बाळगोपाळांचा आनंद… फेरीवाला; शर्मिला देशमुख
मंगळवारीय 'आम्ही बालकवी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण
बाळगोपाळांचा आनंद… फेरीवाला; शर्मिला देशमुख
मंगळवारीय ‘आम्ही बालकवी’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
“गारेगार वाला, थंडीने मेला….,
दहा पैसे दिले की, जिवंत झाला.”
सुमारे 80 -90 च्या दशकात ज्यांचा जन्म झाला, त्यांनी हे गाणे अगदी नाचत नाचत, ताला सुरात नक्कीच म्हटले असणार. पूर्वी गावोगावी सायकलवर गारेगार विकणारे ,बुढ्ढी के बाल विकणारे फेरीवाले येत. गारेगार घ्या गारेगार… गारे.. गोडे.. गारेगार … अशी त्यांची हाळी ऐकू आली की बालकांना केवढा आनंद होई.. काय सांगू? आहे त्या अवस्थेत त्याच्या आवाजाकडे धाव घेणारे बालपण विसरता येणे शक्य आहे का? आईच्या पदराला धरून बसणे आणि दहा पैसे, वीस पैसे, पंचवीस पैशांसाठी रडणे ..आजही जशाचा तसा तो प्रसंग आठवतो. मग घरच्यांनी पैसे नाहीच दिले तर प्लास्टिकच्या पाईपचा तुकडा, जुने बूट, लोखंडी सळया, तारा अशा भंगारातील वस्तू बाहेर निघत. हे फेरीवाले हसत हसत ते भंगार जमा करत आणि हातात गारीगार टेकवत.
काळ बदलला पाठीवर किंवा सायकलवर दूर दूर प्रवास करणारे फेरीवाले मोटरसायकलवर आणि आता तर चार चाकी गाड्यांमधून येतात. शहरांचा विचार केला तर रस्त्याच्या कडेला, फुटपाथ वर, बाग ,बस स्टॅन्ड, चौका चौकातून एक नाहीतर अनेक फेरीवाले खेळणी ,कपडे, भांडे ,जीवन उपयोगी वस्तू, भाज्या, फळे विकताना दिसतात. गल्ली गल्लीतूनही हे फेरीवाले ओरडत फिरताना दिसतात. पण काळ बदलला तसे या फेरीवाल्यांच्या रूपात बहुरूपी चोरांनी ही प्रवेश केला आणि घरे, दागिणे लुटण्याचे धंदे सुरू केले. त्यामुळे खऱ्या फेरीवाल्यांवरही आज समाज विश्वास ठेवण्यास कचरतो.
२०१४ मध्ये फेरीवाल्यांसाठी कायदा झाला, जो फेरीवाल्यांना कायदेशीर ओळख आणि हक्क देतो. त्यांच्या उपजीविकेचे संरक्षण आणि शहरांमध्ये त्यांचे योग्य पुनर्वसन करतो. ही जिम्मेदारी स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे. त्यांचे सर्वेक्षण करून निश्चित जागा देणे हे त्यांचे कर्तव्य आहे. पण दुर्दैव असे की या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी नसल्यामुळे फेरीवाल्यांना खूप समस्यांना तोंड द्यावे लागते. बऱ्याच वेळा ते गैरसमजाचे शिकारी बनतात व त्यांच्यावर कार्यवाही होते. काही अपवाद वगळता फेरीवाल्यांकडे एक गरजू माणूस म्हणून बघणे आवश्यक आहे.
फेरीवाला म्हटले की बालकांना मात्र आनंदी आनंद होतो आणि आजही तो कायम आहे. आज बालकाव्य स्पर्धेमध्ये ‘फेरीवाला’ हा विषय आला आणि आमचे बालकवी खेळणी, फुगे, खाऊ साठी फेरीवाल्याच्या मागे दिवसभर फिरताना आढळले. बालपणात रमण्याचा हा आनंद राहुल दादांनी समूहाला बहाल केल्याबद्दल खरच त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी. बाकी जाता जाता आपली रचना बालकवी प्रकारात मोडते का याची शहानिशा शिलेदार बंधू-भगिनींनी अवश्य करावी. मला परीक्षण लेखनाची संधी दिल्याबद्दल राहुल दादांचे शतशः ऋण! तूर्तास थांबते. धन्यवाद…!!!
शर्मिला देशमुख -घुमरे, बीड
मुख्य परीक्षक/ लेखिका/ कवयित्री
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह



