“माझी ताई….!; वैशाली अंड्रस्कर
'आईचं प्रतिरूप म्हणजे ताई'
“माझी ताई….!; वैशाली अंड्रस्कर
‘आईचं प्रतिरूप म्हणजे ताई’
ताई, त्यातही माझी ताई म्हटले की ऊर भरून येतो. काय असते ताई हे रसायन…? आईचं प्रतिरूप म्हणजे ताई. ताई म्हणजे आपल्यापेक्षा मोठी. वयाने, अनुभवाने…कारण ती आपल्या पेक्षा कधी दोन चार वर्षांनी मोठी असते म्हणून तेवढाही अनुभव आपल्यापेक्षा जास्तच.
मग ही मोठी ताई कधी आई घरी नसताना आपल्या धाकट्या भावंडावर अधिकार गाजवते. कधी आई होऊन सांभाळते तर कधी बाबा होऊन रागावते. पण आपण तिचा मनात राग कधीच धरत नाही. कारण ती आपली ताई असते. अशा या ताईला बालकाव्यात गुंफताना सहज शब्द सुचत गेले आणि रचना आकारास आली. ही रचना मुख्य आयोजक व प्रशासक राहुलदादा पाटील आणि मुख्य परीक्षक व प्रशासक सौ. सविता पाटील ठाकरे यांनी सर्वोत्कृष्ट म्हणून निवडली याबद्दल मनापासून आभार…!
ताईची गोष्ट निघाली म्हणून सहज आठवले आपल्या अवतीभवती कित्येकदा अशा ताई असतात ज्यांनी आईबाबा नसताना किंवा आईबाबा असतानाही कुटुंबाची धुरा सांभाळण्यासाठी आपले आयुष्य पणाला लावलेले असते . स्वतःचा विचार न करता आपल्या भावंडांसाठी कित्येक जणी अविवाहित राहतात. नोकरी, कामधंदा करून आपल्या भावंडांना मोठे करतात. अशा ताईंचे ना स्वतःचे कुटुंब असते ना स्वतंत्र घर असते. साऱ्यांना आपलं मानून ती जगत असते. पण कधी कधी वयाने मोठी झालेली, आपापल्या संसारात स्थिर झालेली भावंडं हिला अडगळ समजतात तेव्हा त्या ताईची काय अवस्था होत असेल…? तेव्हा जशी बालपणातील ताई आपली आईच असते तशीच राहावी हीच अभिलाषा…!
आपण सर्वांनी सर्वोत्कृष्ट रचनेबद्दल माझ्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार…!
सौ.वैशाली अंड्रस्कर,चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक
©मराठीचे शिलेदार समूह





