धर्मसंस्कृतीचे मोरेश्वर जोशींचे कार्य मोलाचे’; विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर
कीर्तनकार मोरेश्वर जोशी अमृतमहोत्सव सोहळा
‘धर्मसंस्कृतीचे मोरेश्वर जोशींचे कार्य मोलाचे’; विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर
कीर्तनकार मोरेश्वर जोशी अमृतमहोत्सव सोहळा
अमृता खाकुर्डीकर, पुणे
पुणे.(दि.20 ऑक्टो): “देवर्षी नारद यांनी कीर्तन कलेचे प्रवर्तन केले असून कीर्तनात काव्य, वाद्य, नृत्य,नाट्य, गायन, ताल, पाठांतर, वक्तृत्व, बहुश्रुतता आणि शिष्टाचार अशा दहा कलांचा संगम घडवून आणला. तोच आदर्श घेऊन जनमानसावर अतिशय प्रभाव टाकणा-या कीर्तन माध्यमातून समाज प्रबोधनाचे मोठे कार्य सद्गुरू मोरेश्वर जोशी, चऱ्होलीकर हे गेली पन्नास वर्षे अव्याहतपणे करीत आहेत”असे गौरवोदगार विद्यावाचस्पती आणि आदित्य प्रतिष्ठानचे प्रमुख डॉ.शंकर अभ्यंकर यांनी काढले.
बाल शिक्षण सभागृहात राष्ट्रीय कीर्तनकार सद्गुरू मोरेश्वर जोशी यांचा अमृत महोत्सव आणि कीर्तन क्षेत्रातील कामाचा सुवर्ण महोत्सव या दुहेरी निमित्ताने कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शंकर अभ्यंकर बोलत होते. यावेळी संकेश्वर करवीर पीठाचे शंकराचार्य श्री सच्चिदानंद विद्यानृसिंह भारती, रा.स्व संघ अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहास हिरेमठ,प्रांत संघचालक नाना जाधव, सोहळा समिती अध्यक्ष वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले हे व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमात सुरवातीला संयोजकांच्या वतीने मान्यवरांचा सन्मान करण्यात आला आणि “कृतज्ञता गौरव विशेषांका”चे प्रकाशन करण्यात आले. महावस्त्र,पगडी आणि मानपत्र देऊन मोरेश्वर जोशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या सत्काराला उत्तर देताना मोरेश्वर जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले,”आजचा गौरव हा व्यक्तीचा नाही तर संस्काराचा आणि सत्कार्याचा आहे. मी जीवनभर कीर्तन ही कला जगलो. समाज प्रबोधन हे कीर्तनाचे मुख्य ध्येय समोर ठेवले. या कार्यात मला सहयोग देणार्या सर्वांना मी हा सन्मान समर्पित करतो” अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचा शुभारंभ करताना ईशिता जोशी यांनी शारदास्तवन गायन केले. वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले यांनी प्रास्ताविक केले. गीताव्रती संध्या कुलकर्णी यांनी गीतेतल्या पंधरावा अध्यायचे पठण केले.यावेळी मोरेश्वर जोशी गौरवांकाचे प्रकाशन करण्यात आले. सुहास देशपांडे यांनी जोशी दांपत्याची प्रकट मुलाखत घेऊन त्यांचा जीवनप्रवास उलगडला.अंजली कर्हाडकर यांनी सूत्रसंचालन केले. स्मिता देशपांडे यांनी आभार मानले. जान्हवी गोखले यांच्या पसायदान गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.





