0
4
0
9
0
3
भीमा…..कसा फेडू उपकार!
सांगू किती किती तुझे,
तुझे थोर चमत्कार…
स्वप्न समाजाचे केले,
भीमा तुच रे साकार…१
जाती धर्मातला भेद,
केला कष्टाने तू दूर…
बौध्द धर्माच्या दिक्षेत,
नव्या युगाताती धूर…२
दलितांचा झाला वाली,
दीन दुबळ्यांची काठी…
वंचितांच्या भविष्याच्या,
उभा ठाकला तू पाठी…३
दिला जगण्याचा हक्क,
लिहूनिया संविधान…
वाचा फोडली मुक्यांना,
जागवून स्वाभिमान…४
न्याय स्वातंत्र्य समता,
दिला बंधूताचा मंत्र…
जगण्याचे सांगूनिया,
गेला खरे खरे तंत्र…५
शिल्पकार घटनेचा,
केला प्रजेचा उद्धार…
‘सुधाकरा’ भीमा तुझा,
कसा फेडू उपकार…६
सुधाकर भगवानजी भुरके आर्य नगर नागपूर
0
4
0
9
0
3





