
0
4
0
9
0
3
अलवार तुझी चाहूल
प्रतिक्षेचा क्षणही सरला
मन आनंदविभोर झाले
अलवार तुझी चाहूल वेडया
मन प्रित चांदण्यात न्हाले ॥
धडधडली हृदय स्पंदने
काया रोमांचित झाली
पाऊले तुझी सरकतांना
अधीर मनाची खोली ॥
विरहातही समीप सख्या रे
काळजात दडलेला
पापणकाठ झाकले कितीही
काजळात लपलेला ॥
रुसलास जरी कितीही
तरी मनी तुझीच आस
अनमोल रत्ने असती कितीही
तूच एक खास ॥
गर्दीत हरवलासा वाटतो
नजरबाण सांधून राहील
अलगद झुळूक स्पर्शून गेली
अलवार तुझी चाहूल ॥
हळूच डोकावून बरस ना
वसूला तुझ्या कवेत घे ना
भिजवून तुझ्या प्रेमसरींनी
नवांकुरांना वाट दे ना ॥
सरला टाले
राळेगाव यवतमाळ
0
4
0
9
0
3





