Breaking
आरोग्य व शिक्षणनागपूरपरीक्षण लेखपुणेमहाराष्ट्रमुंबईविदर्भ

मी शिक्षक…!!!

शैलेंद्र स.दहातोंडे.

0 4 8 2 8 4

मी शिक्षक…!!!

५ सप्टेंबर हा दिवस सर्वच शिक्षकांकरीता अतिशय महत्त्वाचा, आनंदाचा व शिक्षकांच्या कार्याचा गौरव करणारा दिवस आहे. तसे पाहता आपण कोणतेही क्षेत्र बघितले तर तर त्या-त्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणारा दिन हा वर्षातून एकदा साजरा केला जातो, उदाहरणात सांगायचे झाल्यास १ जुलै ला डॉक्टर दिन व १५ सप्टेंबर ला अभियंता दिन.

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये व आपल्या समाजामध्ये शिक्षकांना एक विशिष्ट मानाचे स्थान आहे. कारण, ‘आई जशी मुलांवर संस्कार करते, तसेच शिक्षक हा सुद्धा मुलांना घडविण्याचे त्यांना संस्कारक्षम बनविण्याचे कार्य करतो.’, प्रत्येकाच्या जीवनाला योग्य दिशा देण्याचे, त्यांचे योग्य जडणघडण करण्याचे मोलाचे कार्य शिक्षक अविरतपणे करत असतो आणि त्यामुळेच आपल्या समाजात शिक्षकांना आदरचे स्थान आहे.

आपला भारत देश स्वातंत्र झाल्यानंतर डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन हे आपल्या स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती बनले. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी झाला होता.डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती तर होतेच शिवाय ते एक आदर्श शिक्षक सुद्धा होते, त्यांनी आदर्श शिक्षकाची ओळख जपली व म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ ५सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.”माझा जन्मदिवस शिक्षक दिनाच्या रुपात साजरा करणे माझ्यासाठी गौरवास्पद असेल” असे त्यांचे उदगार होते.भारतामध्ये सर्वप्रथम १९६२ मध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला.

असे म्हणतात की, ‘शिक्षक हा उद्याचा सक्षम, प्रगत, विकसित भारत घडविणारा शिल्पकार आहे’.कारण उद्याचा भारत देश ज्या व्यक्तींच्या हातात द्यायचा आहे,उद्याला येणाऱ्या ज्या पिढीच्या हातातआपला भारत देश सोपवायचा आहे,त्या व्यक्तींना,त्या पिढीला संस्कारक्षम, योग्य शिक्षित व सर्वगुणसंपन्न बनविण्याची मोठी जबाबदारी ही शिक्षकांच्या हातात आहे.

आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे, आपल्या भारत देशातील बहुसंख्य लोक हे खेड्यागावत राहतात म्हणूनच की काय ‘खेड्यांचा देश’ अशी सुद्धा आपल्या भारत देशाची ओळख आहे.पण आज काळ बदललेला आहे,आपल्या भारत देशात स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पेक्षा जास्त काळ झाला आहे,आता खेड्याचे रूपांतर शहरात व्हायला लागले आहे,शहरीकरण झपाट्याने वाढत आहे, खेड्यातील लोकांचा कल शहराकडे दिसून येत आहे, पण असे असतांनाही अजूनही बरेच लोक खेडेगावात राहतांना दिसून येत आहेत.

आज शिक्षण क्षेत्रात सुद्धा आमूलाग्र बदल होत असल्याचे दिसून येत आहे,आजच्या शिक्षणाचे दोन भाग आपणास पहावयास मिळतात,एक ग्रामीण भागातील शिक्षण व दुसरे शहरी भागातील शिक्षण.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्याचे एकमेव प्रभावी माध्यम म्हणजे आपल्या गावामध्ये असलेली सरकारी शाळा तर शहरी भागात यापेक्षा थोडी वेगळी परिस्थिती आहे ती अशी की,शिक्षण मिळण्याचे शाळा व्यतिरिक्त अनेक माध्यम उपलब्ध आहेत जसे की,खाजगी शिकवणी, आई वडील शिक्षित असल्यामुळे त्यांचे सुद्धा विशेष लक्ष आपल्या मुलांकडे असते. पुरातन काळापासून आपण पाहत आलोय की,शिक्षक म्हणजे कोण तर शिक्षक म्हणजे ज्ञान देणारा, विद्यार्थ्यांना योग्य संस्कारक्षम शिक्षण देणारा, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणणारा,आणि शिक्षकांची हीच व्याख्या योग्य आहे.शिक्षकांचे कार्य हे विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करणे, शिकविणे हेच आहे व हेच असायला पाहिजे. पण आज याबाबत थोडी विपरित स्थिती आपणास पहावयास मिळते. शिक्षकांचे कार्य विद्यार्थ्यांना शिकवायचे आहे, ते विद्यार्थ्यांना शिकवीत सुद्धा आहेत,त्यांची विद्यार्थ्यांना शिकविण्याची इच्छा सुद्धा आहे,आपला विद्यार्थी खूप खूप शिकवा,मोठा व्हावा, आपला विद्यार्थी घडावा, एक चांगला संस्कारक्षम नागरिक बनावा, त्याची चांगली प्रगती व्हावी, त्याचे मोठे नाव व्हावे, अशी तळमळ सर्वच शिक्षकांना आपल्या विद्यार्थ्यांविषयी असल्याचे दिसून येत आहे,पण आजची परिस्थिती जर बघितली तर शिक्षकांकडे विद्यार्थ्यांना शिकविण्या व्यतिरिक अनेक इतर कामाचा व्याप वाढल्याचे दिसून येत आहे. काही अतिशय महत्वाची कामे करायला आपले शिक्षक तयार आहेत पण खूप अतिरिक्त कामांचा व्याप वाढविला तर मग शिक्षकांनी शिकवायचे कधी व शिकवायचे कसे हाही प्रश्न उभा राहतांना दिसून येत आहे.

“विद्यार्थी म्हणतात गुरुजी शिकवा ना आम्हाला,तर गुरुजी म्हणतात थांबा थोडा वेळ एक महत्वाचा अहवाल बनवायचा आहे.” “विद्यार्थी म्हणतात गुरुजी शिकवाना आम्हाला,गुरुजी म्हणतात थांबा थोडा वेळ एक महत्वाची लिंक भरायची आहे.” “विद्यार्थी म्हणतात गुरुजी शिकवाना आम्हाला,गुरुजी म्हणतात थांबा थोडा वेळ महत्वाचे सर्वेक्षण करायचे आहे.”*

“विद्यार्थी म्हणतात गुरुजी शिकवाना आम्हाला, गुरुजी म्हणतात थांबा मला महत्वाच्या प्रशिक्षणाला जायचे आहे.” “विद्यार्थी म्हणतात गुरुजी शिकवाना आम्हाला, गुरुजी म्हणतात थांबा थोडा वेळ नवीन मतदारांची नोंदणी करायची आहे.” आज शिक्षक दिन मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा होतांना दिसत आहे,एक शिक्षक म्हणून माझ्या करिता व माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनी करिता ही निश्चितच आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे.

आपण ज्या क्षेत्रात काम करतो, त्या क्षेत्रात जर आपल्या हातून उत्कृष्ट कार्य होत असेल तर अशा उत्कृष्ट कार्याचा व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार व सन्मान हा व्हायलाच पाहिजे, पण खर सांगायचे तर शिक्षकांकडे जो शिकविण्याव्यतिरिक्त अतिरिक्त कामाचा व्याप दिवसेंदिवस वाढत आहे, हा व्याप काही प्रमाणात का होईना पण कमी व्हायला हवा, हा व्याप कमी झाला तरच एक शिक्षक विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी जास्तीत जास्त वेळ देवू शकेल,ही वाढलेली कामे ज्या दिवशी कमी होतील त्या दिवशी खऱ्या अर्थाने शिक्षक दिन साजरा झाल्यासारखा वाटेल व प्रत्येकच शिक्षक बंधू भगिनींना या गोष्टीचा निश्चितच आनंद होईल… बरोबर ना…!

सर्व शिक्षक बंधू भगिनींना शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा….!!!

शैलेंद्र स.दहातोंडे.
(सहा. शिक्षक)
जि.प.प्राथमिक मराठी शाळा, कोलटेक, पं. स.भातकुली.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे