“शपथ पाळण्यासाठी नैतिकता हवी”; वृंदा करमरकर
सोमवारीय 'काव्यत्रिवेणी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

“शपथ पाळण्यासाठी नैतिकता हवी”; वृंदा करमरकर
सोमवारीय ‘काव्यत्रिवेणी’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
“मुखी सुधेचा कलश लाविला, एकही नाही घोट घेतला,
नकोस घेऊ असा हिसकूनी, नकोस देऊ दगा…”
महाभारतात डोकावले असता, शपथ किंवा वचन या अर्थानं एक प्रसंग आठवतो. देवव्रत म्हणजेच ‘भीष्माचार्य’ सावत्र माता सत्यवती हिला तिच्या इच्छेप्रमाणे, तिच्या मुलांना राज्य मिळावं म्हणून, आजन्म ब्रम्हचारी राहण्याची शपथ देतात. हे वचन ते निष्ठेने पाळतात. तीच ही प्रसिद्ध ‘भीष्मप्रतिज्ञा’. त्यानंतर आठवते रायरेश्वराच्या मंदिरात वयाच्या सोळाव्या वर्षी शिवरायांनी आपल्या सवंगड्यांसह घेतलेली ‘स्वराज्याची शपथ’. ही शपथ पूर्ण करण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. तसंच लोकमान्यांनी केलेलं ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ हे विधान ही एक शपथच होती. वीरांगना झाशीच्या राणीची ‘मेरी झांसी नही दुंगी’ ही सुध्दा शपथच.
अगदी प्राचीन काळी वस्तु विनिमय पध्दती होती. त्यावेळी दोन्ही बाजूंची सत्यता पटावी म्हणून शपथ घेतली जायची. जी गोष्ट आपल्याला प्रिय असते तिची शपथ घेतली जाते. मग देवाची, देशाची किंवा आपल्या आईची शपथ घेतात. प्रियकर प्रेयसी आपल्या प्रेमाची, वचनाची अगदी मनात असलेल्या मोरपिसाची सुध्दा शपथ घेतात. ‘दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे’.
राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, इतर मंत्रीगण, सर्वोच्च व उच्चन्यायाधीश, संसदेचे तसेच राज्य विधिमंडळांचे सभासद यांना अधिकार ग्रहणापूर्वी व न्यायालयात पुरावा देऊ इच्छिणाऱ्यांना साक्ष देण्यापूर्वी, विहित नमुन्यात शपथ घ्यावी लागते. न्यायालयात ‘ईश्वरसाक्ष खरं सांगेन’ अशी साक्ष देणाऱ्यास, भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घ्यावी लागते. त्यामुळं त्या व्यक्तीच्या खरेपणावर विश्वास बसतो. पण खरा प्रश्न हा आहे कि, सध्या या शपथांचं खरेपणानं पालन केलं जातं का? ते पालन केलं जात असतं, तर प्रेमभंग, प्रेमात फसवणूक झालीच नसती. सर्वसामान्य जनतेची फसवणूक झालीच नसती. चोर सोडून संन्याशाला फाशी दिली गेली नसती.
खोटी साक्ष देणारे एवढे निर्ढावले नसते. विवाह प्रसंगी सप्तपदी प्रथेत या शपथाच असतात. पती पत्नींनी एकमेकांशी प्रामाणिक राहण्यासाठी घेतलेल्या. पण आता यांची सर्रास पायमल्ली होताना दिसते. म्हणून घटस्फोटाचं वाढतं प्रमाण आहे. सत्तेचा गैरवापर होताना दिसतो. कारण सर्वत्र नैतिकतेचा अभाव जाणवतो. आज आपल्या ‘काव्यत्रिवेणी’ स्पर्धेसाठी आदरणीय राहुल सरांनी दिलेला विषय भावनेला साद घालणारा आहे. शिलेदारांनी पण चांगला प्रतिसाद दिला आहे. त्याबद्दल सर्वांचे आभार आणि पुढील काव्यलेखनासाठी शुभेच्छा…!!
वृंदा(चित्रा)करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह





