आज लोकमान्य टिळक असते तर…!
अनिता व्यवहारे
आज लोकमान्य टिळक असते तर…!
“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच…!” अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक! चिखलातून उमलणाऱ्या कमळाप्रमाणे चिखली या गावात 23 जुलै 1856 रोजी जन्मलेलं हे सुगंधी व्यक्तिमत्त्व… आणि 1 ऑगस्ट 1920 रोजी आनंदात विलीन झालेलं. परंतु त्यांच्या त्या सिंहगर्जनेचा सूर आज पुन्हा ऐकू यावा, असं सतत वाटतं. आज त्यांच्या लेखणीची धार, त्यांची प्रखर जाणीव आणि त्यांच्या विचारांची दिशा समाजाला पुन्हा हव्यात. धर्म रक्षणासाठी परमेश्वर अवतार घेतो, हे खरं की खोटं माहित नाही, पण इतिहास सांगतो.
जेव्हा जेव्हा समाजात अराजक माजतं, अन्यायाचं पारडं जड होतं, तेव्हा टिळक, गांधी, नेहरू, आगरकर, सावरकर यांच्यासारखे महापुरुष समाजाला दिशा देण्यासाठी जन्म घेतात.
लोकमान्य टिळक हे असेच एक तेजस्वी नेतृत्व होतं.
त्यांनी इंग्रजांच्या जुलमांनी गलितगात्र झालेल्या समाजात आत्मविश्वासाचं बीज पेरलं. अन्यायाविरोधात उभं राहण्याचं बळ दिलं. म्हणूनच त्यांच्या काळात हसत-हसत फासावर जाणारी तरुण पिढी तयार झाली. टिळकांची लेखणी जितकी धारदार होती, तितकीच ठाम आणि तितकीच स्फूर्तिदायक. आज समाजात जागृतीची ज्वाला पुन्हा पेटवण्याची गरज आहे. कारण ज्या स्वातंत्र्यासाठी टिळकांनी प्राणपणाने लढा दिला, त्या स्वातंत्र्यातील शिक्षण, राजकारण आणि समाजजीवन आज भ्रष्टाचाराने बरबटून गेलं आहे. शिक्षणातील भ्रष्टाचार केवळ विद्यापीठापुरता मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे. जर टिळक आज असते, तर त्यांनी अर्धी शक्ती या व्यवस्थेतील भ्रष्टाचार निर्मूलनासाठी वापरली असती. शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्याचं साधन न राहता, सजग आणि विचारवंत नागरिक घडवण्याचं प्रभावी माध्यम त्यांनी केलं असतं.
हाडाचे शिक्षक असलेल्या टिळकांनी आधुनिकतेची आणि परंपरेची सांगड घालून युवकांमध्ये देशभक्तीचा दीप उजळवला असता. त्यांच्या धारदार लेखणी, जहाल वाणी, आणि प्रखर बुद्धिमत्तेच्या जोरावर युवकांना आदर्श नागरिक बनवलं असतं. शिक्षणाबरोबर आरोग्य आणि चारित्र्याचेही महत्त्व ते अधोरेखित करत असते. त्यांनी सुरू केलेले सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती हे सण सामाजिक ऐक्याचं प्रतीक होते. आज मात्र हेच सण धांगडधिंगा आणि स्पर्धेचं रूप घेऊन गोंधळात भर घालतात. टिळक असते, तर त्यांनी ठणकावून सांगितलं असतं – “बंद करा हे उत्सव!”
किंवा, त्यांनी सोशल मीडियाचाच वापर करून युवकांमध्ये विचारांची आणि कृतीची क्रांती घडवली असती.
राजकारणातील भ्रष्टाचार पाहता, त्यांच्या तळपत्या अग्रलेखांतून ते आजच्या तरुणांना पुन्हा विचार करायला भाग पाडले असते.
“या देशातील तरुण झोपले आहेत काय?” ते ठणकावून राजकारण्यांना सांगितले असते… “राज्य करणं म्हणजे भ्रष्टाचार करणं नव्हे, तर राष्ट्र घडवण्याचं पवित्र कार्य आहे!” देश संस्कृती आणि विकासाच्या चर्चेत गुंतला असताना, काश्मीरसारखा प्रश्न ‘भिजत घोंगडं’ बनून पडून राहिलेला त्यांनी नक्कीच पाहिला नसता. भ्रष्टाचाराच्या भस्मासुरापासून देशाच्या चारित्र्याची राख होण्यापासून त्यांनी नक्कीच वाचवलं असतं.
आजचे अग्रलेख केवळ पांढऱ्या कागदावर काळी अक्षरं म्हणून उरलेत. पण टिळक असते, तर त्यांनी या समाजाला पुन्हा चैतन्य देणारी सामाजिक पुनरुज्जनाची चळवळ उभी केली असती. ते जसे स्वराज्यासाठी पेटून उठले, तसे आजही त्यांनी विचारांचं वादळ निर्माण केलं असतं. त्यांच्या तेजस्वी विचारांनी देशातील युवकांना स्वाभिमानाची पंखं मिळाली असती.
“उषःकाल होता होता काळरात्र झाली”
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली…!
तुम्हांला ही असच वाटतं असेल ना…!
कारण, ‘टिळक म्हणजे ठामपणा, टिळक म्हणजे विचार, टिळक म्हणजे कृती!’ आज प्रत्येक युवकात टिळक जागा होणं हीच खरी काळाची गरज आहे. लोकमान्य टिळक यांना विनम्र अभिवादन…!
अनिता व्यवहारे
ता. श्रीरामपूर, जि.अहिल्यानगर



