पुस्तक परीचय; शर्मिला देशमुख-घुमरे
पुस्तक परिचय
जागरण…! एक “जागवणारे ” वास्तव
निवडुंगाच्या काट्याप्रमाणे
बोचणारे समाजकंटक काटे
प्रगतीच्या अडथळ्यासाठी
अडवून उभे असतात रस्ते
त्यातून मार्ग काढून पुढे गेले
असे थोर शिक्षक ‘भारत सातपुते’..
‘जागरण’ हा भारत सातपुते यांचा जीवन प्रवास. त्यांना जे आठवले त्यांनी जे अनुभवले, त्यांना जे आढळले ,पाहिलेले क्षण ,घटना, प्रसंग या जागरण मध्ये त्यांनी रेखाटले आहेत.
हे ‘जागरण’ स्वराज्यासाठी निर्भीडपणे जागरण करणाऱ्या देशभक्तांना त्यांनी अर्पण केले आहे. थोरामोठ्यांची, संत महात्म्यांची ,बलिदानाची ,त्यागाची अशी ही भूमी व्यसनांच्या, भ्रष्टतेच्या अंधश्रद्धेच्या ,ढोंगीपणाच्या, अनागोंदीच्या विळख्यात गुदमरते आहे, हे त्यांना पहावले नाही .लहानपणापासून आई-वडिलांचे, गुरुजनांचे ,पुस्तकांचे सुसंस्कार मनावर राज्य करत असतील त्यामुळेच त्यांचा हा संघर्ष घडला असे त्यांनी आपल्या मनोगतात म्हटले आहे. त्यांचा संघर्ष करताना त्यांनी स्वतःची बदनामी ,रस्त्यात येणारे काटे ,राजकारणी किंवा समाजकंटक या कोणाचाही विचार केला नाही. इतकेच काय त्यांनी समाजहितासाठी ,विद्यार्थ्यांच्या हितासाठी स्वतःच्या कुटुंबाचाही विचार केला नाही.
बऱ्याच वेळा त्यांना खरे बोलण्याचा तोटाही सहन करावा लागला .शिक्षण समिती सदस्य पदाचा आदेश त्यांना खरे बोलण्यामुळे मिळाला नाही. कोणत्याही पदासाठी किंवा पुरस्कारासाठी त्यांनी खोटेपणा स्विकारला नाही. आज कालचे पुरस्कार पैशाच्या जोरावर मिळतात हे त्यांना कधीही मान्य नव्हते ,त्यांनी बरेच पुरस्कार नाकारले. त्यांना बऱ्याच वेळा चांगल्या कामाचे दुष्परिणाम ही भोगावे लागले . कॉपीमुक्त शाळेच्या प्रकरणात त्यांना तालुका बदलीचे आदेश विनाकारण आले. तसेच ‘ज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच खरे ‘या उक्तीप्रमाणे गावासाठी चांगले काम करणे हे सुद्धा त्यांच्या अंगलट आले आणि ते सुद्धा बदलीचे कारण ठरले. स्वतःची चूक मोठ्या मनाने मान्य करणारा लेखक त्यातून वाटणारा पश्चाताप व मानसिक अस्वस्थता प्रकर्षाने त्यांनी मांडली आहे. त्यांनी वैयक्तिक चूकाही तेवढ्याच स्पष्टपणे समाजासमोर मांडल्या आहेत तसेच त्यांच्या शालेय जीवनातील शिक्षक म्हणून जगत असताना ज्या काही चुका झाल्या त्याही मांडल्या आहेत.
स्वतःचे काही बाबतीतील अज्ञान त्यांनी लपवले नाही. माझे काम नाही मला काय करायचे म्हणून पाठ फिरवणे न जमणारा शिक्षक, कॉपीमुक्त परीक्षा करण्यासाठी प्रयत्न व त्यातून येणारे विविध अनुभव, शालेय वस्तूंचा गैरवापर, त्याची पुनर्बांनी ,स्वतःच्या मुला मुलींवरील संस्कार, मुलांना शिष्यवृत्ती उचलू न देणे ,उत्पन्नाचे प्रमाणपत्र जर दहा हजार ने कमी दिले तर 56 हजार वाचत होते परंतु त्यांनी ते मान्य केले नाही कारण “नैतिकता पाळावी नाहीतर मन खाते “असे ते म्हणतात.
विद्यार्थ्यांना व्यायामासारख्या चांगल्या सवयी लावण्यासाठी मुख्यालयी राहून स्वतःच्या हाताने बनवून खाणारे सातपुते सर एक आदर्शच.मोबाईलच्या दुनियेत मोबाईलवर शाळेच्या वेळेत बंदी घालणारे आदर्श मुख्याध्यापक ,त्यांनी स्वतःही मोबाईल कधी वापरला नाही त्यामुळे बऱ्याच ऑफिसच्या माहितीपासून ते वंचित असायचे. सहकाऱ्यांच्या चुकीला चूक म्हणण्याचे धाडस परिणामाची चिंता न करता ते सांगायचे.चुकणाऱ्यांना चुकांची जाणीव करून नाही दिली तर मग बरोबर चालणारे थोडेही चुकले तर त्यांना बोलता येत नाही त्यांच्या मनात येणारच ना , का बरे? चुकले त्यांना काय शिक्षा दिली? समज तरी दिली का? सहकाऱ्यांना शिस्त लावण्याच्या प्रयत्नात त्यांना स्वतःचे शारीरिक व मानसिक नुकसान सहन करावे लागले, पण या गोष्टींची त्यांनी तमा बाळगली नाही. स्वतःच्या पदाचा ‘अहं’भाव असणाऱ्या आजच्या समाजात ‘वर्ग दोन’ च्या पदावर राहून वर्ग ‘चार’ चे काम करताना त्यांनी विद्यार्थी व समाज यांच्या पुढे आदर्श घालून दिला.
त्यांनी आपल्या शालेय जीवनात विविध उपक्रम राबवले. त्यामध्ये काही उपक्रम त्यांचे उल्लेखनीय ठरतील एक शिक्षक काय करू शकतो हे त्यांनी वाचन कट्टा, पुस्तक वाचन, मुलाखती, सामान्य ज्ञान प्रश्न, स्वरचित कथा, कविता, हस्तलिखित , कविसंमेलने ,चिठ्ठी खोला झटपट बोला, पाढे आमचे पेढे, कवायत, रात्रीचे जादा तास ,सुट्टीच्या दिवशी तास असे एक ना अनेक उपक्रम सांगता येतील. स्वतःला नटवण्यात वेळ कुणी घालवावा? म्हणून त्यांनी साधी राहणी स्वीकारली होती. ते एकटे करून खातानाचे त्यांचे अनुभव मनाला हसावे की रडावे असे करून सोडतात, त्यातून त्यांची विनोद बुद्धी जाणवते. शाळेचे व्यवस्थापन चालवताना चांगले तसेच त्रास देणारे ही खूप त्यांना भेटले, पण त्यांनी स्वतःमध्ये सुधारणा केली नाही. अनेक वाईट अनुभव ‘ठेचा’ लेखकाला अर्थातच सरांना खाव्या लागल्या पण ते सुधरले नाहीत अर्थातच त्यांना सुधरायचेच नव्हते कारण त्यांना विश्वास नाही तर आत्मविश्वास होता की ते चांगले काम करत आहेत.
स्वतःची बक्षिसे खराब होण्यापासून वाचवण्यापेक्षा मुलांना ज्ञानाने घडवून त्यांना ज्ञानाची बक्षिसे मिळवून देणे जास्त मोलाचे वाटून स्वतःच्या घराच्या दुरुस्तीसाठी दोन दिवस ही न देणारे शिक्षक! कोणत्या शब्दात वर्णन करावे? ‘माझे पुरस्कार, माझी पुस्तके, माझे नातलग, माझे वशिले आदि शाळेबाहेर ठेवून या चिमुकल्या फुलांसारख्या बागडणार्या मुलांकडून निरागस त्याचा सुगंध घेता घेता मीही त्यांच्यासारखा मनाने खेळकर कधी झालो हे मला कळलेच नाही’ हे भारावून टाकणारे त्यांचे वाक्य. इतके भारावून जाणारे काम करूनही आपल्या पगाराच्या बदल्यात फार अल्पसे काम केले असे वाटणारे शिक्षक म्हणजे भारत सातपुते सर! चांगल्या कामासाठी ही संघर्ष आणि सेवानिवृत्तीनंतरही करावा लागलेला संघर्ष मनात कायम राहावा असाच.
खरं म्हणजे ‘जागरण’ या पुस्तकाबद्दल इतकेच वाचून काही समजणार नाही .भारत सातपुते सरांना समजून घ्यायचे तर नक्कीच ‘जागरण’ वाचकांनी वाचावे. किमान शिक्षण क्षेत्रातील तसेच शिक्षकांना हा जीवनप्रवास नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असे मला वाटते. बसा वाचीत, म्हणा उजळणी ,करा पाठ, एवढे लिहून काढा, बोलणाऱ्यांची नावे लिहा, अंगठा धरा रे , कान धरून करा उठा बशा, हाताची घडी तोंडावर बोट, कोणी बोलले तर मार मिळेल, दरवाजा बंद करून चार भिंतीत शिकवणारे शिक्षक, मुलांना एकलकोंडेपणा किंवा दाबात घेऊन शिकवणारे शिक्षक या शिक्षकांनी तर हे पुस्तक नक्कीच वाचावे. चांगले विद्यार्थी आमच्यामुळे घडले असं सांगणाऱ्या शिक्षकांना ‘उनाड’विद्यार्थी कोणामुळे घडतात? हा आत्मपरीक्षण करायला लावणारा प्रश्न विचार करायला भाग पाडतो. ‘भारत सातपुते’ सरांचा संघर्ष हा त्यांचा जीवन प्रवास सर्वांनी वाचावा असे मला वाटते.
शर्मिला देशमुख -घुमरे, बीड
शिक्षिका,कवयित्री,समीक्षक



