नवरात्री : देवीच्या नऊ रूपांत दडलेली आपल्या अंतरंगातील नऊ शक्ती
अनिता अनिल व्यवहारे ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर

नवरात्री : देवीच्या नऊ रूपांत दडलेली आपल्या अंतरंगातील नऊ शक्ती
“घटस्थापनेने जागृत होई भक्ती,
नवरंगांनी सजते उत्सवाची वाट,
देवीच्या नऊ रूपांत दडलेली शक्ती अगाध
जागवू या अंतरंगातील नवचैतन्याची पहाट.”
‘नवरात्र… केवळ नऊ दिवसांचा उत्सव नाही; तो आपल्या अंतर्मनाला जागं करणारा, सुप्त शक्तीला साद घालणारा आणि जीवनाकडे नव्या उमेदीनं पाहायला शिकवणारा उत्सव आहे’. आदिशक्तीच्या उपासनेतून आपण देवीच्या विविध रूपांना वंदन करतो; पण त्या रूपांचा खरा अर्थ आपल्या जीवनात उतरवला, तरच नवरात्राची साधना सार्थकी लागते. देवी मंदिरात आहे, घटांमध्ये आहे, आरतीच्या ज्योतीत आहे; पण ती आपल्या मनातही आहे. प्रत्येक स्त्रीच्या जगण्यात तिची एखादी शक्ती सतत कार्यरत असते. कधी ती आईच्या ममतेतून दिसते, कधी संकटाशी दोन हात करणाऱ्या धैर्यातून, तर कधी घर-संसार, नोकरी, व्यवसाय आणि नातेसंबंध यांचा समतोल साधणाऱ्या कर्तृत्वातून. नवरात्रीतील नऊ दिवस म्हणजे जणू आपल्या मनातील नऊ शक्तींना जागं करण्याची संधीच!
पहिली शक्ती : धैर्याची
पर्वतासारख्या अडचणी समोर उभ्या राहिल्या तरी न डगमगता त्यांना सामोरं जाण्याची प्रेरणा शैलपुत्री देते. जीवन कितीही कठीण झालं, तरी पाय जमिनीवर घट्ट रोवून उभं राहण्याची शक्ती प्रत्येकामध्ये असते. ‘श्री शैलपुत्री माताय नमः’
दुसरी शक्ती : संयमाची
ब्रह्मचारिणी आपल्याला शिकवते, की यशासाठी केवळ धडपड पुरेशी नसते; त्यासाठी संयम, साधना आणि सातत्यही आवश्यक असते. मनावर विजय मिळवणारा खरा विजेता असतो. ‘श्री ब्रह्मचारिणी माताय नमः’
तिसरी शक्ती : निर्भयतेची
चंद्रघंटेच्या रूपातून संकटसमयी न घाबरण्याची आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची प्रेरणा मिळते. शांतता ही कमजोरी नसते; गरज पडल्यास तिच्यातून सामर्थ्यही प्रकट होते. ‘श्री चंद्रघंटा माताय नमः’
चौथी शक्ती : सर्जनशीलतेची
कुष्मांडा म्हणजे निर्मितीची ऊर्जा. घर सजवणाऱ्या हातांपासून नव्या विचारांना जन्म देणाऱ्या मनापर्यंत स्त्रीच्या सर्जनशीलतेचा आविष्कार असतो. छोट्या कृतीतूनही मोठा आनंद निर्माण करता येतो. ‘श्री कुष्मांडा माताय नमः’
पाचवी शक्ती : ममतेची
स्कंदमातेच्या रूपात आईची माया, वात्सल्य आणि त्याग सामावलेला आहे. ममता ही केवळ भावना नसून, ती पुढची पिढी घडवणारी अदृश्य शक्ती आहे. ‘श्री स्कंदमाताय नमः’
सहावी शक्ती : संघर्षाची…!
कात्यायनी सांगते की संकटांपासून पळून न जाता त्यांच्याशी दोन हात करावेत. आयुष्यातील प्रत्येक संघर्ष आपल्याला अधिक सक्षम आणि कणखर बनवत असतो. ‘श्री कात्यायनी माताय नमः’
सातवी शक्ती : अंधारावर मात करण्याची
कालरात्रीचे रूप भयावह दिसत असले, तरी तिच्यामागे प्रकाशाचा संदेश आहे. आपल्या मनातील भीती, नकारात्मकता, अज्ञान आणि निराशेचा अंधार दूर करून आशेची ज्योत तेवत ठेवणे हीच खरी साधना. ‘श्री कालरात्री माताय नमः’
आठवी शक्ती : निर्मळतेची
महागौरी आपल्याला बाह्य सौंदर्यापेक्षा अंतःकरणाच्या निर्मळतेचे महत्त्व सांगते. विचार सुंदर असतील, मन स्वच्छ असेल आणि कृती निर्मळ असेल, तर व्यक्तिमत्त्व आपोआप उजळून निघते. ‘श्री महागौरी माताय नमः’
नववी शक्ती : सिद्धी आणि समाधानाची
सिद्धिदात्री म्हणजे केवळ इच्छा पूर्ण करणारी शक्ती नव्हे, तर आपल्या प्रयत्नांना योग्य दिशा देणारी ऊर्जा. श्रद्धा, परिश्रम आणि सातत्य यांच्या संगमातून जीवनातील खरी सिद्धी प्राप्त होते. ‘श्री सिद्धीदात्री माताय नमः’
नऊ दिवस देवीची आरती करताना आपण तिच्या चरणी फुले अर्पण करतो; पण त्याचबरोबर आपल्या मनातील दुर्गुणांचे निर्माल्यही वाहून टाकायला विसरतो. क्रोधाच्या जागी संयम, भीतीच्या जागी धैर्य, निराशेच्या जागी आशा, मत्सराच्या जागी प्रेम आणि अहंकाराच्या जागी नम्रता आली, तर आपल्या अंतःकरणातच नवरात्र फुलले असे म्हणता येईल.
आजच्या काळातील स्त्री अनेक भूमिका समर्थपणे निभावत आहे. ती मुलगी आहे, पत्नी आहे, आई आहे, सून आहे, मैत्रीण आहे, शिक्षिका आहे, अधिकारी आहे, उद्योजिका आहे. प्रत्येक भूमिकेत ती वेगवेगळ्या रूपांनी सामोरी येते. म्हणूनच आदिशक्तीची उपासना म्हणजे स्त्रीच्या या अदृश्य सामर्थ्यालाही नमन करण्याचा उत्सव आहे.
चला, या नवरात्रीत देवीसमोर केवळ सुख-समृद्धीची याचना न करता संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य, योग्य निर्णय घेण्याचे शहाणपण, मन निर्मळ ठेवण्याची शक्ती आणि इतरांच्या आयुष्यात प्रकाश पेरण्याचे सामर्थ्य मागूया. कारण देवी बाहेर कुठेतरी नाही; ती आपल्या श्रद्धेत आहे, आपल्या कृतीत आहे आणि आपल्या अंतःकरणात जागी होणाऱ्या प्रत्येक सकारात्मक शक्तीत आहे. “या नवरात्रीत देवीची पूजा करूया आणि तिच्यातील एक तरी गुण आपल्या जीवनात रुजवूया.”
नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या सर्व मराठी वाचकांना मंगलमय शुभेच्छा!
अनिता अनिल व्यवहारे
ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर
(लेखिका निवृत्त पदवीधर शिक्षिका आहेत.)
============



