“नाती म्हणजेच वास्तवतेचा आधार”; स्वाती मराडे
गुरूवारीय चित्रकाव्य स्पर्धेचे परीक्षण

“नाती म्हणजेच वास्तवतेचा आधार”; स्वाती मराडे
गुरूवारीय चित्रकाव्य स्पर्धेचे परीक्षण
जिथे जिथे संवेदना असते, तिथे भावना असते. जिथे भावना असते तिथे या हृदयिचे भाव त्या हृदयी पोचतात व तयार होते एक नाते. काही नाती जन्मबंधनातून लाभतात तर काही हृदयबंधनातून तयार होतात. खूप माणसं भेटतात आयुष्यात पण ज्यांच्या सोबत असल्याने हा जीवनप्रवास सुखद होतो तिथे तयार होते नात्याची गुंत. ओॲसिस भेटावं तसं ही माणसं आयुष्याच्या रखरखीत वाळवंटातही मन करतात ओलंचिंब.
त्या व्यक्तीसमोर चेहऱ्यावरचा मुखवटाही गळून पडतो. हृदयातील सल बाहेर येतो, आनंदक्षण सोहळा होतो. जर एक नाते दिप असेल तर दुसरे सोबत जळणारी वात होते. एक असेल थरथरणारा दिवा तर दुसरे थरथरणा-या दिव्याभोवतीचा हात होते. तमामध्ये चाचपडत असताना आशेचे किरण घेऊन व सोनेरी छटा लेऊन येणारी सकाळ होते. एक लाट तर दुसरे किनारा.. आवेगाने वाहत येता सावरणारा.. भावनांना वाट करून देणारा तो हक्काचा खांदा, कधी सोबत असताना वास्तव आधार, तर दूर असताना आठवणींच्या रूपात सोबत करणारी ही नाती आपल्या सुखदुःखाशी एवढी जवळीक करतात की आपोआपच नात्यांचे बंध घट्ट होत जातात.
रेशमी धाग्यांची ही नात्याची गुंत
सर आनंदाची अन् फुलणारा वसंत..
पण कधी कधी मतभेदाचा अदृश्य पडदा मध्ये येतो आणि हेच जीव गुंतलेले नाते गुदमरते..अन् नात्याची गुंत सैल होते. हृदयात प्रेम, माया, करूणा, आदर असेल, अपेक्षांचे ओझे नसेल, तर पाण्यावर काठी मारली तर पाणी दुभंगत नाही त्याप्रमाणे नातेही अभंग राहते. गैरसमजाची मुळे वृक्षाचा भार पेलतील का? मतभेदाचा धागा गुंफण अखंड ठेवेल का?, अपेक्षांचे ओझे लादले तर नाते टिकेल का? विश्वासाचा पायाच कच्चा असेल तर नात्यांचे घर अबाधित राहील का? म्हणूनच नात्यांना दंश करणारे हे विषारी गैरसमज, अहंकार-ईर्षेची भिंत.. नात्यामधून हटवावी व नात्यांची रेशीम गुंफण अबाधित ठेवावी.
आज चित्रचारोळी स्पर्धेसाठी आलेले चित्र ‘नात्याची गुंत’ हे शिर्षक घेऊन. ३६ च्या आकड्याप्रमाणे तोंड फिरवून बसलेले, जणू रूसलेले.. तरीही मागे सोनेरी छटेने आशेचा किरण ल्यालेले.. हे सगळे सार घेऊन आजच्या रचनांनी मनाचा ठाव घेतला. खरंय ना.. दोन्ही बाजूंनी नात्यांची योग्य गुंफण असेल तर ना ती सैल होईल ना ती सुटेल.. ना बोचरे व्रण देईल. अशीच आपली लेखणी बहरत राहो या शुभेच्छांसह सहभागी रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन.आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार.
स्वाती मराडे, इंदापूर जि.पुणे
मुख्य परीक्षक,सहप्रशासक, कवयित्री, लेखिका
©मराठीचे शिलेदार समूह





