पदर आजीचा अन् आयुष्याचा.
डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
पदर आजीचा अन् आयुष्याचा.
खरं तर आईच्या पोटातच आधी आईची ओळख झाली आणि मग नऊ महिन्यांनी तिच्या पदराची ओळख झाली. पाजताना तिनं पदर माझ्यावरून झाकला आणि मी आश्वस्त झालो. तेव्हापासून तो खूप जवळचा वाटू लागला. जसे आईने लाड केले, तसेच आजीनेही लाड केले.मी एक वर्षाचा असतानाच आजारी होतो. मला माझी आजी दवाखान्यात न दाखवता आईला सोबत घेऊन एका खाजगी वैद्यकडे पंधरा वीस किलोमीटर चालत खांद्यावर पदर झाकून घेऊन जायची. दूध आणते वेळेस सुध्दा पदर झाकून आणायची. मला सोबत घेऊन श्री क्षेत्र अचलबेट देवस्थानला व गावात दामोदर बुवाकडे घेऊन यायची. तेथे मी मांडीवर झोपलो की, लगेच पदराने पांगरू घालायची. लहानपणी मी रडू लागलो की, पदराने दृष्ट काढायची.”आईपेक्षा जास्त मला आजीनेच सुसंस्कृत केले”.
आणि मग तो भेटतच राहिला …
आयुष्यभर
शाळेच्या पहिल्या दिवशी
तो रुमाल झाल
रणरणत्या उन्हात
तो टोपी झाली,
पावसात भिजून आल्यावर
तो कुंची झाली
घाईघाईत खाऊन खेळायला पळताना
तो नॅपकीन झाली
प्रवासात कधी
तो अंगावरची शाल झाला
बाजारात भर गर्दीत कधीतरी
आई दिसायची नाही
पण पदराच टोक धरून
मी बिनधास्त चालत राहायचो …
मग त्या गर्दीत
तो माझा दीपस्तंभ झाला
गरम दूध ओतताना
तो चिमटा झाला
उन्हाळ्यात लाईट गेल्यावर
तो पंखा झाला
आण्णा घरी आल्यावर,
चहा पाणी झाल्यावर,
तो पदरच प्रस्ताव करायचा ….
आई म्हणायची ज्ञानेश्वरचा दहावीचा रिझल्ट लागला. चांगले मार्क पडले आहेत. एक-दोन विषयात कमी आहेत,
पण … पण आता अभ्यास करीन असं म्हणतोय..
आण्णा कधीतरी रागावले की मी आईकडे जाऊन
मी पदराच्या आडून पाहायचो
हाताच्या मुठीत पदराच टोक घट्ट धरून !
त्या पदरानेच मला शिकवलं
कधी – काय – अन कसं बोलावं
तरुणपणी मला जखम झाल्यास जेव्हा पदर
बोटाभोवती घट्ट गुंडाळला
तेव्हाच रक्त बंद झाले.
पदरच चेहऱ्यापुढे घ्यावा लागला
पदराकडूनच शिकलो सहजता
पदराकडूनच शिकलो सौजन्य
पदराकडूनच शिकलो सात्विकता
पदराकडूनच शिकलो सभ्यता
पदराकडूनच शिकलो सहिष्णुता
पदराकडूनच शिकलो सजगता
डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
ता उमरगा जिल्हा धाराशीव



