आम्ही अनुभवलेला अविस्मरणीय ‘मराठी अभिजात भाषेचा’ नयनरम्य सोहळा
कुसुमलता दिलीप वाकडे
आम्ही अनुभवलेला अविस्मरणीय ‘मराठी अभिजात भाषेचा’ नयनरम्य सोहळा
दिनांक 7 मे 2025 ला छत्रपती संभाजीनगर येथे भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्र व सभागृह येथे ‘मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था’,नागपूर यांचेकडून राज्यस्तरीय पुस्तक प्रकाशन व काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. मी व माझे पती दिलीपराव या सोहळ्याकरीता सकाळीच 9 वाजता तेथे पोहचलोत. प्रथम दर्शनी नजरेस पडली ती ‘मराठीचे शिलेदार समुह बहुउद्देशीय संस्था सुंदर हस्ताक्षरात लिहिलेली व काढलेली अनोखी रंगीत रांगोळी’. सर्वाचे आगमन होताच लक्ष वेधून घेत होती आणि निसर्गाची किमया त्या रांगोळीवर पडलेली उन्हाची किरण जणू या ‘मराठीचे शिलेदार’ संस्थेची ज्योत तेवत आहे हे आवर्जून सांगत होती. सकाळलाच येणाऱ्या सर्व सदस्यांना स्वादिष्ट उपमा व मनसोक्त हवा तेवढा चहा, नाश्ता देण्यात आला.
या कार्यक्रमास मुख्य आयोजक म्हणून प्रभारी प्राचार्या मा.डाॅ.पद्मा जाधव वाखुरे मॅडम लाभल्यात तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिक्षक आमदार नेते मा. विक्रमजी काळे, प्रमुख पाहुणे म्हणून मा. ए.बी. पठाण, मा. नरेशभाऊ, मा.बालाजी जाधव, मुख्य परीक्षक सौ.स्वाती मराडे या प्रथम सत्राच्या पुष्पाला व्यासपीठावर उपस्थित होत्या. या माळेत वि.वा.शिरवाडकर, जिजाऊ जिजामाता, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर व शूर राजे छ.शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.
प्रशासक व मुख्य परीक्षक सविताताई पाटील ठाकरे यांनी आपल्या उत्कृष्ट शैलीत मान्यवराचे स्वागत व सुत्रसंचलन केले. या कार्यक्रमास या संस्थेचे संस्थापक, आदरणीय राहुल पाटील दादा काही अपरिहार्य कारणास्तव थोडा येण्यास उशीर असल्यामुळे त्यांची सभागृहात उणीव जाणवत होती. कार्यक्रमाची धुरा राहुल दादांनी ज्यांच्यावर सोपविली होती, ते म्हणजे आदरणीय प्रशांत ठाकरे व विष्णू सपंकाळ दादा यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व या संस्थेचे उद्दिष्ट पुढे मांडलेत.
यावेळेस सर्व मान्यवरांनी मराठी भाषेचा लौकिक केला. मा ए.बी.पठाण सरांनी आपल्या दर्जेदार शैलीत मराठी भाषेचे महत्त्व, मराठीचा गौरव व या मराठी शिलेदार समुहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल पाटील दादाचे कौतुक व नियोजनबद्धतेच्या रुपरेषेला बघून भारावून गेलेत. त्यांच्या रूबाबदार व अप्रतिम भाषणाला टाळयाच्या गजरात प्रेक्षकांची दाद मिळवून गेलेत. तदनंतर प्रशांत ठाकरे दादांनी या प्रथम सत्रातील मान्यवरांच्या हस्ते ‘गौरव अभिजात मराठी विशेषांक 2025’ चे प्रकाशन करण्यात आलेत. तसेच या भव्य दिव्य समारंभात विशेष आकर्षण म्हणजे ‘न भुतो न भविष्यती’ एक नाही तर तब्बल बावीस काव्यसंग्रहाचे प्रकाशन व त्या कवी, कवयित्रींचे कुटुंबासह मान्यवरांच्या हस्ते शाल, मानपत्र, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, मराठी गौरव विशेषांक व तुळशीचे रोपटे देवून तसेच माझ्या मागील ‘पंख पैंजण’ कथासंग्रहाचे प्रकाशन म्हणून मला व माझे पती दिलीप यांना मानपत्र, प्रमाणपत्र,सन्मानचिन्ह विशेषांक देवून गौरविण्यात आले.
ज्यांची सर्वाना सभागृहात आतुरतेने वाट होती ते म्हणजे या कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण शिक्षक आमदार मा. विक्रमजी काळे यांनी या मराठी भाषेला या वर्षी केंद्र शासनाकडून अभिजात दर्जा मिळला असून या मराठी शाळा टिकल्या पाहिजेत म्हणून ते बोलत असतानाच वादळी वारा व पावसाच्या सरी कोसळू लागल्यात. या सोहळ्याला रखरखत्या उन्हाळ्यात शितल थंडवा द्यावयाचा असावा आणि त्यावेळेस नेमका विद्युत पुरवठा खंडित झाला. तरीही ते थांबले नाहीत.
प्रेक्षकांच्या परवानगीने तेवढ्या अंधारात काळे साहेब बोलत होते. मराठी शाळा टिकाव्यात म्हणून मी प्रत्येक शाळेला 300 पुस्तकांचे वितरण 3 कोटीचा खर्च केला. या संस्थेनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवा म्हणून तुम्हा आम्हा सर्वाचा सन्मान केला. मराठी भाषेला पुढे नेण्यासाठी तुम्हा कवी,कवीयत्रिचे हे उपक्रम अंत्यत कौतुकास्पद आहेत या शिलेदार समुहात फक्त महाराष्ट्रातीलच नाहीतर संपूर्ण आजूबाजच्या राज्यातील सदस्य सहभागी असून मराठीत लिहितात हे आनंददायक आहे. माझ्या मतदारसंघात लातूरला या शिक्षक, शिक्षिका व गृहिणी या संस्थेमार्फत असाच उपक्रम घ्यावा अशी माननीय काळे साहेबांनी अपेक्षा बाळगली. नंतर सर्वानी रूचकर जेवणाचा आस्वाद घेतला. स्वयंपाक सुंदर झालेला होता पावसाच्या सरीत सुध्दा नियोजनबद्ध पध्दतीत जेवणाचे व्यवस्थापन केले होते.
दुपारनंतर द्वितीय सत्रात राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही धुरा विष्णूदादानी सांभाळली. कविता सादरीकरणाकरीता 3 मिनीटे देण्यात आली. स्पर्धेचे परिक्षक कोण हे सुध्दा अगदी वेळेवर जाहीर करण्यात आले. आणि ज्यांची सर्व शिलेदारांना वाट होती ते आदरणीय राहुल पाटील सर या कार्यक्रमाला उपस्थित झालेत. कवी, कवयित्रीनी हावभाव, निटनिटकेपणा, हसतमुख, साजेसे शिर्षक, शिस्त व नियमात नोंदणीकृत यादीतील कवी, कवयित्रींचे क्रमांने अशा या 50 गुणाच्या स्पर्धेला परीक्षकांनी योग्य पारदर्शक न्याय दिला. पुन्हा दुसर्या सत्रात चहा देण्यात आला.
सर्वाची निकालाची आतुरता शिगेला पोहोचली होती आदरणीय राहुल दादांनी निकाल जाहीर केला. प्रथम क्रमांक सिंधू बनसोडे,पुणे, द्वितीय क्रमांक सिंधू बोंदले नागपूर व तृतीय क्रमांक वरीष्ठ व सर्व कार्यक्रमात सहभाग घेणारे आदरणीय नागोराव सोनकुसरे काकाजीची निवड करण्यात आली व तसेच दहा उत्कृष्ट काव्यवाचन स्पर्धकांची निवड झाली. मला सुध्दा या काव्यवाचन रचनेत सहभागी होऊन सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, विशेषांक आदरणीय राहुल पाटील दादाच्या हस्ते मिळालेत.
आगळावेगळया या स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह, विशेषांक व प्रमाणपत्र देण्यात आले. शिलेदार समूहाचे सहप्रशासक, सहसंपादक, परीक्षक यांचे सुध्दा काव्यवाचन या स्पर्धेत झालेत. हा संपूर्ण कार्यक्रम उत्कृष्ट पार पडावा म्हणून महिन्यापूर्वी पासून कामाला लागलेले, आदरणीय राहुल पाटील दादा, सविताताई, विष्णूदादा, प्रशांतदादा तारकाताई, स्वाती ताई यांच्या अथक परिश्रमाला मानाचा मुजरा. असाच सोहळा सदैव संपन्न होवोत ही अपेक्षा.
कुसुमलता दिलीप वाकडे
‘पंख पैंजण’कार
दिघोरी रोड, नागपूर
=========



