“द. आफ्रिकेचा लॅार्डसवर टेंभा”; डॅा अनिल पावशेकर
स्तंभलेखक: अगं बाई अरेच्चा
“द. आफ्रिकेचा लॅार्डसवर टेंभा”; डॅा अनिल पावशेकर
प्रचंड उत्सुकता लागलेल्या कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत द.आफ्रिका संघाने बलाढ्य ॲासी संघाला खडे चारत पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत एडन मार्करम आणि टेंबा बवुमाने कांगारूंचा प्रतिकार करत लॅार्डसवर विजयाचा टेंभा मिरवला आहे. आयसीसी स्पर्धेत सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या द.आफ्रिकेला यश वारंवार हुलकावणी देत होते. मात्र यावेळी त्यांचे नशीब फळफळले आणि तब्बल २७ वर्षानंतर त्यांचा आयसीसी चषकाचा दुष्काळ संपुष्टात आला आहे.
झाले काय तर द. आफ्रिका, वेस्ट इंडीज आणि न्यूझीलंड हे तीन संघ कायम अस्सल क्रिकेट रसिकांच्या गुड बुक्स मध्ये आहेत. यापैकी वेस्ट इंडीज आणि किवी संघाने आयसीसी चषकाला गवसणी घातली आहे परंतु प्रोटीयाज संघ नेहमीच मोक्याच्या वेळी गळपटत होता आणि हातातोंडाशी आलेला विजय गमावत होता. यामुळेच की काय त्यांना चोकर्स चा टॅग लागला होता. मात्र यावेळी परिस्थिती बदलली होती, टेंबा बवुमाच्या नेतृत्वात या संघाने इतिहास रचत चोकर्सचा डाग पुसून काढला आहे. चौथ्या डावात यशस्वी पाठलाग करताना त्यांनी स्टार्क, हेझलवूड आणि पॅट कमीन्सला भीक न घालता पक्का निर्धार करत अजिंक्यपद प्राप्त केले आहे.
दोन्ही संघांचा विचार केला तर निश्चितच कांगारूंचे पारडे जड होते, त्यातही अंतिम सामना म्हटला की कांगारूंचे बळ दुप्पट होते. फायनलला त्यांचे किलर इंस्टिक्ट कमाल पातळीवर असते. त्याविरूद्ध द.आफ्रिकेचा संघ एकदम सज्जन आणि सोज्वळ. तरीपण शेवटी क्रिकेट म्हटले की “बस समझ लिए” असे नसते आणि हेच या सामन्यात घडले. पहिल्याच दिवशी ॲासी संघ दोनशेत गुंडाळून आफ्रिकन संघाने चढाई जिंकली होती. पण कांगारूंनी जबरदस्त प्रतिहल्ला करत आफ्रिकेला १३८ धावांत गारद केले. तर ॲासींच्या दुसऱ्या डावात पुन्हा एकदा रबाडा ॲंड कंपनीने ॲासींचा कबाडा करत त्यांना २०७ धावांवर रोखले.
पहिल्यावहिल्या कसोटी जेतेपदासाठी आफ्रिका संघाला चौथ्या डावात चांगली कामगिरी करणे गरजेचे होते आणि त्यांच्याकडे मार्करम हा हुकमाचा एक्का होता परंतु पहिल्या डावात त्याने भोपळा न फोडल्याने चिंता वाढली होती. मात्र मार्करमने संघाचा विश्वास सार्थ ठरवला. त्याने मुल्डर, बवुमा, स्टब्स आणि बेडींघम सोबत अनुक्रमे ६१, १४७, २४ आणि ३५ धावांच्या चार महत्त्वपूर्ण भागीदारी रचल्या आणि आपल्या संघाला आयसीसी चषक मिळवून दिला. या कसोटीत दोन्ही संघांशिवाय खरी गंमत आणली तर ती लॅार्डस च्या खेळपट्टीने.
पहिल्या दोन दिवसात खेळपट्टी जणुकाही सळसळती नागीण होती. तिच्या वेग आणि बाऊंसने भलेभले फलंदाज गांगरून गेले. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी प्रत्येकी १४/१४ फलंदाजांना फस्त करत खेळपट्टीने आपले जहाल रूप दाखवले होते. मात्र या रणात पहिल्या डावात ॲासींच्या स्टीव्ह स्मिथ, वेबस्टर यांनी किल्ला लढवला तर आफ्रिकेच्या टेंबा बवुमा आणि बेडींघमला थोडाफार प्रतिकार करता आला. पहिल्या डावात ॲासींना ७४ धावांची बहुमूल्य आघाडी मिळाली होती. मात्र त्यांचा दुसरा डाव पुन्हा एकदा दोनशेत संपल्याने त्यांना मोठी आघाडी घेता आली नाही. ॲासींचे दुर्दैव म्हणा की आफ्रिकेचे सुदैव म्हणा, तिसऱ्या दिवशी खेळपट्टी वाल्याची वाल्मिकी झाली होती.
तिसऱ्या दिवशी पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात प्रत्येकी दोन विकेट्स गेल्या. तिसऱ्या सत्रात तर मार्करम बवुमा जोडीने आरामात फलंदाजी करत सामना पुर्णपणे आफ्रिकेकडे वळविला होता. चौथ्या दिवशीचा खेळ म्हणजे खरेतर आफ्रिकेच्या विजयाची औपचारिकता होती परंतु कांगारूं सहजासहजी सामना सोडणार नव्हते. तरीपण खेळपट्टी आपल्या शांत सौम्य रूपात कायम असल्याने कांगारूंची दाळ शिजली नाही. ॲास्ट्रेलिया संघाने कधी नव्हे ते गचाळ क्षेत्ररक्षण करत सामन्यात पुनरागमनाची संधी दवडली. मार्करमला २३ धावांवर तर बवुमाला ३ आणि ४३ धावांवर जीवदान देत कांगारूंनी आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला.
स्टीव्ह स्मिथ, वेबस्टर आणि ॲलेक्स कॅरी वगळता इतर फलंदाजांचा विशेषतः ट्रॅव्हिस हेडचा फ्लॅाप शो कांगारूंच्या मुळावर आला. तर गोलंदाजीत कमीन्सने पहिल्या डावात सहा बळी जरूर घेतले पण दुसऱ्या डावात तो आणि त्याचे सहकारी बेअसर ठरले. आफ्रिकेच्या रबाडाने दोन्ही डावात धारदार गोलंदाजी करत तब्बल ९ बळी टिपले. त्याला जान्सेन आणि एनगीडीने उत्तम साथ दिली. तर फलंदाजीत पहिल्या डावात पिछाडीवर असतानाही मार्करम बवुमा जोडीने दमदार फलंदाजी करत सामना जिंकून दिला.
टी ट्वेंटी विश्वचषक, चॅम्पियन ट्रॅाफी पाठोपाठ कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत कांगारूंचे गर्वहरण झाले असून द. आफ्रिका नवा विजेता म्हणून उदयास आला आहे. १९९८ ला बांगलादेशात झालेल्या चॅम्पियन ट्रॉफीच्या विजयानंतर या संघाला आयसीसी चषकासाठी जीवघेणी प्रतीक्षा करावी लागली. मग तो स्मिथ असो की एबीडी अथवा शॅान पोलॅाक, डेल स्टेन असो द. आफ्रिका संघाची जेतेपदाला हुलकावनी म्हणजे पप्पू कान्ट डान्स साला होती. मात्र छोटी हाईट बिग फाईट असलेल्या टेंबा बवुमाने आपल्या नेत्रुत्वात आफ्रिका संघाला हिमालयाची उंची गाठून दिली आहे. “छोटे तीर घाव गंभीर” सारखे त्याने तुलनेत कमी अनुभवी संघाला जगज्जेता बनवले आहे. थोडक्यात काय तर टेंबा बवुमाने आपल्या लिलयेने आफ्रिका संघाला “पंगुं लंघयते गिरिम” करून दाखवले आहे.
दिनांक १४ जून २०२५
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com





