0
4
8
2
3
5
नवखा वारा
कधी वाटते जावे फिरूनी
आज पुन्हा त्या ओढ्याकाठी
जिथे लटकत पारंब्यांना
झुलत टळली दुपार कोवळी
अन् उगीच हुंदडत हुंदडत
कधी बांधावरुन पाकुळ्यांचे शोषीत रंग
एका मागून एक नवे अन्
फुलांच्या रंगात भिजलो
तुरे होऊनी गवताचे भिजल्या
नाचत गेलो…धावत गेलो….
धून झ-याची निवांत ऐकत
सायंकाळी कधी बैसलो
अंधाराशी खेळत झिम्मा…!
आज नसावे चिटपाखरूही
त्या विरान पडक्या वाड्यापाशी
कधी रंगला खेळ गड्यांचा
लपाछपी अन् धांगडधिंगा ..!
कोण विचारील त्या वाड्याला
कुठे तुझे ते गजबजलेपण…?
कठीण चालणे वाळूमधूनी
पावलांचे उचलीत ओझे
नच वाटांच्या मायेत अडकणे
नव्याच वाटा गिरवीत बसणे
कधी वाटते जावे परतून
निवांत बसल्या त्या खडकावर
गिरवीत रेषा बालपणीच्या
जिथे खेळतो नवखा वारा
आज मांडूनी प्रौढ पसारा…!
गोविंद रोकडे
ता.सेलू जि परभणी
========
0
4
8
2
3
5



