आहार छोट्यांचा..जबाबदारी मोठ्यांची
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
आहार छोट्यांचा..जबाबदारी मोठ्यांची
बालरंजन केंद्राने केली आहारजागृती
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
पुणे.दि.28नोव्हें (प्रतिनिधी) मुलांचा आहार हा पालकांसाठी कायम चिंतेचा विषय असतो. एकीकडे आमची मुलं खातच नाहीत, ही पालकांची तक्रार असते तर दुसरीकडे मुलांना ताटात वाढलेले जेवण मुळीच खायचे नसते. या कळीच्या प्रश्नावर उपाय म्हणून बालकांच्या सार्वांगीण विकासासाठी काम करणा-या बालरंजन केंद्राच्या वतीने मुलांच्या आहाराबद्दल जागृतीसाठी आहारतज्ञ गंधाली गुर्जर यांचे व्याख्यान आयोजित केले होते.
यावेळी मार्गदर्शन करताना गंधालीताईंनी महत्वाच्या टीप्स दिल्या. त्या म्हणाल्या, मुलांच्या जिभेची चव विकसित होण्यासाठी त्यांना नवनवीन पदार्थ चविष्ट पध्दतीने करून खाऊ घालायला हवे. हिरव्या पालेभाज्या, केशरी,लाल, पिवळ्या रंगाची फळे, फळभाज्या यांचा समावेश असलेली रंगीबेरंगी आकर्षक थाळी मुलांना दिली तर ती ते नक्की मजेत खातील. मुलांच्या आहारात सुदृढतेसाठी दूध आवश्यक आहे, पण मुले दूध पिण्याचा कंटाळा करतात;
म्हणून पोळ्यांची कणिक दूधात भिजवावी. किंवा दही, ताक, मिल्कशेक स्वरूपात दूध दिले तर मूले आवडीने घेतील. तसेच, स्ट्रॉबेरी, काकडी अशी काही फळे,भाज्या खाल्ल्याने दात आपोआप स्वच्छ होतात, हे मुलांच्या लक्षात आणून दिल्यास मुले हे पदार्थ खाण्यास प्रवृत्त होतील.
पदार्थ तयार करताना त्याला सौम्य फोडणी द्यावी. भाज्या फार मऊ शिजवू नयेत, असे सांगतानाच मुलांना प्रलोभन दाखवून भूक नसताना, बळजबरीने बळेच खायला घालू नये, असेही त्यांनी आवर्जुन सांगितले. तसेच, बेकरी पदार्थ, मिठाया आणि बंद पाकीटातले खारावलेले तयार पदार्थ यापासून मुलांना शक्य तितके दूर ठेवण्यावर त्यांनी भर दिला.
बालरंजन केंद्र संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रास्तावना मांडताना “आहार छोट्यांचा; पण जबाबदारी मोठ्यांची” या संकल्पनेमागची भूमिका स्पष्ट केली. विभावरी सप्रे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. दीप्ती कौलगुड यांनी आभार मानले.





