एक अभिनव उपक्रम ‘कृतीतून शिक्षण: नकाशावाचन’
माधुरी घनश्याम कावडे (शिक्षिका) जि. प. उच्च प्राथमिक शाळा ढाकोरी ता.वणी जि. यवतमाळ
एक अभिनव उपक्रम ‘कृतीतून शिक्षण: नकाशावाचन’
शिक्षण हा केवळ पाठ्यपुस्तकातील मजकूर समजून घेण्याचा हेतू नसून, त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभवातून आत्मसात करण्याची प्रक्रिया आहे. आजच्या युगात विद्यार्थ्यांना फक्त ऐकवून शिकविण्यापेक्षा त्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याची संधी दिल्यास शिक्षण अधिक अर्थपूर्ण, टिकाऊ व आनंददायी बनते. हाच विचार मनात ठेवून मी शाळेत एक अनोखा उपक्रम राबवला.त्या दिवशी शाळेमध्ये शिक्षकवर्ग उपलब्ध नसल्यामुळे मी एकटीच कार्यरत होते. अनेक वर्गातील विद्यार्थ्यांना एकत्र सांभाळणे, त्यांचे लक्ष केंद्रित ठेवणे तसेच अभ्यासात रस निर्माण करणे हे मोठे आव्हान होते. मुलांना फक्त शांत बसवून ठेवणे हा उद्देश नव्हता, तर त्यांना कामात गुंतवून ठेवत शिकविणे हे महत्त्वाचे होते. म्हणूनच मी भूगोल विषयातील नकाशावाचन हा घटक प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून शिकवण्याचे ठरवले.
नकाशा हा भूगोल विषयाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. नकाशा पाहून भूप्रदेश, सीमा, नद्या, पर्वतरांगा, राज्ये, राजधानी, समुद्र, मार्ग इत्यादी माहिती सहज मिळते. परंतु ही माहिती फक्त पुस्तकातील चित्रात दाखवली तर मुलांना ती समजते, पण ती मनावर बिंबत नाही. म्हणून विद्यार्थ्यांनी स्वतः भारताचा नकाशा काढण्याचा उपक्रम घेण्यात आला.
सर्वप्रथम विद्यार्थ्यांना दिशा, प्रमाणमान, नकाशातील संकेतचिन्हे, रेषा व रंगसंगती यांची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी कागद, पेन्सिल, रफतक्ता आणि रंग यांच्या साहाय्याने भारताचा रूपरेषा नकाशा काढण्यास सुरुवात केली.
विद्यार्थ्यांनी प्रथम देशाच्या बाह्य सीमारेषा आखल्या, नंतर राज्यांच्या सीमारेषा, त्यांची नावे, राजधानी, महत्त्वाची शहरे इत्यादी राजकीय घटक नीटपणे नोंदवले. त्यानंतर त्यांनी पर्वतरांगा, पठारे, नद्या, समुद्रकिनारा, मैदानं, वनक्षेत्र अशा प्राकृतिक घटकांचे चित्रण केले. नकाशा काढण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थी इतके तल्लीन झाले की त्यांना वेळ कसा गेला तेही कळले नाही. काही विद्यार्थी नकाशाच्या मापावर लक्ष केंद्रीत करत होते, तर काही नावांची अचूक मांडणी करत होते. काहींनी नद्यांच्या दिशेचा अभ्यास करून त्या योग्य ठिकाणी रेखाटल्या. कार्य पूर्ण झाल्यावर प्रत्येक विद्यार्थ्याकडे माहितीपूर्ण, रंगीत व आकर्षक असा भारताचा नकाशा तयार झाला होता. त्या नकाशावर नजर टाकली की, भारताचे भूगोलचित्र डोळ्यासमोर उभे राहात होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अनेक चांगले अनुभव मिळाले. त्यांनी भारतातील विविध राज्यांतील भौगोलिक वैशिष्ट्ये ओळखली, दिशानिर्देशांवर आधारित नकाशावाचन शिकलो, माहितीचे विश्लेषण करण्याची सवय लागली, तसेच नकाशा रेखाटताना सौंदर्यदृष्टी, समन्वय, परस्पर सहकार्य आणि कल्पकता यांचा विकास झाला. महत्वाचे म्हणजे हा विषय त्यांना अवघड न वाटता अत्यंत रोचक वाटू लागला.
आजच्या काळात कृतीतून शिकवलेले ज्ञान अधिक काळ स्मरणात राहते. नकाशावाचन या उपक्रमाने विद्यार्थ्यांना केवळ भूगोल विषयाची माहितीच दिली नाही, तर कसे शिकावे याची दिशा दिली. हा अनुभव विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पोषक असा होता. प्रत्यक्ष कृतीमधून शिकण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष जाणले आणि भूगोल हा विषय त्यांच्या दृष्टीने आकडेमोडी किंवा आकृत्या असलेला विषय नसून एक शोधयात्रा ठरला.
माधुरी घनश्याम कावडे (शिक्षिका)
जि. प. उच्च प्राथमिक शाळा ढाकोरी
ता.वणी जि. यवतमाळ



