लाडक्या बहिणाचे ‘आशीर्वाद मूल्य’ २१०० ?
तारका रुखमोडे गोंदिया

लाडक्या बहिणाचे ‘आशीर्वाद मूल्य’ २१०० ?
राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे घमासान वारे वाहू लागले नि विधानसभेच्या रिंगणात विजयासाठी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत रणधुमाळी अक्षरश: पेटली. स्वतःच्या स्वार्थासाठी एकमेकांच्या विरोधात योजनांचा अक्षरशः पाऊस पाडला गेला. कुणी लाडक्या बहिणीला गिफ्ट दिले; तर कुणी लक्ष्मीला महालक्ष्मीच्या आमिषाचे वरदान द्यायला सरसावले. साम-दाम-दंड-भेदाची बाजीही यावेळी सारीपाटावर कमी पडली, नि ते खेळणाऱ्या पुरुषांच्या मांदियाळीत पुरुषार्थ कमी पडत होता की काय बहिणीच्या पदराचा आधार राजकीय श्रीमुखाला यावेळी घ्यावा लागला.
गेल्या दोन तपांपासून मी राजकीय पटातील राजकारणाचा नूर बघते आहे. डावा असो वा उजवा, त्यात मला स्वार्थाने बरबटलेला आत्मकेंद्री नूरच दिसतो आहे. यावेळी तर राजकारणाच्या या रस्सीखेचात चक्क बहिणींना जोगवा मागितला गेला. काही बहिणींनीही आमचे लाड पूर्ण होतील या आशेने की काय चक्क २१०० रु. च्या आमिषाचा आशीर्वाद दिला. पण हा जोगवा नक्कीच महागात पडणार आहे. परिणामतः महागाईचा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा हा भडका उडेल त्यावेळी जनता नक्कीच राज्यकर्त्यांना बहिणींना गिफ्ट देताना कुणाकुणाचे खिशे कापले गेले याचा जाब विचारणार आहे. जेव्हा हा जाब विचारला जाईल तेव्हा हे राजकारणी स्वतःचे श्रीमुख कुणाच्या पदराआड लपवणार आहेत? ‘देव’ भाऊ जाणे.
बरं..! यातून काय साध्य होत आहे? हाही मनास पडलेला प्रश्नच आहे. खरे आदर्श वाचक असाल तर सांगा बरे..दीड हजारातले १५ पैशेही लाडक्या बहिणीने आपल्या हक्काच्या लाडक्या नवरोबाला फेकून मारले का? चला कुणी मारलेही असतील तरी.. दीड वा तीन हजारात पाड्या, रस्त्यातील लोकांचा रणरणत्या उन्हातील पाण्याच्या पायपीटीचा शोध खरेच कमी होईल का? ज्या डाळिंब कांदा, बोरांच्या बागांसोबत माणसाच्या काळजातले अंकूर कधीच सुकून गेलेत; त्याला नव्या कोंबांचे धुमारे फुटतील काय बळीराजाच्या मनात करपलेलं हिरवं स्वप्न फुलून येतील काय? कर्जाच्या ओझ्याखाली प्राण गमावलेल्या कुणब्यांचे प्राण परत येतील काय? लाडक्या भाच्यांचा बेरोजगारीचा प्रश्न सुटून त्यांना रोजगार मिळेल काय? ओसाडावरील रापलेल्या चेहऱ्यांच्या लक्ष्मींच्या नारायणांचा कोरडा घसा खरंच एवढ्या पैशात ओलिताखाली येईल का? हेही न सुटणारे कोडंच आहे.
पाच वर्षांनी म्हणणण्यापेक्षा पुढील वर्षीच सत्तेतील ‘लाडका भाऊ’ बदलला तर अजून पुढे काय मग? लाभधारक म्हणून लाभार्थीला लाचार बनवण्याच्या या योजना काही तुकडे फेकून सर्रासपणे भीक घातली जात आहे. ज्या महाराष्ट्राने देशाला उच्च पातळीवर नेण्याचे स्वप्न स्रियांच्या उच्च मानसिकतेच्या बळावर पाहिले, तो माझा महाराष्ट्र अशा लाचारीच्या योजना, आशीर्वाद मिळवण्यासाठी करतोय. या कुबड्यांच्या आधारावर बहीण सक्षम व स्वावलंबी होईल का? आणि नातं घट्ट होईल का? निवडणूकीतील यशासाठी जर अशा योजनांचे डावपेच खेळले जात असतील, तर त्याचा फायदा स्त्रियांना होतोय का? खरंच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
प्रत्येक हाताला मजबूत बनवण्यासाठी हाताला काम हवे. ‘स्वावलंबन शिकवणे हीच काळाची गरज आहे’. बहिणींना सक्षम करायचे असेल, तर राखीचे असे योजनारुपी गिफ्ट देऊन आपण बहिणींना अधू तर बनवत नाही ना? या कुबड्यांच्या आधारावर बहीण सक्षम होईल का? तिचं जीवनमान सुधारेल का? त्यापेक्षा वैदर्भीय बहिणींना तिच्या लाडक्या नवरोबाला, शेताला हमीभाव द्या. इथल्या माती व पाण्याशी नात्यांची वीण घट्ट विणावी म्हणजे, ‘लाडकी बहीण’ असो वा ‘महालक्ष्मी’ यांचा आशीर्वाद लाडक्या भावांना आपोआपच लाभेल. त्यासाठी कुणापुढेही हात जोडण्याची गरज भासणार नाही. “बळीराजाला आधी न्याय द्या म्हणजे तुमच्या लाडक्या बहिणी सुखात राहतील.” त्यासाठी २१०० रु.आशीर्वाद मिळवण्याच्या लाजिरवाण्या योजनांची आखणी करावी लागणार नाही.
सद्यस्थितीतील राजकारणामुळे हरवलेली विकासाची दिशा व झालेली दुर्दशा याकडे लक्ष देणे जास्त गरजेचे असे मला वाटते. माझ्या लाडक्या बहिणींनो आपणही आपल्या आत्मसन्मानासाठी आत्मनिर्भर बनून, सक्षम बनून कल्याणकारी राज्य संकल्पनेस कुठल्याही आमिषाला बळी न पडता हातभार लावावा असं मला वाटतं. कारण, बहुमतातील सरकारमध्ये विरोधी पक्षनेता नसेल असेही ऐकिवात येत आहे. कारण, पुरेसे संख्याबळ कोणत्याही पक्षाकडे नसल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली असून विरोधी पक्षनेता निवडीचे अधिकार विधानसभेला तद्वतच अध्यक्षला आहे. राजकारणाचं काहीही असो, पण लाडक्या बहिणेचे वाढलेले ‘आशीर्वाद मूल्य’ संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे.
तारका रूखमोडे
ता.अर्जुनी मोरगाव जि.गोंदिया





