Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेमुंबईविदर्भसाहित्यगंध

किल्ले मच्छिंद्रगड

स्वाती मराडे-आटोळे

0 4 8 2 9 4

किल्ले मच्छिंद्रगड

मध्यम चढाई असलेला गिरीदुर्ग प्रकारातील ‘मच्छिंद्रगड’ हा सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एक किल्ला आहे. इ.स. १६७६ च्या सुमारास स्वराज्यास बळकटी आणण्यासाठी छत्रपती शिवरायानी एक दुर्गशृंखला बांधली, त्यापैकी मच्छिंद्रगड हा शेवटचा किल्ला होता. हा किल्ला कमळ भैरवाच्या डोंगराशेजारील एका गोलाकार टेकडीवर उभा आहे. मच्छिंद्रगडावर जाण्यासाठी जवळचे कराड किंवा इस्लामपूर येथून जाता येते. कराड ते रेठरे कारखाना बसने रेठरे कारखाना येथे उतरून तिथून खाजगी वाहनाने मच्छिंद्रगडाच्या पायथ्याशी उतरतून गडावर जाता येते.

इस्लामपूरहून रेठरे कारखान्याकडे बस किंवा खाजगी वाहनाने जाताना गडाच्या पायथ्याजवळ उतरता येते. गडाच्या दक्षिण अंगाच्या बेरड माची गावातून पायर्‍यांची वाट मागच्या बाजूने माथ्यावर येते. बेरडमाची गावात जाण्यासाठी रेठरे-कोळे नरसिंगपूर रस्त्यावरुन फाटा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मच्छिंद्रगडाची उभारणी केली. किल्ले मंच्छिंद्रगड गावातून गेल्यास उत्तर दरवाज्यातून आपला प्रवेश होतो. गडाचे प्रवेशद्वार नष्ट झाले असले, तरी त्याची गोमुखी बांधणी लक्षात येते.

गोमुखी दरवाजा, माची ह्या सर्व शिवनिर्मीत गडाची वैशिष्ट्ये इथे पहाण्यास मिळतात. कोणत्याही रस्त्याने साधारण अर्धा तास चढाई केल्यानंतर आपण मच्छिंद्रगडाच्या माथ्यावर येऊन पोहोचतो. येथून एक पायवाट आपल्याला गडाच्या दक्षिण भागात असलेल्या मच्छिंद्रनाथ मंदिराकडे घेऊन जाते. मंदिर प्रशस्त असून विविध शिल्पांनी सजविलेले आहे. येथे भाविकांचा नेहमी राबता असतो. मंदिरा समोर तोफा मांडून ठेवल्या आहेत. काही तोफा जमीनीत गाडल्या आहेत. येथून देवळाच्या पिछाडीस एक मोठी कोरडी विहीर आहे, नंतर तटाकडेने पुढे गेल्यावर जुन्या काळातील समाध्या दिसतात. मच्छिंद्रगडाचा माथ्याचा आकार आटोपशीर असल्यामुळे गडफेरी साधारण तासाभरात पूर्ण होते, गडावर जुने अवशेष तसे फार कमी असून तटबंदीसुद्धा आता जुजबी स्वरूपात उरलेली आहे.

दक्षिण टोकाला बुरुज आणि दरवाज्यातून वाट खाली उतरते. ही वाट बेरड माची गावात जाते. गडाला दोन माच्या आहेत. पुर्वेकडची लवणमाची आणि पश्चिमेकडची बेरडमाची. गडाच्या पुर्व उतारावर नव्याने जीर्णोध्दार केलेले दत्त मंदिर आहे जवळच झरा आणि खडकात खोदलेले कोरीव टाके आहे. गडावर सतत वहाणारे वारे, उसाच्या शेतीचा समॄध्द परिसर, कॄष्णा नदी, पुर्वेला दिसणारी सागरेश्वर अभयारण्याची रांग, नवीनच विकसित झालेले “चौरंगीनाथ” हे पर्यटनस्थळ, उत्तरेला दिसणारा सदाशिवगड आणि लांब दक्षिणेला दिसणारा विलासगड उर्फ मल्लिकार्जुन. एकंदर खुपच सुखद अनुभव देणारा हा ट्रेक आहे.

स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
मुख्य सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे