निंदेतून स्वावलंबनाकडे
माधुरी घनश्याम कावडे तालुका वणी, जि.यवतमाळ
निंदेतून स्वावलंबनाकडे
प्रियंका रोज शाळेला जाण्यासाठी शाळेच्या बसवर अवलंबून राहायची. वेळ पाळण्याचा तिचा प्रयत्न असायचा. पण, अनेकदा घरगुती कामामुळे तिला थोडा उशीर व्हायचा. एके दिवशी नेहमीप्रमाणे ती धावत बसमध्ये चढली. आत बसलेले सर हसत पण टोमणेखोरपणे म्हणाले” वेळेत या बरं का नाहीतर आम्ही थांबणार नाही, गाडी निघून जाईल”. त्या सरांचे बोलणे प्रियंकाच्या मनाला खूप लागले. तेव्हा तिने मनाशीच ठरवलं..! “मी नेहमी दुसऱ्यांवर अवलंबून राहिले तर माझं नुकसानच होईल. खरंच दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभार बुडाला. आता मला आत्मनिर्भर बनायचं आहे.”
त्या प्रसंगातून आलेला राग यातून तिने कार शिकण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला बऱ्याच चुका झाल्या. क्लच न पेलल्याने गाडी बंद पडायची, वळणावर गोंधळ व्हायचा. पण तिने हार मानली नाही. सोबत येणारे ड्रायवर काका म्हणाले, “मॅडम चुका झाल्याशिवाय शिकता येत नाही. संयम ठेवा हळूहळू जमेल”. हे शब्द तिच्यासाठी लाख मोलाचे ठरले. आणि सरावाने तिचा आत्मविश्वास पुन्हा वाढू लागला. काही महिन्यात ती उत्तम गाडी चालवायला शिकली आणि ती स्वतः कारने शाळेला जाऊ लागली. वेळेतच शाळेवर इतर सहकारी शिक्षिकांना घेऊन जाई.
एके दिवशी तिची कार शाळेच्या प्रांगणात ठेवली असताना त्यात ड्रायव्हर नाही. असं सरांच्या लक्षात आले तेव्हा ते हसत हसत थांबून म्हणाले , ” अरे वा प्रियंका मॅडम! आता तर स्वतःची कार? छान आहे! खरंच खूप मोठं पाऊल टाकलंयस तुम्ही ” त्या क्षणी प्रियंका हसली आणि शांतपणे म्हणाली हो सर तुमच्या बोलण्यामुळे मला कार शिकायची प्रेरणा मिळाली. तेव्हा राग आला होता, पण निंदेनेच मला स्वावलंबन शिकवलं.” त्या क्षणी बाबांनी पण सांगितलेल्या दोन गोष्टी मला प्रकर्षाने आठवल्या ते म्हणजे, ‘निंदकाचे घर शेजारी असावे’. कारण निंदेमुळे आत्मपरीक्षण करून प्रगती करू शकतो. अन् दुसरी, ‘दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभार बुडाला’. कारण खरा आधार हा स्वावलंबनाचाच असतो…!!
माधुरी घनश्याम कावडे
तालुका वणी, जि.यवतमाळ



