आगरी समाज संस्थेतर्फे २२ नोव्हेंबरला भव्य आगरी वधू-वर परिचय मेळावा
तुषार थळे बिनधास्त न्यूज प्रतिनिधी

आगरी समाज संस्थेतर्फे २२ नोव्हेंबरला भव्य आगरी वधू-वर परिचय मेळावा
LED स्क्रीनवरून वधू-वरांचा परिचय; मुलींना प्रवेश मोफत, पालकांसाठी विशेष नियम
तुषार थळे
बिनधास्त न्यूज प्रतिनिधी
अलिबाग, जि. रायगड
अलिबाग : आगरी समाजातील विवाहोत्सुक युवक-युवतींना योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी एक विश्वासार्ह आणि समाजाभिमुख व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आगरी समाज संस्था, अलिबाग यांच्या वतीने रविवार, दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ रोजी भव्य आगरी वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत भाग्यलक्ष्मी हॉल, चेंढरे-अलिबाग येथे होणार आहे. या मेळाव्याला आगरी समाजातील विवाहोत्सुक युवक-युवती आणि त्यांच्या पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनात विवाहासाठी योग्य स्थळ शोधताना पालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. बदलती जीवनशैली, शिक्षण, नोकरी – व्यवसाय आणि भौगोलिक अंतर यामुळे योग्य स्थळ शोधणे अधिक आव्हानात्मक बनले आहे. ही गरज ओळखून आगरी समाज संस्थेने विवाहोत्सुक युवक-युवती आणि त्यांच्या पालकांना एकाच ठिकाणी भेटण्याची, एकमेकांची माहिती जाणून घेण्याची आणि विवाहविषयक संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेतला आहे.
आगरी समाज संस्थेने २ ऑक्टोबर २०२५ रोजी ‘विवाहमिलन’ या वधू-वर परिचय संकेतस्थळाचा शुभारंभ केला होता. मोबाईल आणि लॅपटॉपच्या माध्यमातून घरबसल्या विवाहोत्सुक मुला-मुलींची माहिती उपलब्ध होत असल्याने या उपक्रमाला अल्पावधीतच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अनेक युवक-युवती आणि पालक या व्यासपीठाशी जोडले गेले आहेत. याच उपक्रमाचा पुढील टप्पा म्हणून भव्य वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात उपस्थित विवाहोत्सुक युवक-युवतींचे छायाचित्रे LED स्क्रीनच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात येणार आहेत. त्यामुळे वधू-वर परिचय मेळाव्यांमध्ये प्रचलित असलेल्या पद्धतीनुसार युवक-युवतींना स्टेजवर जाऊन परिचय देण्याची आवश्यकता राहणार नाही. ही आधुनिक आणि सोयीस्कर पद्धत मेळाव्याचे विशेष आकर्षण ठरणार आहे.
मेळाव्याला मिळणारा संभाव्य प्रतिसाद आणि सभागृहातील आसनव्यवस्था लक्षात घेता उपस्थितांची गैरसोय होऊ नये, यासाठी काही नियम निश्चित करण्यात आले आहेत. विवाहोत्सुक युवक-युवतींसोबत आलेल्या २ पालकांनाच सभागृहात प्रवेश दिला जाणार असून युवक-युवतींशिवाय स्वतंत्रपणे आलेल्या पालकांना कोणत्याही परिस्थितीत सभागृहात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच मुलींसाठी मेळाव्यात प्रवेश पूर्णपणे मोफत ठेवण्यात आला आहे.
अनावश्यक औपचारिकता टाळून युवक-युवती आणि पालकांना एकमेकांशी संवाद साधता यावा, यावर विशेष भर देण्यात आला आहे. मेळाव्यास उपस्थित राहणाऱ्या विवाहोत्सुक वधू-वरांसह त्यांच्या पालकांसाठी संस्थेच्या वतीने अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात येणार आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या समाजबांधवांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी संस्थेने विशेष नियोजन केले आहे. कार्यक्रमाचे नियोजन शिस्तबद्ध आणि व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी व स्वयंसेवक विशेष मेहनत घेत आहेत.
हा मेळावा केवळ विवाह जुळविण्याचा कार्यक्रम नसून समाजातील कुटुंबांना एकत्र आणणारा आणि नव्या नातेसंबंधांची सुरुवात घडविणारा महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम आहे. त्यामुळे आगरी समाजातील सर्व समाजबांधवांनी आपल्या कुटुंबातील विवाहोत्सुक मुला-मुलींसह या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन आगरी समाज संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
आगरी समाजाची एकजूट, परस्पर सहकार्य आणि सामाजिक विकास या उद्देशाने संस्था विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. रूढी-परंपरा परिसंवाद, शैक्षणिक व करिअर मार्गदर्शन, पुस्तक बँक, रोजगार व कौशल्य विकास, बालसंस्कार वर्ग, रक्तदान शिबिर आणि विवाहमिलन यांसारख्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून संस्था समाजसेवेचे कार्य करीत आहे.
‘एकता • सेवा • प्रगती’ हे ब्रीद घेऊन कार्यरत असलेल्या आगरी समाज संस्थेच्या या उपक्रमाला समाजबांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा आणि या मेळाव्याच्या माध्यमातून अनेक युवक-युवतींच्या विवाहाचा मार्ग सुकर व्हावा, अशी अपेक्षा संस्थेचे अध्यक्ष निलेश पाटील यांनी व्यक्त केली आहे.
मेळाव्यासाठी ऑनलाइन नोंदणी www.vivahamilan.com या संकेतस्थळावर सुरू आहे. अधिक माहितीसाठी आगरी समाज संस्थेचे कार्यालय, दुकान नं. २, पहिला मजला, कुबेराक्षे मॉल, मधुर मार्टसमोर, मारुती नाका, अलिबाग येथे अथवा श्री. मनोहर पाटील – ९४२२५ ९४५७१ किंवा सौ. दिपश्री निलेश पाटील – ९८२२४ ९१११८ यांच्याशी संपर्क साधावा.



