पूर्ण केली मनातली इच्छा.. त्या भगवंताने
सौ. स्वाती मराडे-आटोळे
पूर्ण केली मनातली इच्छा.. त्या भगवंताने
सुमारे दहा वर्षांपूर्वीचा घडलेला हा प्रसंग. संत तुकारामांच्या पालखी मार्गावर रहात असूनही, आपण काल जवळच असलेल्या पालखी मुक्कामाच्या गावी जाऊन दर्शन घेऊ शकलो नाही याची खंत वाटत होती. आज रजा काढून दर्शनासाठी थांबायचे का? हा विचार मनात आला. पण नको दर्शनासाठी रजा काढून थांबले तर देवाला तरी ते आवडेल का? त्यासाठी शाळेतल्या ३०-३२ मुलांकडे दुर्लक्ष करून घरी रहायचे. मनाला तेही योग्य वाटेना. शेवटी मनातल्या मनात देवाला नमस्कार केला आणि म्हटले, ‘देवा मनापासून केलेला हा नमस्कार तुमच्या चरणापर्यंत पोहचू दे. दर्शनाची आस होती, पण तरीही शाळेत चाललेय. कदाचित काम न करता दर्शनासाठी थांबलेय हे तुम्हालाही रुचणार नाही.’
शाळेत आले तर काही मुले वाट पाहतच होती, तर काही मुले शाळा बुडवून पालखीसाठी गेलेली होती. वाटले आपणच वेडेपणा केला का शाळेत येण्याचा.. पुन्हा मनात आले, काही मुले तर आहेत ना आपल्या समोर. त्यांच्यासाठी तरी जे केले ते बरोबरच आहे हे मनोमन पटले. त्यानंतर आठ दिवसात आषाढी एकादशी आली. पालखी सोहळे पंढरपुरात पोहचले. पौर्णिमेनंतर पंढरपूरची यात्रा संपली. पालख्या परतीच्या वाटेवर निघाल्या. तेव्हा मला माहितही नव्हते माघारी येताना पालखी किती वाजता व कोणत्या तिथीला मी त्यावेळी रहात असलेल्या गावी येते. त्यामुळे आता परतीच्या मार्गावर आपले दर्शन होईल अशी पुसटशी आशाही मनात नव्हती. पण योगायोग असा की त्यादिवशी मी शाळेतून माघारी येत होते आणि चौकात समोरच संत तुकारामांची पालखी उभी होती.
माघारी येताना पालखीसोबत कमी लोक असतात. त्यामुळे गर्दी तर अजिबात नव्हती. पटकन गाडीवरून उतरले आणि दर्शन घेतले. अगदी निवांतपणे.. दरवर्षी दर्शन घेताना ढकलाढकली, चेंगराचेंगरीत कसेबसे पादुकांना हात लागायचे. आज मात्र डोळे भरून, मन भरून दर्शन घेतले. ध्यानीमनी नसताना अचानक पालखी समोर उभी होती. कशासाठी थांबली होती माहित नाही. पण मला मात्र मनापासून वाटले माझ्या मनात जी दर्शनाची आस होती ती त्या भगवंताने पूर्ण केली. खरेतर दुहेरी समाधान लाभले. रजा काढून थांबले नाही ते कर्तव्यपूर्तीचे व दर्शनलाभ झाला या इच्छापूर्तीचे.
सौ. स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध



