लोकशाही वाचवणाऱ्या मतदार बहिण भावास…!!
ही लोकशाही इथल्या सत्ताधाऱ्यांना संपवायची आहे.

लोकशाही वाचवणाऱ्या मतदार बहिण भावास…!!
माझ्या साबूत मेंदूच्या मतदार बंधू भगिनींनो आपणास सप्रेम जय गुरु. भारताची लोकशाही जिवंत ठेवल्याबद्दल मी आपले मनापासून अभिनंदन करतो आणि आपणास धन्यवाद देतो. 2024 ची ही निवडणूक म्हणजे ज्ञानोबा, तुकोबा की मनू. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगेबाबा की बागेश्वर, राम – रहीम, आसाराम ही निवडणूक म्हणजे शिव, शाहू, फुले, सयाजी, अण्णाभाऊ पंजाबराव की सावरकर, हेडगेवार, गोळवलकर. या निवडणुकीत मनूने आपलं अक्राळविक्राळ रूप बदलवून मोहिनी रूप धारण केले होते. वरील संत आणि महापुरुषांच्या वारसदारांनी आधुनिक मनूचा बुरखा फाडून त्याचे वास्तविक रूप तुमच्यासमोर आणले या घटनेवरून आपण लक्षात ठेवलं पाहिजे की मनू हा कधीच मरत नसतो. तुमच्या स्वातंत्र्यावर गदा आणून तुम्हाला गुलाम करण्यासाठी, तुमच्या जीवनात आलेले आनंदाचे क्षण हिरावून घेण्यासाठी, तुम्हाला मिळालेले हक्क आणि अधिकार संपवण्यासाठी, तुमच्या प्रतिभेला फुटलेले पंख छाटण्यासाठी, मनू हा नव्या रूपामध्ये येत असतो. त्याला ओळखण्यासाठी वरील संत महापुरुषांनी सांगितलेल्या खुणा ह्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. शत्रूची ओळखच नसेल तर संघर्षाची दिशा चुकीची ठरेल आणि आपल्याच भावंडांचे मुडदे पाडण्यास आपण मागे पुढे पाहणार नाही हा आपला इतिहास आहे. सदर निवडणुकीत मनू हा तुमच्या घरासमोर येऊन दारावर थापा देत होता. तुम्ही त्याच्या ढुंगणावर लाथ मारून पुन्हा महावीर, बुद्ध, बसवेश्वर, नामदेव, ज्ञानोबा, तुकोबा, शिव, शाहू, सयाजी, फुले, आंबेडकर, तुकडोजी, गाडगेबाबा, अण्णाभाऊ, पंजाबराव, या संत महापुरुषांचे मताच्या सुगंधित फुलांनी स्वागत केल्याबद्दल तुम्ही धन्यवादास पात्र आहात.
माझ्या प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो,भारताच्या लोकशाहीची जडणघडण इथल्या स्वातंत्र्य लढ्यातून झालेली असून या स्वातंत्र्यलढ्यात इथल्या मनुवाद्यांचा कोणताही वाटा नाही,कुठलंही योगदान नाही. त्यामुळे भारत 2014 ला स्वातंत्र्य झाला. ही लोकशाही आम्हाला भिकेतून मिळाली,हे संविधान आम्हाला बदलवायचं आहे अशा पद्धतीचे वक्तव्य येणे हे स्वाभाविक आहे. दोन हजार वर्षे हा देश मनूच्याच कायद्याने चालत होता. स्वातंत्र्यापूर्वी हा देश असा कधीच नव्हता. नवऱ्याने बायकोला टाकून दिले की ती बेवारस असायची. तिला कुठलंही आर्थिक संरक्षण नव्हतं. स्वतंत्र भारतात सर्वप्रथम घटनाकारांनी या देशातल्या माय बहिणींना आपल्या पतीच्या आणि आपल्या पित्याच्या संपत्तीत हक्काचा वाटा दिला. त्यामुळे पन्नास टक्के लोकसंख्या असणाऱ्या स्त्रियांच्या जीवनात सुखाचे आणि आनंदाचे आलेले हे क्षण पाहून इथल्या मनुवाद्यांना प्रचंड प्रमाणात मळमळ उलट्या आणि पातळ संडास होत राहते. इथल्या संपूर्ण स्त्रिया आणि बहुजन (85%) समाजाला चप्पल घालण्यासाठी सुद्धा आमची परवानगी लागत होती. ज्या बहुजन समाजावर निर्विवादपणे दोन हजार वर्ष मनुची अर्थात आमचीच सत्ता होती परंतु या देशातल्या स्वातंत्र्यलढ्यांनी, वारकरी संप्रदायाच्या संतांनी, आणि या देशातल्या घटनाकारांनी स्वतंत्र भारताच्या सत्तेची सूत्र इथल्या बहुजन समाजाच्या हातात मताच्या माध्यमातून सोपवल्यामुळे ही लोकशाही इथल्या सत्ताधाऱ्यांना संपवायची आहे.
माझ्या सुज्ञ 85% मतदार बंधू-भगिनींनो, या निवडणुकीत तुम्ही हे दाखवून दिलं की या देशातल्या सगळ्या सरकारी यंत्रणा ताब्यात घेऊन, त्यांचा वाटेल तसा गैरवापर करून, निवडून दिलेले पक्षातील लोकप्रतिनिधींना वाटेल तितका पैसा देऊन त्यांना खरेदी करून, प्रादेशिक पक्ष फोडून, सत्ता आणि संपत्तीचं आमीष देऊन सुद्धा जे फुटत नाही अशा प्रामाणिक लोकप्रतिनिधींना तुरुंगात डांबून, दडपशाहीने शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडून, प्रसंगी सातशे शेतकऱ्यांना जिवानिशी मारून, या देशातला चौथा स्तंभ म्हणजे मीडिया विकत घेऊन, या देशातल्या लोकांना धर्माचा धतुरा देऊन आणि लोकांच्या हृदयातला राम कुस्करून अयोध्येत राम मंदिर बांधून, या देशातील लोकशाही कोणी संपवू शकत नाही आणि या देशाचं संविधान कोणी बदलवू शकत नाही. या निवडणुकीतून तुम्ही हे दाखवून दिलं कि तुम्ही कुठल्या लुंग्या सुंग्या बागेश्वर, राम- रहीम, आसाराम, प्रदीप मिश्रा चे बिनडोक भक्त नसून इथल्या धर्मलंडांच्या पाठीवर अभंगाचे कोडे बरसवून त्यांना रक्तबंबाळ करणाऱ्या विवेक वादी तुकोबाचे सातशे वर्षाच्या आधी विज्ञानवादी विचार पेरणाऱ्या ज्ञानदेवाचे वारकरी आहात.मनुस्मृती गाडणाऱ्या शिवरायांचे, मनुस्मृती जाळण्याचे आव्हान करणाऱ्या ज्योतिबाचे आणि मनुस्मृति प्रत्यक्ष जाळणाऱ्या बाबासाहेबांचे अनुयायी आहात. ही लोकशाही जिवंत ठेवल्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे.
हेमंत टाले





