Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणई-पेपरकोकणक्रिडा व मनोरंजनदेश-विदेशनागपूरमहाराष्ट्रमुंबईविदर्भसाहित्यगंध

आंधारयात्री

सौ. सुरेखा रा.चित्ते

0 4 8 2 9 4

आंधारयात्री

खरंतर हा विषय होता मराठीचे शिलेदार समूहात कवितेचा. पण मागच्याच आठवड्यातील आमच्यासोबत घडलेली सत्य घटना. माझा अनुभव तुमच्यापुढे मांडत आहे. यंदा राज्यात वळीवाचा सर्वत्र पाऊस पडत होता. हा पाऊस हवा नाही, विजांचा गडगडाट नाही, अगदी शांतपणे बरसत होता चोवीस मे रोजी आम्ही लग्नासाठी मराठवाड्यात निघालो. कोकणातून मराठवाड्यात लग्नासाठी जाण्याचे ठरले मी, माझे मिस्टर, कन्या श्रेया, चिरंजीव सौरभ असे चौघजण गाडी घेऊन लग्नाला निघालो. मोठा मुलगा मुंबई विद्यापीठात पीएचडी करत असल्यामुळे तो डायरेक्ट नांदेड ला लग्नाच्या हॉलवर आला. माझे आई वडील बहिण व तिची मुलगी मुंबईवरून ट्रेनने नांदेडला गेले होते. जातानाचा प्रवास छान झाला. छोटा सौरभ गाडी चालवतो. तसा तो सरकारी नोकरीत आहे. गाडी चालवणं त्याचं फॅशनआहे. तो उत्तमरीत्या गाडी चालवतो. अगदी लाँग रुट आणि मिस्टरही एसटीमध्ये आहेत, तर ड्रायव्हिंग दोघांनाही जमते. तसच मोठा मुलगाही गाडी चालवतो, परंतु त्याचा हात साफ झालेला नाही. लग्न व्यवस्थित पार पडले आणि तोही मुंबईला जायचा तर घरची गाडी म्हंटल्यावर आमच्या सोबत कोकणात येण्यासाठी तयार झाला. आम्ही एकत्रित कुटुंब जातोय हे पाहून बहिणही आमच्या सोबत येण्यास तयार झाली. 25 मे च लग्न आटोपून आम्ही 26 मे ला सकाळीच निघायचं ठरवलं आम्ही नंदेच्या घरून निघणार होतो व बहीण काकांकडे होती तिला घेऊन सकाळीच निघालो.

लग्नामध्येच बरेच नातेवाईक भेटले कुणाकडे खास भेटण्यासाठी गेलो नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही कोकणात यायला निघालो. एवढा मोठ्ठा प्रवास म्हटल्यावर त्याला हात साफ करण्यासाची संधी मिळाली. त्यांनेच गाडी चालवायला घेतली. त्याचा स्वभाव खुपचं छान आहे कुणाच्याही मदतीला धावून जाणार . बुद्धिमान व्यक्तिमत्व, कुणालाही शैक्षणिक बाबतीत कुठलेही मदत लागल्यास ती चुटकी सरशी करणार. बहिणीच्या मुलीचा आणि त्याचं खूपच वेगळे नातं बहिण भाऊ म्हणून अगदी खेळकर वातावरण. तिन्ही मुलं खुल्या संस्कारांमध्ये वाढलेली नवीन. गाडी घेऊन दोनच वर्षे झालेली होती. नवीन गाडी बाहेर लांब कुठेच गेली नाव्हती. प्रथमच एवढ्या लांब प्रवास करत होतो.

गाडीत सात माणसं आरामात प्रवास करू शकतात. आम्हीही सातजण होतो. त्यामुळे सगळे अगदी व्यवस्थित बसलो. कपड्यांच्या बागा वर क्यारियर वर बांधून ठेवल्या. आम्ही मागच्या तीन नंबर सीटवर बसलो मी आणि माझी लेक. म्हणून आम्हाला पुढचं स्पष्ट दिसत होत. कधी तीन नंबरला मुलगी मी बसायचं तर, बहिणी व तिची मुलगी असे तिघेजण मधल्या सीटवर बसायचे अतिशय प्रेमळ आहे आमचं कुटुंब. जवळ जवळ सकाळच्या दहाच्या सुमारास गाडी लातूरच्या पुढे नाष्ट्याला थांबली तिथेही बहिणीची मुलगी खाली उतरत नव्हती. तिला फास्ट फूडचे वेड जास्त आहे. पोहे वगैरे खाण्यास तीची नापसंती हीती. आम्ही सगळे खाली रस्त्यालगतच्या हॉटेलवर थांबलो. शेताच्या कडेला छोटसं हॉटेल होतं ते एकच हॉटेल हायवे शेजारी असल्यामुळे एखादा प्रवासी नाश्ता करत होता. बहिणीची मुलगी गाडीतच बसून असल्यामुळे तिला मोठ्या मुलाने खाली दोन्हीं हात धरून ओढत ओढत आणली आणि खुर्चीवर बसवली. सगळ्यांनी खिचडी भजी ऑर्डर केली आणि तिच्यासाठी पोहे गरमागरम नाश्ता चहा झाला मनातून आनंदून गेलो आणि पुढल्या प्रवासाला सुरुवात झाली. तीन तास त्याला गाडी चालवलेला मोठा मुलगा अजूनही त्याची हाऊस भागली नव्हती त्याने गाडी पुन्हा चालवायला घेतली. मध्येच आभाळ भरून आले. ऊन कुठेच दिसत नव्हतं वातावरण अगदी फुलून गेलेले थंडगार वारा आणि दोन्ही बाजूला हिरवाई नसटलेली हा सुखद अनुभव सगळ्यांना येत होता.

आंबेजोगाई मार्ग पाटोदा असे पुण्याकडे निघालो होतो. दुपारी जेवणासाठी गाडी शेताच्या कडेला लावली आणि खुल्या आभाळाखाली चादर टाकून मोकळ्या वातावरणात जेवणं झाली. तिथूनही मोठ्यानेच गाडी चालवायला घेतली. मी थोडसं नजर रोखून त्याच्याकडे पाहत होते, तेवढ्यात त्याचे पप्पा म्हणाले, “चालू होऊ दे म्हणजे छान हात साफ होईल”. माय जास्त काही बोलले नाही. मागे सगळे गप्पा मारत होतो. गाडी अगदी शांतपणे चालत होती खड्डा आला तरी सावकाश ब्रेक दाबून गाचका लागणार नाही याची काळजी घेत होता. पटोदयाच्या जवळ चहा घेतला. चहा घेऊन थोडावेळ विरंगुळाही झाला. चालू वातावरण मनाला फारच भावल कारण असे विरंगुळ्याचे क्षण फार कमी येतात तेही एकत्र घालवण्यासाठी.

मध्ये छोट्या मुलाने दोन तास गाडी चालवली. त्याची ड्रायव्हिंग खूपच चांगली कुठलाही प्रसंग आला तर प्रसंगावधान गाडी चालवतो. दोन तासानंतर पुन्हा मोठ्याने गाडी चालवायला घेतली आता पुण्याला जायला रात्रीचे आठ तरी वाजणार होते. एवढ्या अंतरावर आम्ही होतो. संध्याकाळी झाली. सगळीकडे अंधार पसरला. गाडी दौंड क्रॉस करीत होती गावातूनच जाणारा स्ट्रेट रस्त्यावर गाडी चालली होती. आम्ही दोघी बहिणी शेवटच्या सीटवर बसलो होतो अमच्या गप्पा चालू होत्या. माझं आणि तीचही लक्ष समोर होतं. अचानक अंधारात एक इसम, काळा रेनकोट घातलेला, गाडीच्या बोनेटवर आदळला. तशी बहीण आणि मी किंचाळलो. ती तर फारच घाबरली होती. सारखी रडत होती. तिघही बापलेक गाडीचा दरवाजा खोलून खाली उतरले आणि त्या माणसाला पाणी पाजाले. परंतु, तो बेशुद्ध पडला होता. हे नंतर झालं पण, मी प्रत्यक्ष पाहिले की तो माणूस उडाला व त्याची चप्पल हवेत उडून खाली पडली. मला असा भास झाला की, तो जागीच ठार झाला आणि त्याचा मुंडकं उडालं.

पाचदहा सेकंदात मला घाम फुटला व काळीज थंडगार पडलं. मुलाच्या हातून असं घडलं की तो यातून सुटणारच नाही त्याला आता शिक्षा होणार या भीतीने मी कापत होते. तो माणूस बेशुद्ध पडला त्याला मिस्टरांनी आणि मुलांनी उचलून दुसऱ्या गाडीतून प्रायव्हेट हॉस्पिटलला घेऊन गेले. तोवर माझे मुलगी व बहिनीची मुलगी खंबीरपणे आम्हा दोघींना धीर देत होत्या. आता मनाला हुरहूर लागून राहिली. की रात्र इथेच घालवावी लागणार आणि पोलीस आम्हा सगळयांना पकडणार. अपघात झाला तेंव्हा गावातील लोकांनी आम्हाला मदत केली. माणसं चांगली निघाली. गावचा नगरसेवक समजूतदार माणूस होता. त्यांनी समजून घेतले तुमची फॅमिली चांगली आहे असं म्हणून डॉक्टर सिटीस्कॅन करून होईपर्यंत ,रिपोर्ट येईस्तोवर त्यांनी आम्हाला थांबून घेतलं. गाडीच्या पुढच्या काचावर डोकं आदळल्यामुळे गाडीची काच तर फुटलीच आणि त्या इसमाच्या डोक्याला लागून रक्तही निघालं होतं . रिपोर्ट यायला रात्रीचे अकरा वाजले वाजले. रिपोर्ट नॉर्मल निघाला. परंतु आयसीयुमध्ये ठेवावं लागलं कारणाने सगळं बिल आमच्या माथ्यावर येऊन पडलं. 50000 हजारांची जुळवणी केली. त्यात बहिणींनी सुद्धा थोडी कॅश दिली. हॉस्पिटलला पैसे जमा केले व एकदा पेशंटला बघितलं. तर तो पेशंट माझी चूक होती असं सारखं एकच वाक्य बोलत होता.

मोठ्या मुलाचा चेहरा पडलेला बघून माझ्या पोटात कालवा कालवा होत होती. सगळ्यांना धक्का बसला होता आणि नेमकं त्याच दिवशी आमच्या लग्नाचा वाढदिवस होता. बहीण म्हणाली कुठेतरी थांबू आणि जेवण करूया जेवायला बारा वाजले होते. जेवणं करुण निघालो पुण्याच्या दिशेने. गाडी छोटा चालवत होता पाऊस एवढा जोरात वाढला होता की, समोरच काहीच दिसेना तरीही दुसऱ्या गाडीच्या साह्याने त्यांच्या मागे गाडी चालवत होता. गाड्याही रस्त्याला जास्त नव्हत्या क्वचित गाड्या चालत होत्या. तसं सगळ्यांना फोनवर हवामान खात्याचे पुढील दोन दिवस घराबाहेर पडू नये असा इशारा दिला होता. आमचं गणित फार चुकलं होतं सकाळी आठ वाजता निघालो घरी कोकणात बारा वाजेपर्यंत पोहोचू या हिशोबाने आम्ही निघालो होतो. चांदणी चौक पास केला. त्या चौकापासून पौंडपर्यंत एकच गाडी आमच्या समोर चालत होती तीही हळूहळू पाऊसच असा कोसळत होता की, घरी पोहोचतो की नाही याची शाश्वती राहिली नव्हती. टीव्हीवर पाहताना, पेपर मध्ये वाचताना अंगावर शहरा आणणाऱ्या बातम्या बघितलेल्या आमच्या बाबतीत खऱ्या होतात की काय असं वाटायला लागलं. आम्ही जिवंत परतणार नाही असं वाटत होतं. थोड्यावेळासाठी वाटलं कुठेतरी हॉटेलवर रात्र घालवली पाहिजे आणि सकाळी उठून जावं. परंतु माझं आणि छोट्या मुलाचं म्हणणं होतं की, असेही बारा वाजून गेले आहेत आणि आता रूम बघेपर्यंत सामान उतरावे पर्यंत तासभर जाईल आणि नवीन ठिकाणी झोपही लागणार नाही. ताम्हिणी घाटातून गाडी नेण्याचे ठरवले. आम्ही सगळ्यांनी त्याला दुजोरा दिला नाही. कारण काही तांसापूर्वी जो प्रकार घडला ते पाहून सगळ्यांनाच घरी गेल्याशिवाय बरे वाटले नसते. म्हणून पुढे जाण्याचा ठरवलं. पौंड पासून एकही गाडीने समोर न मागे. एखादा ट्रक समोरून येत होता ते दहा-पंधरा मिनिटानंतर. पाऊस काही कमी व्हायचं नाव घेत नव्हता. एक तर वळणाचा घाट आणि दाट पसरलेल धुकं त्यामुळे पुढचा रस्ता दिसतच नव्हता. वरून कोसळणाऱ्या पावसांच्या सरी अगदी चार फुटांवर जास्त काही दिसतही नव्हत. शेवटी ठरले की शिवसागर हॉटेल जवळ थांबण्याचे तेथे थांबलो पण पाऊस बाहेर उतरू देईना. हॉटेलचे सगळे गेट बंद. पावसामुळे लाईट गेली होती. आणि सगळीकडे अंधार, काय करावं काही सूचना मग सगळ्यांनी ठरवले की मिस्टरांना गाडी चालवायला द्यायची, कारण त्यांना तीस वर्षाचा अनुभव होता.

पुढे त्यांनीच गाडी चालवायला घेतली आणि तेही गाडी एवढी सावकाश चालवायला लागली परंतु पावसामुळे त्यांनाही समोरचं काहीच दिसत नव्हतं तरीही अंदाज घेत घेत ते गाडी चालवत होते. डोंगरावरून वाहून आलेले दगडगोटे टायरखाली आले की गाडी व्हायब्रेट होत होती त्यामुळे आमच्या तोंडून एकच शब्द निघत होता हळू जाऊ द्या. एवढी वेडी वाकडे वळणे आणि रात्रीच्या अंधार ते धुक्यासारखे शुभ्र धबधबे अगदी विचित्र दिसत होते. मनात एकच विचार घरी जिवंत जातोय की नाही, आमच्या समोर एक भाजीवल्याची गाडी जात होती. तीही कासवाच्या गतीने आम्ही तिच्या मागे मागे निघालो. सायकलच्या स्पीडने गाडी चालत होती हे सारं घडत होतं बारा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत म्हणजे बारा ते तीन हा काळ जीवावर बेतला होता. सगळे निशब्द होऊन बघत होतो.

पुढच्या भाजीवाल्याने एका हॉटेलच्या उजेडाला गाडी थांबवली ते पाहून आम्हीही थांबायचा निर्णय घेतला. हॉटेल समोर दोन प्रायव्हेट गाड्या कुटुंबासोबत थांबल्या होत्या. तिथून माणगाव दीड तास होते. परंतु गाडी पुढे येण्याची हिंमत होत नव्हती. कारण पुढे कुठेतरी दरड कोसळली असेल ही एक भीती मनात घर करून होती. मिस्टरांनी मोठ्या मुलाने खाली उतरून चहा घेतला. आम्ही मागं गाडीतच बसून होतो. थोड्यावेळाने पावसाचा जोर कमी झाल्यासारखे वाटले. घाट उतरलो गाडी खड्ड्यातून गेली की मागची माणसं गचकन उडत होती. गचका लागला की भीती दाटून येत होती दोन-तीन वेळेस खड्ड्यात गाडी आदळली. काहीतरी तुटल्याचा भास होत होता. तसे अपघातामुळे समोरची काच तुटली होती लेफ्ट साईडचा दरवाजा बेंड झाला होता व लेफ्ट साईड हेडलाईट आत गेली होती. माणगावला यायला पाच वाजले. पाऊस तरीही चालूच होता. माणगाव वरून रस्ता चांगला होता म्हणून छोट्याने गाडी चालवायला घेतली. मोठ्या मुलाच्या चेहऱ्यावर अपराधाची भावना स्पष्ट दिसतं होती. त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो पण तो फक्त तुझ्याकडे बघत एक शब्द ही बोलत नव्हता.

संध्याकाळी सात वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजेपर्यंत गाडी पावसात चालत होती आणि वर क्यारिअरवर ठेवलेल्या कपड्याच्या बॅगा पूर्ण पावसाने भिजवून गेल्या होत्या. एकही कपडा कोरडा राहिला नव्हता. घरी आलो बॅगा खाली उतरवल्या आणि गॅलरीत नेऊन कपडे पसरवून ठेवले. एकमेकांचे रंग कपड्याला लागलेले सर्वांचे कपडे बादलीत भिजत घातल्यासारखे भिजले होते. जवळजवळ पाच ते सहा बॅग कपडे गॅलरीच्या खुर्च्यांवर तसेच एकमेकांवर टाकून दिले. आम्ही फ्रेश झालो आणि झोपी गेलो. अशी झोप लागली की, सकाळी दहा वाजता जाग आली. सगळे उठलो नाश्ता बनवला आणि नाश्ता करून बोलत बसलो. बोलता बोलता लक्षात आलं की, सव्वीस तारखेला अमावस्या होती आणि सत्तावीस ला संपणार होती. आम्ही दोघी बहिणी आवाक झालो. कारण आमचा अशा गोष्टींवर विश्वास नव्हता. पण कालचा प्रसंग आमच्या सोबत एवढा वाईट घडला की आता विश्वास बसू लागला. पूर्वीचे लोक अमावस्याला कुठलेही कार्य करत नसत आणि प्रवास करायचा ही टाळत असत. परंतु या इंटरनेटच्या जमान्यात आम्हीही नवीन विचारसरणीत वावरताना आम्हीही हे विसरलो की अमावस्येला शक्यतो घराबाहेर पडू नये ते लांब प्रवास तर टाळलेलाच बरा. त्या मागचं शास्त्रीय कारण ही लक्षात यायला हवं.

कोण काय कसा विचार करतो या स्थितीबद्दल माहीत नाही. परंतु माझा व माझ्या बहिणीचा विश्वास निसर्गाने रौद्ररूप धारण केलेलं आम्ही अनुभवलं आहे. हे घरात बसून वाचणाऱ्याना कसं समजेल. निसर्गाचं रौद्ररूप आम्ही जवळून अनुभवलं. घडलेला सगळे प्रसंग बघून आम्ही अस्वस्थ झालो आहोत. अशा कितीतरी घटना रोजच घडत असतात. पण दुसऱ्या सोबत घडणं आणि स्वतः अनुभवनं यात खूप मोठी दरी आहे. माणसाचे कर्म चांगले असावे. जेणेकरून अशी संकट आली की, आपली चांगले कर्म पुढे होतात. संकटाला सारण्यासाठी. ही ‘अंधारयात्रा’ संपली खरी, पण बरंच काही शिकवून गेली. हा एक प्रवास नव्हताच ती एक वाईट वेळ होती. जी आमच्यावर ओढवली होती. त्या वाईट परिस्थितीतून योग्य प्रकारे सुटलो.

सौ. सुरेखा रा.चित्ते
ता.श्रीवर्धन जि. रायगड
(लेखिका या प्रसिद्ध कवयित्री आहेत)

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे