गोडगोजिरी मुलगी हवी..
स्वाती मराडे-आटोळे इंदापूर, पुणे

गोडगोजिरी मुलगी हवी..
आजकाल पहिला मुलगा झाला की, अनेकजण दुसरे मूल होऊच देत नाहीत. मुलगी झाली तर दुसरे मूल होऊ देतात, पण मुलगा झाला की का नाही? कदाचित मुलगा झाला आता काय दुसऱ्याची गरज ? असे वाटत असेल असे मला वाटायचे. पण आवर्जून अशा काही व्यक्तींशी बोलल्यावर माझ्या लक्षात आले की दोन मुली असतील तरी चालेल पण दोन मुलगे नको रे बाबा..! असा विचार आता रूजत आहे आणि मुलगी नसल्याची खंतही जाणवत आहे. मुलगी नसेल तर मनात खंत निर्माण झालेली मी जवळून अनुभवली. पण त्यातूनही काढलेला एक सुरेख मार्गही पाहिला. त्याच्या वडिलांना चार बहिणी. कुठलाही सुखद कार्यक्रम असो किंवा काही दुःखद प्रसंग असो या चारही बहिणी येऊन भावाला मोठा पाठिंबा द्यायच्या. पण याला मात्र बहीण नव्हती.
रक्षाबंधन आलं किंवा दिवाळी आली की, सगळ्या आत्या आलेल्या पाहून आनंद तर व्हायचा पण आपल्याला बहीण नाही ही खंतही मनात कुठेतरी चमकून जायची. याचंही लग्न झालं आणि दोनच वर्षांत पहिला मुलगा झाला. पहिलेपणाचं सगळं कोडकौतुक करून झालं. चार वर्ष झाली पण मनात दुसरे मूल होऊ देण्याचा विचार आला की वाटायचे मुलगी होईल ना? आणि पुन्हा मुलगाच झाला तर.. त्यापेक्षा नकोच. पुन्हा कधीतरी वाटायचं आपल्यालाही बहीण नाही पण आपल्या मुलाला तरी नको का? काय करावे.. मार्गही सुचेना.
याच काळात मेहुणीला एक मुलगी झाली होती. दुसऱ्या वेळी ती गरोदर राहिली पण काय होईल हे तर सांगता येणार नव्हते. मग या दोघांनी तिला विचारले मुलगा झाला तर तुझा आणि मुलगी झाली तर आम्हाला देशील का? तीही तयार झाली. तिला दुसऱ्या वेळीही मुलगी झाली. ती झाल्यापासून याच्या बायकोने चार सहा महिने तिथेच राहून तिचे बाळंतपणही केले आणि मुलीलाही तिची सवय लावली. नंतर ती मुलीला घेऊन घरी आली. अगदी छान स्वागत केले. घर व याचे मनही आनंदाने फुलून गेले. मागच्या आठवड्यात अगदी मोठा वाढदिवस साजरा केला. वेगळा विचार करून, मनातील खंत दूर करणारे आधुनिक नंद यशोदा पाहून मलाही मनापासून आनंद झाला.
स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
सहसंपादक साप्ताहिक साहित्यगंध





