काव-कावच्या साक्षीने पितरांचे आशीर्वाद
अनिता व्यवहारे ता.श्रीरामपूर जि.अहिल्यानगर
काव-कावच्या साक्षीने पितरांचे आशीर्वाद
“पितरांच्या स्मृती उजळून येतात,
श्रद्धा-भक्तीने घर-दार सजतात,
कावळ्याच्या काव-कावीतून जणू
आशीर्वादांची सावली लाभते…”
पितृपक्ष म्हणजे आपल्या पूर्वजांची स्मृती जागवणारा, त्यांना कृतज्ञतेने तर्पण करणारा कालखंड. परंपरेनुसार या दिवसांत स्वर्गाची दारं उघडतात आणि आपल्या घराघरांत पितरांचे आगमन होते, असं मानलं जातं. कुणाचे वडील, आजोबा, आई, आजी, काकू सगळेच आपल्या माणसांच्या रूपाने आठवणीत उतरतात. या निमित्ताने घराघरांत पूजा, अर्चा, पंचपक्वान्नांचा बेत, आणि नैवेद्य समर्पयामी म्हणत सजवलेलं ताट दिसतं. कावळ्याच्या रूपाने पितर अन्नाचा आस्वाद घेतात, ही श्रद्धेची आपली परंपरा आहे.
मात्र आजच्या पिढीत या परंपरेचं स्वरूप बदलताना दिसतं.
‘श्राद्ध सेरेमनी’ नावाने कार्यक्रम, फोटोशूट, स्टेटसवर Miss You..!, Love You…! असं वेगळंच काही तरी… जिवंतपणी माणसांना प्रेम, माया, जिव्हाळा न दाखवता मेल्यावर मात्र दिखाऊ कळवळा मांडला जातो. श्रद्धेपेक्षा दिखाऊपणाला महत्त्व देणारी ही प्रवृत्ती खटकणारी आहे.
अशीच माझ्या घरी घडलेली एक गोष्ट. नेहमीप्रमाणे आम्ही पितृपूजा केली, नैवेद्य ठेवला. पण त्या दिवशी ना कावळे आले, ना दहिभात उष्टावला. मन खट्टू झालं. इतक्या वर्षांत असं कधी झालं नव्हतं.
काही चुकलं का? काही विसरलं का?” असं जो तो म्हणू लागला. पण माझ्या मनाला ठाऊक होतं. माझ्या सासूबाई-सासऱ्यांनी माझ्या हातच्या जेवणाला कधीही नाराजी दाखवली नव्हती. मग आज असं का? मनातून त्यांची क्षमा मागितली. आणि दुसऱ्या दिवशी काय आश्चर्य!… रिकामा ताट घेऊन यावं म्हटलं तर… ताटातील अन्न कमी झालेलं दिसलं. बाजूलाच कावळा-कावळीण जणू हसत कुजबुजत होते. अगं बाई, काल खूप घरी पितरांचे आमंत्रण होतं. आधीचं निमंत्रण स्वीकारून गेलो होतो. माझं ही साडीचं कन्फ्युजन झालं. असे कार्यक्रम हल्ली रोजच आहेत. त्यामुळं रोज प्रश्न पडलेला! कोणती साडी नेसायची..म्हणून उशीर झाला!
आम्ही दोघी मनसोक्त हसलो आणि मन समाधानाने भरून आलं. हीच खरी पितृपक्षाची अनुभूती, श्रद्धा, आपुलकी आणि स्मृतींचं जिवंत नातं! “स्मृतींच्या त्या सावलीत आज ही पितर भेटतात, श्रद्धा, प्रेम, आपुलकीने मनी नेहमी जिवंत राहतात.”
अनिता व्यवहारे
ता.श्रीरामपूर जि.अहिल्यानगर
========



