महाकुंभाले गेली गंगी
बचतगटाच्या बाया संग गंगी महाकुंभात गेली आंघोळी ले…
सकायच्या पारी, तिनं संगमात डुबकी मारली,
एक नाही, दोन नाही, तीन डुबक्या मारल्या…
काऊन का! तीन डुबक्या मारल्यानं मने पाप होते नष्ट,
गटातल्या बाया ले गंगी सांगे स्पष्ट…
हात जोडून गंगी उभीच होती,
आपल्या समोर पायते त गंगा, जमुना सरोसत्ती…
गंगी न जोडले हात, नदी मायले मने गंगी,
कित्ती त्तुम्ही मोठ्या,
आमच्या साऱ्यायचे पाप पदरात घेत्या…
एकाच वेळी साऱ्या नद्या बोलल्या गंगी संग,
ऐक गंगुबाई, आम्ही काही पाप पदरात घेत नसतो,
तुमचे साऱ्यांचे पाप आम्ही समुद्राला देत असतो…
गंगी न या गोष्टीचा पिच्छाच पुरवला,
गंगी आता डायरेक्ट जाऊन भेटली समिंदराला.
पाहते त का, समिंद्राले आली मोठी भरती.
गंगीले वाटले आता पाप आले वरती.
कां कोण जाणे, समिंदर बोलला गंगी संग,
गंगुबाई-गंगुबाई इकडे कशा तुम्ही?
गंगी मने, एक प्रश्न होता मनात विचाराले आलो,
पण तुमच्या पोटातले पाप पाहून मी धन्य झालो,
केवढा तुमचा मोठेपणा, किती पाप पोटात…
समिंदर बोले गंगीले,
हे पहा गंगुबाई, हे पाप मी पोटात ठेवत नसतो,
तुमचे साऱ्यांचे पाप मी ढगांना देत असतो…
तशीच वर पाहे गंगी,
त, ढग दाटून आले,
ढगास बोले गंगी,
ढगोबा भाऊ तुमची तराच लय भारी,
आमचे सारे पाप घेऊन कोठी चालली सवारी…
ढग मने, ऐक गंगुबाई,
तुमचे सारे पाप घेऊन मी वाऱ्या जवळ जातो,
एकमेकाची सोबत करत पाऊस होऊन पडतो…
पळतो तळ्यात-मळ्यात…
अन तुमचे पाप गंगुबाई तुमच्याच गळ्यात…
सुरेखा कोरे,नागपूर
=========



