सण नाताळाचा, उत्साह सणांचा
अनिता व्यवहारे ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर

सण नाताळाचा, उत्साह सणांचा
जगाला दया, क्षमा, शांती अन् परोपकाराचा संदेश देणाऱ्या भगवान येशू ख्रिस्तांना करू या नमन. अन् साजरा करू या नाताळाचा सण..! आपल्या भारत देशामध्ये विविध जाती-धर्माचे लोक एकजुटीने राहतात. त्यामुळे आपला भारत हा सर्वधर्मसमभाव जोपासणारा देश म्हणून ओळखला जातो. प्रत्येक धर्मातील सण-उत्सव, संस्कृती परंपरा जरी वेगळ्या असल्या तरी विविधतेतून एकता असणाऱ्या, आपल्या भारतात विविध धर्मांचे सण आनंदाने, एकोप्याने साजरे केले जातात. त्यापैकी ख्रिस्ती बांधवांचा असलेला हा ख्रिसमस म्हणजे नाताळाचा सण. भारतातच नव्हे तर, इंग्रजी भाषेतील लोक हा सण साजरा करतात. या दिवसांचे महत्त्व म्हणजे 25 डिसेंबर हा येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन. त्यांनी संपूर्ण समाजाला प्रेमाने, मानवतेची शिकवण दिली. ते ख्रिस्ती धर्माचे संस्थापक/ जनक म्हणून ओळखले जातात. त्यांनी कधीही उच्चनीच हा भेदभाव मांडला नाही, तर जगभरातील लोकांना प्रेम आणि एकोप्याने राहण्याचा संदेश दिला.
ख्रिश्चन धर्मानुसार येशू ख्रिस्त हे ‘देवाचे पुत्र’ होते. ते मानव जातीला वाचवण्यासाठी या पृथ्वीवर जन्माला आले होते. त्यांचा जन्म जगाच्या इतिहासातील सर्वात मोठी ब्रम्हांडनीय घटना होती. त्यांनी मानव जातीला प्रेम व क्षमा करणे शिकवले. “प्रत्येकाच्या हृदयात प्रत्येकासाठी प्रेम असावे, येणारा प्रत्येक दिवस आनंदाचा जावा. विसरून दुःख सारे प्रेमाने राहू या.”असा संदेश देणाऱ्या या ईश्वर पुत्राला जेव्हा सुळावर चढवले जात होते तेव्हा सुद्धा, ” देवा या लोकांना माफ कर. हे काय करतात ते त्यांना समजत नाही” असे म्हणणारा हा ईश्वर पुत्र सुळावर लटकल्यानंतरही तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत होतो ते देखील दया आणि क्षमा शांतीचा संदेश देण्यासाठीच. त्यांच्या चमत्काराच्या अनेक कथा आपल्याला पवित्र ग्रंथ ‘बायबल’ मध्ये पाहायला मिळतील.
येशूच्या जन्मदिनी म्हणजेच 24 डिसेंबरच्या रात्री ‘सांताक्लॉज’ नावाचा एक देवदूत मुलांसाठी भेटवस्तू घेऊन येतो. यालाच मराठीत ‘नाताळबाबा’ म्हणूनही ओळखले जाते. सांताक्लॉज ही जरी काल्पनिक व्यक्तिरेखा असली तरी त्याबद्दलची अशी आख्यायिका सांगितली जाते की, येशू ख्रिस्त यांच्या मृत्यूच्या 280 वर्षानंतर संत निकोलस यांचा जन्म झाला. ते गर्भश्रीमंत होते त्यांचा स्वभाव दयाळू आणि वृत्ती दानी होती. ते आपल्याकडे असलेली सर्व संपत्ती गरजू लोकांचे सहाय्य करण्यासाठी खर्च करत. त्यांना लहान मुले खूप प्रिय होती. त्यांच्या या औदार्यतेमुळेच त्यांना सांताक्लॉज म्हणून ओळखले जाते आणि नाताळ या सणाची अशी अतूट नाते असते.
या सणातील दुसरी आकर्षणीय गोष्ट म्हणजे ख्रिसमस ट्री. ख्रिश्चन सुधारक मार्टिन ल्युथर 24 डिसेंबरच्या रात्री जंगलातून जात असताना संपूर्ण जंगल बर्फाच्छादित दिसत होते. तिथेच एक सदाहरित झाड होते. त्या झाडाच्या फांद्यांवर चंद्रप्रकाश पडल्याने ते अधिक सुंदर दिसत होते म्हणून मार्टिन यांनी ते झाड घरी आणले. त्यानंतर येशू ख्रिस्त यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी या झाडाची सजावट केली. आणि तेव्हापासून दर नाताळ सणाला असे ‘ख्रिसमस ट्री’ उभारले जातात. चला तर आपणही करूया साजरा सण नाताळचा एकमेकांना देऊन संदेश दया क्षमा आणि शांतीचा. सर्वांना नाताळ निमित्त हार्दिक शुभेच्छा..!
अनिता व्यवहारे
ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर
=========





