Breaking
ई-पेपरकृषीवार्ताक्रिडा व मनोरंजनचारोळीनागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेसंपादकीयसाहित्यगंध

आवरत होता तो स्वतःला.. तरीही शेवटी कोसळलाच.. गारा होऊन”; स्वाती मराडे

गुरूवारीय चित्र चारोळी स्पर्धेचे काव्यपरीक्षण

0 4 0 9 0 3

आवरत होता तो स्वतःला.. तरीही शेवटी कोसळलाच.. गारा होऊन”; स्वाती मराडे

गुरूवारीय चित्र चारोळी स्पर्धेचे काव्यपरीक्षण

ते ग्रीष्माचं ऊन अन् ती वैशाखाची रणरण.. त्या पावसाचं‌ किती दिसापासून दूर जाणं अन् त्या मातीचं विरहात झुरणं. मध्येच येणारी वावटळ किती मांडतेय छळ. अंगावर शहारे आणणारा वारा अन् उन्हाचा चढत जाणारा पारा.. याआधीही सगळीकडे फुललेला कुसुमाकर अन् त्या पावसाची सतावणारी आठवण.. त्या कुसुमाकराकडून तिने दरवळ घेऊन ठेवलाय. स्वागताला काळजात गंध भरून ती आतुर झालीय कधी तो येतोय अन् दरवळ उधळून देतेय. किती वाट पहायची त्या धरणीने. पण कुठेच मागमूस नाही त्याचा. पाठवू कुणाला, सांगू कुणाला.. कुणीतरी घेऊन या ना त्याला. आता पाऊस तो येईल, तनमन चिंब होईल.. किती आस लागलीय मनाला.

त्यालाही यायचं होतं.. पण अजून भरलेलं शेतशिवार. असे मधेच येऊन कसं करू गपगार. त्यालाही सुचेना. आठवांचं आभाळ दाटून आलेलं. तो स्वतःला दूर नेत होता पण त्या उंचावरच्या थंड हवेने त्याच्याभोवती फेर धरला नि तो पुन्हा विरघळू लागला. आवरत होता तो स्वतःला.. तरीही शेवटी कोसळलाच.. गारा होऊन. ती मातीही चिंब होता होता सांडत होती मृद्गंध भरभरून. त्या गारांच्या रूपात आवरून धरलेल्या भावना गोठल्या तर नसतील ना? किंवा पाऊस क्षणभरासाठी का होईना त्याच्या प्रियेसाठी हिऱ्यांची रास उधळत तर नाही ना..? असा उगाचच एक गंमतीशीर विचारही मनात आला.

खरंतर त्याचं असं गारा होऊन बरसणं असतं ते वर्षातून एकदाच. तेही मार्च ते मे या काळात. क्वचित घडणाऱ्या गोष्टीचं किती अप्रूप वाटतं नाही का? पाऊसरूपी तो बर्फाचा गोळा पाहूनच हातात घ्यावा वाटतो नि मग सानथोर धाव घेतात त्या पाऊस गारा वेचायला.
चला चला रे आपण सारे
पाऊस गारा वेचायला
भरभर भरभर गिरक्या घेऊन
आनंदाने नाचायला..!

शेतातील पिके मात्र मान खाली घालून गारांना अंगाखांद्यावर झेलू लागली. वृक्षवेलींची पाने एकमेकांस बिलगून बसली. पाखरे घरट्यात चिडीचूप झाली. गाईवासरांनी गोठा जवळ केला तर मुलांनी मात्र घरातून बाहेर पडत पावसात धिंगाणा सुरू केला‌. गारांचा तो पाऊस एकच पण प्रत्येकासाठी किती वेगळा. कुणासाठी आनंदाची वार्ता तर कुणाच्या भाळी चिंता. कुणाची भिजू नये म्हणून धडपड तर कुणाची भिजण्यासाठी लगबग.

गुरूवारीय चित्र चारोळी स्पर्धेसाठी आलेले चित्र.. पाऊस गारा दर्शविणारे. कृत्रिमपणे कितीही बर्फ उपलब्ध असला तरीही निसर्गातील त्या गारा पाहताच वेचून हातात घेण्याचा मोह होतोच होतो. असेच हातात गारा घेतलेले चित्र. चित्र पाहताच गारांभोवती पिंगा घालणाऱ्या अनेक आठवणी सर्वांच्याच नजरेसमोर आल्या असतील. गारांची अतिवृष्टी होऊन रस्तोरस्ती पडलेले छोट्या गारांचे ढीग, दहा वर्षांपूर्वी मोठमोठ्या आकाराच्या पाहिलेल्या गाराही नजरेसमोर आल्या. हे सर्व शब्दबद्ध करताना साहजिकच आनंद व चिंता या दोन्हींची गुंफण करत समूहात रचना आल्या. सहभागी सर्व रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार.

स्वाती मराडे, इंदापूर जि पुणे
मुख्य परीक्षक, कवयित्री, लेखिका
मराठीचे शिलेदार समूह

5/5 - (4 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे