पत्नीवलंबी नवऱ्याचे माहेरी गेलेल्या बायकोस पत्र…!!!
अनिता व्यवहारे ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर

पत्नीवलंबी नवऱ्याचे माहेरी गेलेल्या बायकोस पत्र…!!!
प्रिय बायको,
तुला माहेरी जाऊन आज चार दिवस झाले. पण खरं सांगू का, असं वाटतंय की, ‘माझ्या विश्वातून तू जणू डिलीट झालीस की काय!’ आज पहिल्यांदा मनापासून उमगलं मला, “तू फक्त माझी पत्नी नाहीस, तर या घराची CEO आहेस.” तू सध्या माहेर प्रोजेक्टवर आहेस, हे माहिती आहे मला… पण तुझ्या अनुपस्थितीत घराची संपूर्ण सिस्टीमच हँग झाली गं! रोज सकाळी ऑफिसला जाण्याआधी माझ्या गाढ झोपेवर प्रेमाचा घाव घालून “उठा हो… चहा थंड होतोय” असं म्हणत दिलेला तो गरमागरम चहा… आज मी स्वतः करून घेतोय,पण चव काही जमेना! बहुतेक त्यात प्रेमाची साखर कमी पडत असावी…! डब्यासाठी करायला घेतलेल्या पोळ्या तुला पाहून जशा फुगायच्या ना,तशा आता माझ्या हातानं वातड होतायेत.
भाजी कितीही समजावली तरी ती नावडतीच राहतेय कदाचित तुझ्या हातातली माया भाजीला पण चव देत असावी. घरात सगळं आहे गं— भाजीपाला, भांडी, वस्तू, फर्निचर… पण तरीही भिंती थोडया थंडच वाटतात, सगळं असूनही घर नाहीये. कुंडीत फुलं आहेत, पण त्यांच्याशी गप्पा मारणारी तू नाहीस, म्हणून तीही जणू सुगंध पसरवायला विसरलीत. तुझ्या अस्तित्वानेचं आमच्या जगाला ऊब येतेय. ऑफिसमधून परतताना मेकअपने नव्हे, तर हसण्याने उजळलेला तुझा प्रसन्न चेहरा दारात स्वागताला नसतो, तेव्हा काहीतरी चुकल्यासारखं वाटतं.
“आज वेळेवर आलास!” “थकलास का?” “काहीतरी खाऊन घे…” हा तुझा तो लटक्या काळजीचा स्वर आता ऐकू येत नाही… आणि गंमत सांगू? ज्या वेळी ती काळजी नकोशी वाटायची, आज त्याच वेळी तिची सगळ्यात जास्त गरज वाटते. रात्री जेवण झाल्यावर तू भांडी घासताना आपटाआपटीचं जे कर्कश संगीत असायचं ना, आज त्याचा अर्थ उमगतोय. भांडी घासताना तुझ्या हातावरच्या त्या चिरा आज माझ्याशी बोलतात. तेव्हा तुझ्या ओठांतून निघणारा “आह…” आज मला वेदनांचा अर्थ शिकवतोय.
आई, ताई, बायको… या जगातल्या तमाम बायकांच्या कष्टांची खरी जाणीव आज तुझ्या चार दिवसांच्या अनुपस्थितीत झाली. तुम्ही स्त्रिया नुसतं घर चालवत नाही तर घराला घरपण देतात… हेच खरं आहे. आपल्या लुटूपुटूच्या भांडणात तू म्हणायचीस ना, “अहो, मी आहे म्हणूनच तुमचा संसार नीटनेटका आहे!” आज शतप्रतिशत मान्य करतो गं… तू रोज सहज करत असलेली कामं आज माझ्यासाठी पराक्रम ठरतात. तुझ्या हसण्याची, रुसण्याची मला सवय आहे असं वाटायचं… पण आज कळतंय, ती सवय नव्हे, गरज आहे. तू घरात नसणं म्हणजे
‘घरात Wi-Fi असूनही नेटवर्क नसल्यासारखं आहे.’ माझा अहंकार आता उपकारात उतरला आहे, आणि त्याचा शहाणपणा गल्लीतगत्र झालाय. माझं आयुष्य, ऑफिस–घर–झोप या त्रिसूत्रीतून बाहेर काढायला तूच हवी आहेस गं…
लवकर ये.
माझ्या आयुष्याला
तुझ्या पदरात पुन्हा घे..!
तुझाच,
चार दिवसांतच पूर्णपणे ‘पत्नीवलंबी’ असल्याची
जाणीव झालेला
तुझा बिचारा नवरा…!
अनिता व्यवहारे
ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर
==========



