जिल्हा परिषद शाळेची उंच भरारी
कुसुमलता दिलीप वाकडे

जिल्हा परिषद शाळेची उंच भरारी
मातृभाषेतून शिक्षण सर्वोत्तम शिक्षण
राज्य शासनाने वीसपेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळातील विद्यार्थ्यांना जवळील गावाच्या शाळेत भरती व शिक्षकांना निलंबित किंवा इतर शाळेत जादा शिक्षक म्हणून स्थानांतर करायची अशी चढाओढ सुरू केली आहे. पण याला कारण म्हणजे 1 ते 7 वर्ग असलेल्या शाळेत चार शिक्षक असतात. एका शिक्षकाला जोड वर्ग ते तरी काय करणार त्यातल्या त्यात प्रशिक्षण, सभा, सर्वेक्षण,अशैक्षणिक कामे,ऑनलाईन कामे, शिक्षक वैतागून जातात. त्याची मनापासून इच्छा असते की, आपण आपले दैवत विद्यार्थी यांना शिकविले पाहिजे. जे येत नाहीत ते समजवून सांगितले पाहिजे. पण तसे होत नाही. या अशासकीय कामामुळे त्यांना विद्यार्थ्यांना पूर्ण वेळ देता येत नाही.
येत्या तीन चार वर्षापासून शिक्षकांनी स्वतःला तंत्रस्नेही करून शाळेची, विद्यार्थ्याची प्रगती करून घेतली. शाळेची रंगरंगोटी करून घेतली, शाळा डिजिटल केल्यात, शाळेत काॅम्पुटरवर विद्यार्थ्यांचा अभ्यास, शाळेत विद्यार्थ्यांना आता टॅब सुध्दा मिळतात. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण चांगले असुनही पालकांना कितीही खात्रीने पटवून सांगून सुध्दा पालकांचा इंग्रजी शाळेकडे शिकविण्याचा कल व आजूबाजूचे पालक इंग्रजी काॅन्व्हेटला टाकतात. म्हणून आपणही आपल्या पाल्यास टाकायचे हे वेड त्याच्या डोक्यात असते. काही पालकांना काय म्हणावे घरचे वातावरण तसे नसताना सुध्दा काॅन्व्हेटला प्रवेश घेतात व मुलाचे वर्ष वाया गेल्यावर वय वाढल्यावर जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेण्याकरीता येतात. असेही पालक आहेत. जिल्हा परिषद शाळेची वैशिष्ट्य म्हणजे इथे मोफत दोन गणवेश, मोफत पुस्तके,बुट,साॅक्स,शालेय पोषण आहार, शिष्यवृत्तीची तयारी,नवोदय विघालयाची तयारी करून घेतली जाते. आईवडीलाचा पैसा वायफळ खर्च करण्यापेक्षा तो पुढील उच्च शिक्षणाकरीता शिल्लक असू द्यावा पूर्वी झालेले कलेक्टर, सीईओ, यांनी सुध्दा जिल्हा परिषद किंवा सरकारी शाळेतूनच शिक्षण घेतलेले आहेत.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिवाळी या आदिवासी पाड्यावरील जिल्हा परिषद शाळा राज्यभरात नव्हे तर, देशभरात चर्चेचा विषय ठरलेली आहे. या शाळेतील आदरणीय केशव गावीत या अवलीया शिक्षकांने आपल्या अथक परिश्रमातून ते 365 दिवसातून 12 तास सकाळी 7.30 ते रात्री 8.30 पर्यंत विद्यार्थी कसलीही सुट्टी न घेता सतत शाळा सुरू असते. अभ्यासा व्यतिरीक्त इतर उपक्रम, दोनही हाताने लेखणाचा सराव, हजार संख्येचा पाढा,शेतीचे कामे करणे,विद्यार्थ्यांच्या स्मरण शक्ती नुसार शिक्षण, विद्यार्थी विद्यार्थ्यांना शिकवतात. मोठ मोठे अधिकारी गावीत सरांची शाळा,विद्यार्थी व त्याची मुलाखत घेण्यास येतात.आता 2025 -26 या सत्रात तर बरीच जिल्हा परिषद शाळेच्या प्रगतीच्या पाऊलांची उदाहरणे आहेत.
आरपाडी येथील जि.प.शाळा क्र 1 येथे विलक्षण व कौतुकास्पद घडलं. अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये राहणार्या शेळके कुटुंबीयांनी आपला मुलगा विहान याला थेट जि.प.शाळेत इयत्ता दुसरी मध्ये दाखल केले. विहान याचे वडील विजयकुमार शेळके आणि आई भारती शेळके हे दोघेही न्यूयॉर्कमध्ये आयटी इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. विहानचं शिक्षण उत्तर कॅरोलिनाच्या शालाॅट येथील हाॅकरीज येथे प्राथमिक सुरू झालं होतं. काही काळासाठी भारतातच तेही मराठी माध्यम मध्ये शिक्षण व्हावे म्हणून आजोळी आटपाडी येथील मामा डाॅ.उमेश बालाटे यांचे गावी जि.प.क्रमाक 1 ची निवड करण्यात आली.
तसेच शालेय शिक्षणमंत्री ना.भी.भुसे यांच्या दोन्ही नाती कु.अहिल्या व कु.भवण्या याचा सुध्दा याच सत्रामध्ये सरकारी शाळेत प्रवेश घेण्यात आला. बरीच अशी उदाहरणे आहेत की,अंबाजोगाई येथील क्लासवन अधिकारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ अधिव्याख्याता श्री.किशन देशमुख व आई किरण देशमुख या सुंदरराव सोळंके महाविद्यालय प्राध्यापक आहेत. आर्थिक परिस्थिती सक्षम असताना देखील आपली कन्या सानिका हिचा जि.प. शाळेत प्रवेश घडवून आणला. विशेष म्हणजे मालेगाव ही शाळा शहरापासून दहा कि.मी.अंतरावर असल्यामुळे ये-जा करण्यासाठी रिक्षाची सोय करण्यात आली आहे.
शैक्षणिक सत्र 2025-26 पासून जि.प.शाळेत सीबीएसई प्रमाणे अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे. अनुभवी शिक्षक आपल्या अनुभवातून शिकवणार आहे. एकंदरीत इंग्रजी माध्यमापेक्षा मराठी माध्यमातून दर्जेदार शिक्षण मिळते, त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास होतो. इंग्रजी शाळेतील विद्यार्थी तांत्रिकासारखे घडविले जातात.त्यामुळे लहान मुलांना मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण देणे गरजेचे आहे. म्हणूनच मी म्हणेल की जि.प.शाळेत आपल्या पाल्यांचा प्रवेश घ्या. कारण जि.प.शाळा आता उंच भरारी घेत आहेत. मातृभषेतून शिक्षण हेच सर्वोत्तम शिक्षण.
कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी रोड,नागपूर
(लेखिका निवृत्त पदवीधर शिक्षिका आहेत)





