Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकोकणक्रिडा व मनोरंजनखानदेशदेश-विदेशनवी दिल्लीनागपूरनांदेडपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामहाराष्ट्रमुंबईविदर्भसंपादकीयसाहित्यगंध

ज्ञानदा कदम : टीव्ही अँकरिंग आणि पत्रकारितेतला आश्वासक आणि संवेदनशील चेहरा..

अरविंद जाधव पाटील

0 4 0 9 0 3

ज्ञानदा कदम : टीव्ही अँकरिंग आणि पत्रकारितेतला आश्वासक आणि संवेदनशील चेहरा….

‘ती’ रोज आपल्या कळवा भागातील काॅलनीतून बाहेर निघायची. कळवा ते छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणारी लोकल ती पकडायची. तिचा लोकलचा प्रवास तिच्या मनातील अनेक स्वप्नांची गर्दी करणारा असायचा. एखाद्या दिवशी चूकून ‘विंडो सीट’ मिळाली की ‘लोकल’च्या वेगासोबत मागे पडणारी घरं, रस्ते, समुद्राची खाडी, माणसं, त्यांची धावपळ, त्यांचं जगणं हे सार ‘ती’ डोळ्यात साठवायची. खिडकीतून दिसणारं आभाळाचं अगदी मोकळं ‘कॅनव्हास’ तिला जणू आपली स्वप्नं रंगवायला खुणवायचं. तिच्या मनातही अगदी असंच काहीसं स्वप्नं दररोज रूंजी घालायचं. आपलाही आवाज ‘ऑन एअर’ जावा. या मोकळ्या आकाशात आपल्या आवाजानं यशाचे नवे रंग भरावेत. मुंबईचा आसमंत आपल्या आवाजानं व्यापून जावा… हे स्वप्नं रंगवतांनाच ‘चर्चगेट’ स्टेशन यायचं. ती लगेच भानावर यायची. अन परत गाडीतून उतरत तिची कार्यालयात पोहोचायची लगबग सुरू व्हायची.

तिचं नोकरीचं ठिकाण होतं चर्चगेटचं ‘आकाशवाणी’ कार्यालय. पत्रकारितेतील पदवीचं शिक्षण सुरू असतांना तिला ‘आकाशवाणी’मध्ये नोकरी लागली होती. शिक्षण सुरू असतांनाच जो आवाज ऐकत आपण लहानाचं मोठं झालो त्याच ‘आकाशवाणी’मध्ये काम करायला मिळाल्याचं आनंद तिच्यासाठी आणि कुटूंबियांसाठीही अगदी फार मोठा होता. नोकरी लागल्यानंतर पहिले दोन महिने गेल्यानंतर तिला उत्सुकता लागली होती ‘आकाशवाणी’वर तिचा आवाज ‘ऑन एअर’ जाण्याची. यासाठी तिच्या मनात मोठी उत्सुकता तर होतीच. तिचं मनही ते स्वप्नं पूर्ण होतांना पाहण्यासाठी काहीसं अधीर आणि उतावीळ झालेलं. मात्र, दिवसामागून दिवस जात होते. ‘ती’ कळव्यावरून चर्चगेटच्या कार्यालयात यायची. दररोज बातम्या करणं, वृत्तसंस्थांकडून आलेल्या इंग्रजीतील बातम्या मराठीत भाषांतरीत करणं असं तिचं नित्यक्रमाचं काम चालायचं. परंतू, तिला ‘ऑन एअर’ जाण्यासाठी ना कुणी काही म्हणायचं, ना कुणी विचारपूस करायचं. अनेकदा ‘ती’ हिरमुसून जायची. तिला वाईट वाटायचं. आपल्याला ‘संधी’ का मिळत नाही? , याचं उत्तरही तिला समजत-मिळत नव्हतं. असेच दिवसांमागून दिवस जात होते. तिचं तेच ‘रूटीन’ कायम होतं. एकदिवस तिनं मनाशी ठाम निर्धारच केला की, आपल्याला ‘संधी’ का मिळत नाही हे तेथील संबंधित प्रमुखांना विचारायचं.

‘ती’ त्या दिवशी कार्यालयात आली. तिनं तिची सर्व बातम्यांची कामं आटोपलीत. त्यानंतर काहीशा हिंमतीनंच ‘ती’ थेट प्रमुख असलेल्या बाईंकडे गेली. ‘ती’ त्यांना म्हणाली, मॅडम!, मला काम सुरू करून पाच महिने होतायेत. परंतू, मला एकदाही ‘ऑन एअर’ जायची संधी मिळाली नाही. माझं काही चुकतंय का?,”. त्या बाईंनी तिचं सारं बोलणं अगदी शांतपणे ऐकलं. तिचं बोलणं झाल्यावर त्या तिला अगदी शांतपणे म्हणाल्यात, “तुझा आवाज एकदम एखाद्या लहान मुलासारखा आहे. मला तो फार ‘बालिश’ अन ‘चिरका’ वाटतो. तो भारदस्त वाटत नाही. त्यामूळे तो आम्हाला ‘ऑन एअर’ करता येणार नाही”. हे उत्तर ऐकून ‘ती’ स्तब्ध झाली. तिच्या मनाला फार वेदना झाल्यात. मात्र, काही क्षणातच तिनं स्वतः ला सावरलं. ती त्या मॅडमना म्हणाली, ” काहीच हरकत नाही, मी खूप मेहनत करील. एकदा माझा हाच ‘आवाज’ माझी ओळख बनेल”. तिच्या या आत्मविश्वासाला त्या मॅडमनींही दाद दिली. त्या दिवशी घाटकोपरला घरी जातांनाची ‘ती’ आजच्या प्रसंगानं काही गोष्टी नव्यानं शिकली होती. तिला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आणखी बराच संघर्ष करावा लागणार होता. ‘ती’ही हा संघर्ष करायला अगदी आनंदानं तयार होती. कारण, ‘यशाचा कोणताही ‘शॉर्टकट’ नसतो’, हे बाळकडू तिला अगदी बालपणापासूनच आई-वडिलांकडून मिळालं होतं. असेच दिवसांमागून दिवस जात होते.

एक दिवस तिला ओळखीतील कुणीतरी ‘स्टार माझा’ नावाचं नवं ‘न्यूज चॅनल’ सुरू होत असून तिथे अनेक पदांसाठी परिक्षा अन मुलाखती असल्याचं सांगितलं. ते वर्ष होतं २००६. तिनं परिक्षा दिली. पुढे ती ही परीक्षाही पास झाली. नंतर तिला मुलाखतीला बोलावलं गेलं. मुलाखतीच्या पॅनलमधील अनेक प्रश्नांना तिनं अगदी हसत-खेळत अन तेव्हढ्याच आत्मविश्वासानं उत्तरं दिलीत. मुलाखत देऊन बाहेर आल्यावर ती स्वत:लाच म्हणाली, “मुलाखत घेणाऱ्यांपेक्षा आपणच तर जास्त बोललो नाहीत ना?”… ती स्वत:शीच हसली अन तेथून निघाली. परंतू, मुलाखत देण्यासाठी गेल्यावर ती ‘महालक्ष्मी’मधील ‘स्टार माझा’च्या कार्यालयातील ते भारलेपण, उत्साह पाहून ती अगदी या वातावरणाच्या या इमारतीच्या अगदी प्रेमातच पडली. अगदी ‘लव्ह अॅट फर्स्ट साईट’ व्हावं तसं. ही मुलाखत झाल्यावर तिचं आकाशवाणीचं काम सुरूच होतं. पुढे एक दिवस अचानक तिला ‘स्टार माझा’च्या कार्यालयातून निवड झाल्याचा फोन आला. त्या दिवशी तिच्या आनंदाला अगदी पारावर नव्हता. तिला पत्रकारितेतलं नवं क्षितीज खुणावत होतं. तिच्या स्वप्नांना आता नवे पंख लाभले होते. तिनं ‘स्टार माझा’मध्ये रूजू होण्याचा निर्णय घेतला होता. या नव्या संधीमुळे तिच्या घरचेही अगदी आनंदी होते.

‘स्टार माझा’ला रूजू होण्यापूर्वी तिचा ‘तो’ चर्चगेटच्या ‘आकाशवाणी’ केंद्रातील कामाचा शेवटचा दिवस होता. हा दिवस तिच्या आयुष्यातील अनेक आठवणी-भावनांनी एकाचवेळी गर्दी, गलका अन कल्लोळ करणारा होता. त्या दिवशी तिनं आपल्या बातम्यांची काम काहीशी लवकरच आटोपलीत. आता वेळ होती ‘निरोप’ घेण्याची. ‘ती’ कार्यालयातील आपल्या खुर्चीवर तशीच बसली, अगदी ‘शुन्यात’ हरवल्यासारखी… ती मनात विचार करीत काहीशी ‘फ्लॅशबॅक’मध्ये गेली. अगदी कालच तर आपण येथे आल्यासारखं वाटतंय. पण, हा अगदी ‘काल’ भासणारा ‘काळ’ तब्बल सात महिन्यांचा… किती ‘सर-सर’ निघून गेलेत हे दिवस. या सात महिन्यांतील कळव्यामधलं आपलं घर ते चर्चगेटच्या कार्यालयापर्यंतचा प्रवास आपल्याला किती समृद्ध करणारा होता. या काळातील भेटलेली माणसं, कामातून मिळणारा अनुभव, बातमीच्या अचुकतेची दृष्टी यामूळे पत्रकारितेचा पाया भक्कमपणे घातला गेला. सोबतच पाहूण्यांसोबत कसं बोलावं, कसा संवाद साधावा याचा वस्तूपाठच आकाशवाणी’नं घालून दिला. धन्यवाद, ‘आकाशवाणी’!… अनेक आठवणी तिच्या मनात रूंजी घालत होत्या. इतक्यात निघण्याची वेळ झाली. सर्व सहकारी बाहेर पर्यंत सोडायला आलेत. सर्वांच्या शुभेच्छांची ‘शिदोरी’ घेत ‘ती’ एका नव्या प्रवास आणि ओळखीकडे निघाली होती. निघतांना तिनं ‘आकाशवाणी’च्या त्या वास्तूला पाणावलेल्या डोळ्यांनी नमस्कार केला. त्या दिवशी तिच्या ‘करियर’मधील पायाचा दगड असणारा ‘कळवा’ ते ‘चर्चगेट’ हा प्रवास संपणार होता. उद्यापासून आयुष्याचं भविष्यात ‘सोनेरी पान’ ठरलेला प्रवास सुरू होणार होता. हा प्रवास होता ‘स्टार माझा’चा. हा प्रवास होता ‘कळवा’ ते ‘महालक्ष्मी’ या नव्या वाटेवरचा….

# ‘आकाशवाणी’च्या दोन आठवणी कायम ह्रदयाच्या कप्प्यात राहणाऱ्या.

आकाशवाणी’त काम करतांना तिच्यातला पत्रकाराचा पाया घातला गेला. मात्र, ‘आकाशवाणी’ला निवड होण्याचा किस्सा ती आयुष्यभर विसरणार नाही असाच. ज्या दिवशी ‘आकाशवाणी’चा इंटरव्ह्यू होता तो दिवस पावसाळ्याच्या दिवसांपैकीच एक. इंटरव्ह्यू चर्चगेटच्या आकाशवाणी केंद्रात होता. ती आईसह कळव्यावरून चर्चगेटला निघाली तेंव्हा काहीच पाऊस नव्हता. मात्र, चर्चगेटला पोहोचता पोहोचता मुंबईत प्रचंड पाऊस सुरू झाला. यात पावसानं दोघीही माय-लेकी भिजल्यात. अशा परिस्थितीत इंटरव्ह्यू द्यावा की नाही अशा काहीशा द्विधा मनस्थितीत ‘ती’ होती. मात्र, तिचा इंटरव्ह्यू देण्याचा ठाम निग्रह होता. पावसात भिजलेल्या दोघीही माय-लेकी ‘आकाशवाणी’ केंद्रात पोहोचल्यात. पुढे तिला ऑडीशनसाठी ‘आकाशवाणी’च्या स्टुडिओत बोलावलं गेलं. तिथल्या ‘चिल्ड एसी’नं तिला अक्षरश: कापरंच भरलं. तिनं अक्षरशः थरथरत ऑडीशन दिली. एव्हढ्या विपरीत परिस्थितीत अन संघर्ष करीत हे ‘इंटरव्ह्यू-ऑडीशन’चं दिव्य पार पडलं होतं. मात्र, तिची निवड झाल्यानं ती विपरीत परिस्थितीतही यश मिळवून शकते, हा आत्मविश्वास आणि शिकवण तिला यातून मिळाली होती.

‘आकाशवाणी’नं आणखी एक आठवण तिच्या ह्रदयावर कायमची कोरलेली आहे. ही आठवण आहे अर्थातच तिच्या आयुष्यातील मिळालेल्या पहिल्या पगाराची. ‘आकाशवाणी’त निवड झाल्यावर साधारणत: महिना-दिड महिन्यांनंतर तिचा पहिला पगार झाला. तिला पहिला पगार पाहून झालेला आनंद हा अगदी कोणत्याही शब्दांच्या पलीकडचा होता. आयुष्यातील पगारांचे आकडे पुढे मोठे होत गेले अन जातीलही. मात्र, ‘आकाशवाणी’तील या पहिल्या पगाराच्या आनंदाएव्हढा दुसरा कोणत्याच पगाराचा आनंद असू शकत नाही. हा पहिला पगार अगदी जसाच्या तसा सर्वात आधी आई-बाबांच्या हाती ठेवला. तेंव्हा त्यांच्या डोळ्यातील अभिमानाची चमक अन आपल्या विषयीचा त्यांना वाटत असलेला अभिमान हा आपल्या आयुष्यातला अतिशय अमुल्य ठेवा असल्याचं ती सांगते.

# अन ‘तिनं’ इतिहास बदलला….

तिची ‘स्टार माझा’ला निवड झाली होती. २००७ मध्ये नवतरूणाईला सोबत घेत या वृत्तवाहिनाची मुहूर्तमेढ रोजच्या गेली. याच एका प्रयोग करू पाहणाऱ्या चमूतील तीही एक. ‘ती’ ही नवी स्वप्नं घेऊन ‘महालक्ष्मी’मधील आपल्या कार्यालयात गेली. ती सातमजली इमारत, तेथील भारलेले ते वातावरण कुणातही अगदी उत्साहं पेरणारं होतं. सर्वांसोबत तिचंही ट्रेनिंग सुरू झालं. पुढे २२ जून २००७ रोजी ‘स्टार माझा’ ‘ऑन एअर’ गेलं. यात तिला रिपोर्टरची जबाबदारी मिळाली. पुढचं जवळपास वर्षभर ती आपल्या विविध बातम्यांतून लोकांचं जगणं, त्यांचे प्रश्न अन संघर्ष मांडू लागली. तिच्या बातम्यांतून ‘मुंबई’ अन ‘मुंबईकर’ बोलू लागलेत. तिलाही आपल्या रिपोर्टींगचं ‘थ्रील’, त्यातील आव्हानं, व्यवस्थेला प्रश्नांची उत्तरं शोधायला लावणं, सरकार-व्यवस्थेला थेट भिडणारी उर्मी यातून तिला ‘रिपोर्टर’ म्हणून ओळख मिळू लागली. संवेदनशीलता आणि विषयाची हळूवार अन थेट मांडणी तिला वेगळी ओळख देऊ लागली. आता महाराष्ट्र-मूंबईच्या पत्रकारितेत तिला ओळखलं जाऊ लागलं.

मात्र, भविष्य आणि नियतीला तिला आणखी वेगळ्या रूपात पहावंस वाटत असावं. एक दिवस ती कुठल्या तरी बातमीवरून कार्यालयात आलेली. तिला संपादक राजीव खांडेकर यांच्याकडून बोलावणं आलं. तिला वाटलं बातमीशी संबंधित काही विषय असेल. तीही अगदी सहज संपादकांच्या केबिनमध्ये गेली. तिला राजीव खांडेकरांनी ‘अँकरींग’ करशील का?, असा थेट प्रश्न तिला विचारला. सर्वात आधी तर तिचा पार गोंधळ उडाला की उत्तर काय द्यावं. कारण, तिचं रिपोर्टींगही अगदी बहरात आलं होतं. असं असतांना ‘ते’ सोडून ‘हे’ करावं का?, अशा द्विधा मनस्थितीत ती होती. प्रत्येक जबाबदारी ही नवं काही शिकवून जाणारी असते हे तिला आई-वडिलांनी शिकवलेलं. तिने या नव्या प्रस्तावाला होकार दिला. पुढे काही दिवस जुजबी ट्रेनिंग झालं. अन ती अँकरींगसाठी सज्ज झाली.

अन तो दिवस उजाडला… ‘स्टार माझा’चं बातमीपत्र सुरू झालं. चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास असलेली एक मुलगी स्क्रीनवर आली. “नमस्कार!, मी ज्ञानदा कदम… सर्वात आधी पाहूयात ‘हेडलाईंस’… होय!, ती आज ‘ऑन एअर’ गेली होती. तेही अगदी फक्त आवाज अन प्रत्यक्ष दिसण्यासह. हा प्रवास होता एका आत्मविश्वासाचा… हा प्रवास होता कामावरच्या प्रचंड निष्ठेचा… हा प्रवास होता संघर्षातून यशाचा नवा इतिहास अन आदर्श निर्माण करणाऱ्या ‘ज्ञानदा’चा… होय, ही तीच ज्ञानदा आहे जिचा आवाज एकेकाळी ‘ऑन एअर’ जाण्यासाठी ‘योग्य’ नाही असं ‘आकाशवाणी’नं सांगितलं होतं. आज तिच ज्ञानदा महाराष्ट्राचा, महाराष्ट्रातील तरूणाईचा ‘आवाज’ झाली आहे.

‘ज्ञानदा कदम’ हे आपल्या मातृशक्तीचं प्रतिक आहे. तिने तिच्या कामातून, बोलण्यातून, व्यक्त होण्यातून समाजातील स्त्रीत्वाच्या अविष्काराचा, सृजनाचं अनोखं उदाहरण समोर केलं आहे. एक मध्यमवर्गीय बहूजन घरातील खोडकर ‘ज्ञानदा’ ते आपल्या अँकरींगच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली ज्ञानदा हा प्रवास एका प्रेरणेचा आहे. “मला ज्ञानदा व्हायचंय” म्हणत पत्रकारिता आणि अँकरींगच्या क्षेत्रात येऊ पाहणारी पिढी निश्चितच या क्षेत्रातील आश्वासक भविष्याची नांदी आहे, असं म्हणता येईल. ज्ञानदा हा प्रवास आहे एका साधेपणाचा… हा प्रवास आहे आकाशाकडे झेप घेतांनाही मातीशी नातं तेव्हढंच घट्ट करणाऱ्या एका दिपशिखेचा… ती आज ‘सिलेब्रिटी’ आहे. ती आज लाखोंची ‘आयकाॅन’ आहे.. ती या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांची ‘आयडॉल’ आहे… मात्र, या सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती स्वत: मात्र आजही ‘ज्ञानदा’च आहे… अगदी तशीच…घाटकोपरच्या डॉकयार्डमध्ये बागडणाऱ्या त्या अवखळ ‘ज्ञानदा’सारखीच….

ज्ञानदा!, वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा….तुझ्यातील या साधेपणाला, सच्चेपणाला, सहजतेला, निष्ठेला, समर्पणाला, अभ्यासूपणाला, वेदनेला, संवेदनेला मानाचा मुजरा अन सलाम..! वाढदिवसासोबतच उज्ज्वल भविष्यासाठी तुला आभाळभर शुभेच्छा..!????????????????????????????????????

शुभेच्छुक :- अरविंद जाधव पाटील
प्रदेश प्रभारी:- पत्रकार प्रेस परिषद महाराष्ट्र राज्य
संपादक :-तेजपुंज न्यूज चॅनल
नांदेड जिल्हा प्रतिनिधी सुदर्शन टीव्ही चॅनल

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे