घोकंपट्टी, पाठांतर ते …ओपन बुक टेस्टचा प्रवास; शर्मिला देशमुख
मंगळवारीय 'आम्ही बालकवी' काव्यस्पर्धेचे परीक्षण
घोकंपट्टी, पाठांतर ते …ओपन बुक टेस्टचा प्रवास; शर्मिला देशमुख
मंगळवारीय ‘आम्ही बालकवी’ काव्यस्पर्धेचे परीक्षण
करिते का कधी खंत
सरिता ,करिते का कधी खंत
रांगत लोळत घोडत दौडत
कडे कपारीतुनी खळाळत
करिते का कधी खंत
सरिता ,करिते का कधी खंत
वर्ग सातवीतील ही कविता. शूर शिपाई, गे मायभू या कविता. बोलावणं आलं तरी नाही हे प्रहसन, विसरभोळा गोकूळ हे नाटक…जणू कालच शिकलो आपण हे सर्व. कविता तर पाठच त्याही वेगवेगळ्या चाली लावून. त्या काळात सोशल मीडियाचा तर लवलेशही नव्हता. त्यामुळे गाणी क्वचितच ऐकायला मिळायचं. चाली तरी कशा लावायचा ? पण त्याकाळचे गुरुजी आणि विद्यार्थी खरंच हुशार म्हणावे लागतील. कारण स्वतः चाल निर्माण करून स्वतःच कवितांना चाली लावल्या जायच्या. मग ते मराठी, हिंदी ,इंग्रजीच्या कविता असोत. Jack and Jill, went of the hill ..Baba Black sheep, lazy meri will you get up.. इयत्ता पाचवीतला या कविता आजही जशास तसा आठवतात. पाढे पाठांतर करायचे ते सुद्धा चाल लावूनच. वर्ग, वर्गमूळ ,घन ,घनमूळ, गणिताची विविध सूत्रे, विज्ञान मधील संज्ञा आजही आठवतात. इंग्रजी शब्दार्थ तर चालत चालत, खेळत खेळत पाठ करायचे. पाठांतराची ती मज्जा कुछ औरच होती.
आता तुम्ही म्हणाल कविता, सूत्रे,संज्ञा, पाठांतर आणि आठवणी याचे काय घेऊन बसला आहात. तर आज मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेमध्ये राहुल दादांनी ‘पाठांतर’ हा विषय दिला होता. विषय वाचताच सर्व शालेय बालपण समोरून झरझर निघून गेले. जणू कालच घडलेली ती गोष्ट. आज कालच्या मुलांना काही समस्या असेल तर ते लगेच गुगलवर सर्च करतात. तेव्हा आमचे गुरुजी हेच गुगल होते. त्यांनाही आमच्याबरोबर कविता, सुत्रे ,संज्ञा सर्व पाठ असे.त्याबरोबरच देशभक्तीपर गीतांची वही बनवलेली असे ,ते गीते तोंडपाठ असत. रोज ऐकून ऐकून ती गीते वहीत उतरून घेतली जात. आजही माझ्याकडे बालपणीच्या गीतांच्या दोन वहया आहेत, जे की मी सातवीपर्यंतच्या शालेय जीवनात लिहिलेली गीते आहेत. त्यातील बरीच गीते आजही तोंड पाठ आहेत.
हळूहळू वेळ बदलत चालली, काळ बदलत चालला, वातावरण बदलत चालले आणि शिक्षण पद्धती ही बदलत चालल्या. आता मुलांना घोकंपट्टी किंवा पाठांतराचा अतिरिक्त ताण नको म्हणून परिच्छेद पद्धती निघाली. परिच्छेद मधूनच प्रश्नांची उत्तरे सापडून द्यायचे. तरीही आजकालच्या मुलांना ते अवघड वाटते. ज्या ठिकाणी आम्ही प्रत्येक प्रश्नाचे उत्तर पाठ करून लिहायचो. घोकंपट्टी करून ,पाठांतर करूनच इंग्रजीचे निबंध, पत्र लेखन सुद्धा लिहावे लागायचे. परिच्छेद पद्धती आली तरी काही गोष्टी या पाठच कराव्या लागायच्या.
पण हळूहळू काळ आणखीनच पुढे बदलत गेला. पाठांतराचा अतिरिक्त ताण किंवा गरज नसताना पाठांतर करावे लागते म्हणून ‘ओपन बुक टेस्ट’ ही आकारिक चाचणी मध्ये संकल्पना आली. त्याबरोबरच आठवीपर्यंत नापास करायचे नाही हा एक प्रकार आला. अशा विविध प्रयोगांमुळे मुलांची पाठांतर करण्याची सवय पूर्णतः विसरून गेली. आज कविता पाठांतर करायचे म्हटले तरी विद्यार्थ्यांना नको वाटते. पाठांतर केल्यामुळे आपण आपली स्मरणशक्ती तपासू शकतो हीच संकल्पना मोडीत निघाली. उत्तरे लक्षात ठेवल्यामुळे पण स्मरणशक्तीचा विकास होतो. या गोष्टी मागे पडत गेल्या. एक शिक्षक म्हणून या गोष्टीचे आत्मचिंतन व्हायला हवेच. पाठांतरामुळे स्मरणशक्तीचा नक्कीच विकास होतो, असे मला तरी वाटते.
आज समूहामध्ये अ, आ, इ, ई पासून कविता ,पाढे ,सूत्रे, संज्ञा याचे पाठांतर मोठ्या प्रमाणावर झाले. शिलेदार बंधू-भगिनींनी बालकविता लिहिताना बालमनामध्ये जाऊन किंवा बालपणामध्ये जाऊन त्या कल्पना रंगवणे आवश्यक असते. या गोष्टीची नोंद घेणे आवश्यक आहे. कारण बऱ्याच वेळा काही कविता वाचून या बालकविता आहेत का? असा प्रश्न मनाला पडतो. आपण जेव्हा बालकविता लिहितो त्यावेळी थोडे मनन चिंतन करून या खरेच बालकल्पना आहेत का हे स्वतः तपासून पाहणे आवश्यक असते.
समूहात पाठांतर करणाऱ्या सर्व शिलेदारांचे अभिनंदन व सर्वांना लेखणीसाठी भरभरून शुभेच्छा. राहुल दादांनी मला मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेचे परीक्षण लिहिण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे शतशः आभार. चला मी पण पाठांतरासाठी निघून जाते… तूर्तास थांबते .धन्यवाद !!!!!
शर्मिला देशमुख-घुमरे ता.केज जि.बीड
©सहप्रशासक /परीक्षक मराठीचे शिलेदार समूह





