‘रमाची पाटी’ हा लघुपट समाजासाठी उदबोधक; डाॅ.मधुसूदन घाणेकर
वसुधा नाईक, प्रतिनिधी
‘रमाची पाटी’ हा लघुपट समाजासाठी उदबोधक; डाॅ.मधुसूदन घाणेकर
वसुधा नाईक, प्रतिनिधी
पुणे : (दि.16): “वंचित, शोषित, पीडित, दिव्यांग यांची दुःख तसेच प्रतिकुलतेशी झगडताना करावा लागणारा संघर्ष समाजापुढे पारदर्शक स्वरुपात आणण्यासाठी चित्रपट माध्यम नक्कीच प्रभावी ठरु शकते. सदर वास्तववाद चित्रपटांच्या माध्यमातून पुढे आणल्यास सदर वर्गाचा विकास घडण्याच्या दृष्टीने सक्रिय होण्यासाठी समाजाला नवी दिशा मिळू शकते ” असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तिचे विचारवंत, कलावंत साहित्यिक डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी केले.
ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ.वसुधा नाईक यांनी लिहिलेल्या कथेवर ‘ वास्तव क्रियेशन ‘तर्फे ‘रमाची पाटी ‘ ह्या बालचित्रपटाची निर्मिती तयार करण्यात आली. सदर चित्रपटाच्या कथा लेखिका वसुधा नाईक , दिग्दर्शक प्रमोद सूर्यवंशी, आणि बालकलाकार ऋतुजा शिनगारे यांना मधुरंग इंटरनॅशनल फिल्म संस्थेतर्फे मधुरंग इंटरनॅशनल फिल्म ॲवाॅर्ड डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी डाॅ.घाणेकर आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलत होते.
शाळेत शिक्षिकेची जबाबदारी सांभाळताना विद्यार्थी घडवताना काही वंचित विद्यार्थ्यांच्या अनुभूतितून ‘ रमाची पाटी ‘ कथा साकार झाल्याचे वसुधा नाईक यांनी पुरस्काराला उत्तर देताना सांगितले. याप्रसंगी पुणे विद्यार्थी गृह , मराठी विभाग-शिशुनिकेतनच्या मुख्याध्यापिका सौ.अरुणा कांबळे यांना ब्रम्हध्यान विश्वपीठातर्फे आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कारही डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
समारंभाचे औचित्य साधून डाॅ.घाणेकर संपादित विश्वविक्रमी ‘ डहाळी ‘ अनियतकालिकाच्या 597वा अंकही याप्रसंगी प्रकाशित करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक मधुरंग इंटरनॅशनल फिल्मच्या निमंत्रक मधुकर्णिका सारिका सासवडे यांनी केले.दिग्दर्शक प्रमोद सूर्यवंशी तसेच मुख्याध्यापिका अरुणा कांबळे आणि शिक्षक प्रतिनिधी श्रध्दा ताम्हनकर यांचीही भाषणे झाली.युवा विश्वच्या सचिव सुचेता प्रभुदेसाई यांनी आभार मानले.महिला सन्मानच्या सचिव कवयित्री दीपाराणी गोसावी , युवा कार्यकर्त्या माधुरी भागवत आदि मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते. पुरस्कार सोहळ्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांना ‘रमाची पाटी ‘ चित्रपट दाखवण्यात आला.खाऊ वाटप करण्यात आले.





