बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज,आवास मध्ये विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन
बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज,आवास मध्ये विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन
शैक्षणिक सहल म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आनंदाची पर्वणीच
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
अलिबाग: शनिवार दि. ७ डिसेंबर २०२४ रोजी आ.सा. धो. रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, आवास मध्ये मुख्याध्यापक/ प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांच्या सुनियोजनातून व मार्गदर्शनातून इ. ५ वी ते इ. १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
त्यानुसार सकाळी ठीक ५.३० वाजता विद्यार्थी व शिक्षक विद्यालयातून एस. टी. बस मध्ये बसून मौज मजा करत, गाणी म्हणत सर्व प्रथम रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील महड या ठिकाणी पोहोचले. तेथील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या वरद विनायकाच्या मंदिरात जाऊन प्रत्येकाने वरद विनायकाचे दर्शन घेतले. मंदिराचा पेशवेकालीन हेमांडपंथी गाभारा, मंदिराच्या चारही बाजूस दगडांच्या हत्तींच्या मूर्ती, २५ फूट उंचीचा कळस व मंदिराच्या वास्तू वरील सुंदर कोरीव नक्षीकाम काम पहाण्याचा सर्वांनी आनंद घेतला. आजूबाजूच्या परिसरात भटकंती केली.
त्यानंतर पुन्हा एस. टी. बस मध्ये बसून सर्वजण पुणे जिल्हातील मावळ तालुक्यातील वेहेरगाव या ठिकाणी आले. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या, वेहेरगाव – कार्ला नावाने सुप्रसिध्द असलेल्या गडाच्या ५०० पायऱ्या चढून कार्ला लेण्यांनी वेढलेल्या एकविरा देवीच्या मंदिरापाशी पोहचले. मंदिरात जाऊन सर्वांनी एकविरा मातेचे व जोगेश्वरी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर बाजूच्या परिसरात असलेली बौध्द लेणी पाहिली. आजूबाजूच्या परिसरात गप्पागोष्टी करत, गाणी म्हणत भटकंती करून सर्वांनीच सहलीचा मनमुराद आनंद लुटला. तेथील निसर्ग सौंदर्य पाहून सर्वांच्याच डोळ्यांचे पारणे फिटले. प्रत्येकाच्या आनंदाला पारावारच उरला नाही.
त्यानंतर सर्वजण एस. टी. बस मध्ये बसून वेहेरगाव – कार्ले गडा पासून जवळच असलेल्या संत तुकाराम महाराज मंदिरापाशी आले. तेथे मंदिरात जाऊन सर्वांनी संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर सर्वांनी स्नेहभोजन केले व आजूबाजूच्या परिसरात भटकंती केली.
त्यानंतर सर्वजण एस. टी. बस मध्ये बसून लोणावळा परीसरातील वरसोली गावातील जागतिक दर्जाच्या सुनिल्स वॕक्स म्युझियम येथे पोहचले. सर्वांनी तेथे असलेले अनेक सुप्रसिद्ध व्यक्तींचे, अनेक विक्रमी नामवंतांचे मेणाचे पुतळे पाहिले. या मेणाच्या पुतळ्यांच्या डोळ्यांमधील जिवंतपणा, चेहऱ्यावरील भाव, हातांवरील सुरकुत्या व पेहरावातील नेमकेपणा त्या व्यक्तीमत्वाच्या इतका जवळ जाणारा आहे की आपण जणू प्रत्यक्षच त्या व्यक्तीला भेटतो आहोत असे सर्वांना वाटले.
त्यानंतर सर्वजण तेथे असलेल्या विविध खेळात व उपक्रमात सहभागी झाले. तसेच सर्वांनी तेथे असलेल्या मध्ययुगीन विविध वस्तूंचे संग्रहालय पाहिले. त्यानंतर सर्वांनी तेथील 3D सिनेमा शो पाहण्याचा आनंद घेतला. तसेच तेथील विस्मयकारक असे हंटर दालन पाहिले. एकूणच वॕक्स म्युझियम पाहून सर्वांच्याच डोळ्यांचे पारणे फिटले.
त्यानंतर सर्वजण एस. टी. बस मध्ये बसून लोणावळ्यातील मॕप्रो गार्डन याठिकाणी पोहचले. तेथील परिसरात मौजमजा करत भटकंती केली आणि विविध प्रकारच्या खाद्य पदार्थाची खरेदी केली.
त्यानंतर सर्वजण एस.टी. बस मध्ये बसून लोणावळा परीसरातील धनकवडी येथील ४.५ एकर विस्तृत जागेत असलेल्या नारायणी धाम मंदिर या लोकप्रिय पर्यटन स्थळी पोहोचले. चारमजली प्रवेशद्वारातून प्रवेश करून मंदिराच्या मार्गावर असलेले कारंजे पाहण्याचा आनंद घेत सर्वांनी शुभ्र मार्बलच्या चित्तवेधक, मनोहारी तसेच परंपरा व आधुनिकतेचा सुसंवादी संगम असलेल्या नारायणी मातेच्या मंदिरात जाऊन नारायणी मातेचे व विविध देवदेवतांचे दर्शन घेतले. त्यानंतर तेथील सुंदर व उत्तम देखभाल लाभलेल्या, अध्यात्मिक शांतता असलेल्या बागेत विहंगम दृश्ये पहात, गप्पा गोष्टी करत सर्वांनी भटकंती केली. तेथे ६० पेक्षा अधिक गाई असलेली गोशाळा पाहिली.
त्यानंतर तेथून सर्वजण एस. टी. बस मध्ये परतीच्या प्रवासाला लागले. मौज मजा करत सर्वजण रात्री ८.३० वाजता वावोशी या ठिकाणी आले व तेथे सर्वांनी स्नेहभोजन केले. त्यानंतर तेथून एस. टी. बस मध्ये बसून सर्वजण मौजमजा करत, सहलीचा मनमुराद आनंद लुटून रात्री ११.०० वाजता विद्यालयात पोहचले.
सहली मध्ये १० शिक्षक, ५ शिक्षकेत्तर कर्मचारी आणि इ. ५ वी ते इ.१० वी चे १७० विद्यार्थी सहभागी झाले होते. ही सहल यशस्वी होण्यासाठी सहल प्रमुख दिलिप चव्हाण सर यांचे फार मोठे योगदान आहे. तसेच या सहलीसाठी मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकूंडे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी या सहली साठी मोलाचे सहकार्य केले.





