८ ठिकाणी सघोष पदसंचलने आयोजित करण्यात आली होती. विजयादशमी हा संघाचा स्थापनादिन असून याच मुहूर्तावर नागपूर येथे मोहिते वाड्यात १९२५ मध्ये संघाची स्थापना झाली. या वर्षी शताब्दी वर्षप्रारंभ होत आहे. हे औचित्य साधून पुणे महानगरात ९ भागात ५५ विभागात एकूण १२ हजारांहून अधिक पूर्ण गणवेशातील स्वयंसेवकांनी सकाळी ७.३० वाजता सहभागी होऊन पथसंचलन केले.
संचलन मार्गावर आकर्षक रांगोळ्या, फुलांच्या पाकळ्यांचे गालीचे पसरलेले होते. सहभागी स्वयंसेवकांवर आणि भगव्या ध्वजावर लोकांनी उत्स्फूर्तपणे पुष्पवृष्टी केली. महानगर, उपनगरे व झोपडपट्टी वस्त्यांमध्ये सुध्दा संचलनाचे सहर्ष स्वागत करण्यात आले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात यंदा प्रथमच सघोष पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले. यात विद्यार्थी स्वयंसेवक लक्षणीय संख्येने सहभागी झाले. संचलनासमवेतच ठिकठिकाणी प्रथेनुसार शस्त्र पूजनही करण्यात आले. शिवाजीनगर भागातील एस एस पी एम एस संस्थेच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला घोषनादासह मानवंदना देण्यात आली.यावेळी केंद्रीय हवाई वाहतूक व सहकार विभागाचे राज्यमंत्री खासदार मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी, पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, कसबा भागाचे संघचालक ॲड. प्रशांत यादव यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
तत्पूर्वी मान्यवरांच्या उपस्थितीत मोतीबाग कार्यालयात शंख, तसेच भगव्या ध्वजाचे पूजन व ध्वजारोहण करण्यात आले. बाल विभागाचे सुध्दा स्वतंत्र शस्त्रपूजन शहरात एकूण ४० ठिकाणी झाले. या उत्सवाला ३००० पेक्षा जास्त बालके आणि ७००० पेक्षा जास्त तरूण उपस्थित होते. तरूणांसोबत ज्येष्ठ स्वयंसेवकांचा सहभाग लक्षवेधक होता.