“पर्यावरण रक्षणासाठी प्रदुषणाचा राक्षस मारणारी दुर्गा हवी”; नेहा देशपांडे
ग्रेट -भेट -थेट: मुलाखतकार: अमृता खाकुर्डीकर,पुणे
“पर्यावरण रक्षणासाठी प्रदुषणाचा राक्षस मारणारी दुर्गा हवी”; नेहा देशपांडे
नवरात्रात स्त्रीशक्ती जागी व्हावी
ग्रेट -भेट -थेट: मुलाखतकार: अमृता खाकुर्डीकर,पुणे
सृष्टीचे रक्षण करण्यासाठी शुध्द पर्यावरण हेच असावे भविष्यातले ध्येयधोरण
पर्यावरण रक्षणाचे कार्य हाती घेलेल्या स्त्रियांशी संवाद
विजयादशमीचा नवरात्र महोत्सव म्हणजे, नऊ दिवस देवी भगवतीच्या नऊ रूपांचे पूजन. आदिशक्तीने दुर्गेचं आक्रमक रूप धारण करून राक्षसांचा संहार केला आणि सा-या जगाला स्त्रीशक्तीची प्रचिती आली. आजच्या काळात हेच नवरात्र साजरं करताना आधुनिक जगातल्या सुविद्य आणि कर्तबगार महिलांनाही आपल्या जीवनात एखादे सामाजिक कार्य करताना अनेक प्रकारच्या समस्यांशी दोन हात करून लढावे लागते. अशी लढाई जिंकून जीवन संघर्ष यशस्वी करणा-या महिलांच्या कार्याचा गौरव करण्याची नवी प्रथा समाजात सध्या नव्याने रूढ होते आहे. नवरात्रीनिमित्त पर्यावरण संरक्षणाचे विधायक काम करणा-या अशाच दोन कर्तृत्ववान महिलांचा परिचय आपण करून घेणार आहोत.
संवादक- अमृता खाकुर्डीकर
काळ्या धुराच्या विळख्यात वेढलेली शहरे आणि दूषित पाण्याच्या दुष्टचक्रात आडकलेली खेडी हे सध्या आपल्या देशाचे वास्तव आहे. राजधानी दिल्ली काही दिवसापूर्वी प्रदुषित हवेचो काळी चादर लपेटून बसली होती, हे आपण पाहिलं आहे. तिच स्थिती कलकत्ता, मुंबई , बंगलोर, पुणे या शहरांची आहे. यासंदर्भात प्रदुषण पातळीची भयावह आकडेवारी नुसती ऐकली तरी श्वास कोंडल्यासारखा होतो. ही एक झलक सुध्दा किती चिंताजनक आहे, याची कल्पना अंगावर काटा आणते. या सृष्टीतले हवा, पाणी, अन्न हे निसर्गिक घटक इतक्या धोकादायक स्थितीत पोहचले असतील तर या पृथ्वीवर मनसोक्त विहरणारा माणूस आणि सारे प्राणीमात्र कसे जिवंत राहतील, कोणत्या अवस्थेत जगतील, या ज्वलंत प्रश्नाचे सत्य आपण आजही स्वीकारले नाही; तर आपल्यासारखे दुर्दैवी आपणच! हे सत्य ज्यांना दिसले आणि भोवतीच्या समाजालाही त्याविषयी सजग केले पाहिजे, अशा मनःपूत भावनेतून पर्यावरणाचे काम करायचे ज्यांनी ठरवले, अशा झपाटलेल्या पर्यावरण कार्यकर्त्या ‘प्राध्यापिका नेहा देशपांडे’ यांना एकदा तरी यासाठी भेटले पाहिजे.
त्यांच्याशी बोलल्यावर जाणीव होते, ही सुंदर निसर्गसंपन्न सृष्टी आपल्याला सतत साद घालते आहे, “सावध ऐका-पुढल्या हाका” असं तळमळीने सांगते आहे. ही तळमळ मनाच्या तळातून आली तरच माणूस एखाद्या प्रश्नाला भिडून कामाला लागतो आणि ती समस्या दूर करण्याचा ध्यास घेतो. नेहाताईंना हा ध्यास कसा जडला, हे समजून घेताना एखादी जादूची गोष्ट ऐकावी, तसा एक एक पदर उलगडत गेला.
आधी केले मग सांगितले:
नेहाताईंचा स्वभाव मुळातच निसर्गवेडा. पानाफुलात रमणा-या आणि निसर्गाचे अगम्य विभ्रम निरखणा-या नेहाताईंना लग्नानंतर सासरी आल्यावर सासूबाईंनी प्रेमाने वाढवलेली एक छोटीशी फुलबाग फुलवायला मिळाली. त्यातल्या झाडावेलींची जपणुक करताना त्यांचे या हरीत जगाशी अतूट नाते जडले. पर्यावरणावरणा विषयी मनात अतीव प्रेम होतेच, पण “आधी केले मग सांगितले”, या उक्तीनुसार त्यांनी आधी स्वतः अभ्यास केला, प्रयोग केले आणि मग लोकांना मातीविना बगीचा याबद्दलची माहिती द्यायला सुरूवात केली.
याच दरम्यान त्यांचा पीएचडीचा अभ्यास सुरू होता. “साठवलेल्या धान्याची कीड रोखण्यासाठी गोदामात वायरलेस सेन्सरचा वापर ” हा त्यांचा संशोधनाचा विषय. या विषयाचा सखोल अभ्यास करताना धान्य साठवणुकीपासून रासायनिक खतांचा भरमसाठ वापरापर्यंतच्या अनेक विषयांची पाळेमुळे त्यांच्या हाती आली. त्यातून ठिबक सिंचन, नैसर्गिक शेती, सेंद्रीय शेती, विषमुक्त उत्पादनांसाठी शेतक-यांमध्ये जागृती , असे अनेक संदर्भ तपासता आले. यातून ‘मातीविना शेती’ या पध्दतीचे त्यांना अधिक आकर्षण वाटले.
घराच्या गच्चीवर जास्वंदीची फुलझाडे, जाई-जुईच्या वेली, लिंबाची कलमे, हिरवी मिरची, मलबारी पालक, वांगी, छोटा शेवगा, लाल भोपळ्याचा वेल, अगदी ड्रॅगन फ्रूट सारखी झाडे त्यांनी याच पध्दतीने लावली. या बागेची रचना शिस्तीत व्हावी म्हणून विविध आकाराचे स्टँड तयार करून घेतले. नाजुक झाडांना थेट उन्हाचा त्रास होऊ नये, म्हणून वेल ऊंच चढवून मांडवाची सावली केली. झेंडू फुलझाडांमुळे इतर झाडांवरची कीड रोखता येते, या तत्वाने अध्येमध्ये झेंडूच्या कुंड्या ठेवल्या. मिश्र प्रकारची झाडे लागवड म्हणजे ‘पर्माकल्चर’ चा वापर करून कीड प्रादुर्भाव थांबवला. खत, पाणी, सूर्यप्रकाश यांचे योग्य व्यवस्थापन केले. घरच्याघरी विषमुक्त भाज्या फळे मिळू लागली. विविधरंगी फुलांनी बाग बहरली. त्यांचा हा प्रयोग अनुकरणीय आहे. गच्चीवर मातीच्या जड कुंड्या ठेवणे, त्यातले पाणी पाझरणे, या सगळ्या कटकटी टाळून सुटसुटीत टेरेस गार्डन करता येते. ‘सहवर्धन संस्थे’ सारख्या काही संस्था विषमुक्त पिक उत्पादनासाठी अनेक वर्ष काम करीत आहेत. त्यांचे मार्गदर्शन,सहकार्य मिळते.
कंपोस्ट खत आणि शून्य कचरा संकल्पना;
बागेच्या यशस्वी प्रयोगानंतर नेहाताईंनी ‘ग्रीन ग्रो’ म्हणजे जाड प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर करून पर्यावरणाला पूरक ठरणारे कंपोस्टखत निर्मिती आणि ‘शून्य कचरा’ या संकल्पनेवर काम सुरू केले. सध्या भर शहरी वस्तीत जिकडे बघावे तिकडे कच-याचे ढीग अस्ताव्यस्त पसरलेले दिसतात. परिसर स्वच्छता असो की घरगुती कच-याची विल्हेवाट लावणे असो, हा प्रश्न दिवसेंदिवस बिकट झाला आहे. यातून शहराच्या सौंदर्याला तर बाधा येतेच, पण सार्वजनिक आरोग्याला मोठा धोका होऊ शकतो. म्हणून शून्य कचरा ही संकल्पना प्रत्यक्षात आणणे हे खरे प्राधान्य . त्यासाठी प्रत्येकाने कचरा व्यवस्थापन नीट शिकून घेतले पाहिजे. ओला कचरा आणि कोरडा कचरा वेगळा करून त्याचे वर्गीकरण करायला हवे.
घर, हाॅटेल्स, बाजारहाट इथे पडणारा भाज्यांचा कचरा, फळांच्या साली , उरलेले अन्न पदार्थ , तसेच सार्वजनिक बागा, सोसायटी आणि बंगल्यातल्या झाडांचा पाला-पाचोळा हा सर्व ओला कचरा, त्याचबरोबर घरातली किंवा रस्त्यावरची धूळ, कागद, केसांचा गुंतवळ, कापलेली नखे हा सगळा कोरडा कचरा गोळा करून कंपोस्ट खतासाठी वापरला तर उत्तम प्रतीचे कॅल्शियम युक्त कल्चर तयार होऊ शकते. थोडेसे प्रशिक्षण किंवा प्रात्यक्षिक यातून कोणीही व्यक्ती कंपोस्ट निर्मिती प्रक्रिया शिकून घेऊ शकते.
कंपोस्टची कला अवगत झाली तर प्रत्येक जण कच-याची विल्हेवाट स्वतःच लावू शकेल. त्यातून तयार होणारे कल्चर बागेत उपयोगात आणता येईल. या नैसर्गिक खत वापरातून उगवलेली फळे, भाजीपाला हे उत्कृष्ट गुणवत्तेचे असेल. हे सगळे फायदे लक्षात घेऊन आपण सर्वजण “शून्य कचरा चळवळीत” सहभागी व्हायला हवे. ही चळवळ फोफावली तर कचरा शून्यावर येईल. घाण कुठे दिसणारच नाही, असा विश्वास नेहाताईंनी व्यक्त केला.
नैसर्गिक स्वच्छता साधनांचा दैनंदिन वापर:
फळांच्या साली,गूळ आणि पाणी या नैसर्गिक घटकांचे मिश्रण करून त्या संयोगातून तयार होणारे स्वच्छता द्रावण म्हणजे ‘लिक्वीड क्लीनर’ रासायनिक घटकांच्या हानिकारक वापरापासून आपल्याला मुक्ती देऊ शकते. सेंद्रीय कच-याचे विघटन करण्यास मदत करणा-या या द्रावणातले चांगले जिवाणू म्हणजेच उपयुक्त बॅक्टेरिया पाण्यात रूपांतरीत करून नेहाताई असे नैसर्गिक स्वच्छता द्रावण – ‘बायोएन्झाॅईन’ घरीच तयार करतात. दैनंदिन जीवनात रासायनिक घटकांना हा उत्तम नैसर्गिक पर्याय आहे. शाम्पू, कपडे व भांडी धुण्याचे साबण हे बाजारातले महागडे ब्रॅण्ड वापरण्याऐवजी नैसर्गिक पध्दतीने बायोएन्झाईन बनवणे घरच्या घरी शिकून घेतले तर खूपच पर्यावरण पूरक ठरेल. अर्थात घरी ज्यांना हे करणे वेळेअभावी शक्य नाही, त्यांनी असे पदार्थ बनवणा-या संस्था, व्यक्ती, कंपन्यांकडून आवर्जुन या वस्तू खरेदी कराव्यात असा त्यांचा आग्रह आहे. नैसर्गिक द्रव्याचे पाणी बागेला जरी गेले तरी कोणतीच हानी होत नाही. त्यातील कार्बन डाय अक्साईडचा उलट झाडांना उपयोगच होतो. त्याचप्रमाणे कीडरोगावर रासायनिक औषध फवारण्याऐवजी घरातले आंबट ताक किंवा कडू लिंबाचा रस काढून वापरावा. अशा नैसर्गिक द्रावणाचा वापर निसर्ग चक्राला उपकारक ठरतो, हे लक्षात घेउन तशी कृती पर्यावरणाच्या हितासाठी प्रत्येकाने करायला हवी.
प्लॅस्टीकचा वापर टाळा ..पर्यावरणाचे नियम पाळा:
पर्यावरणाचा सर्वात मोठा शत्रू आहे, ते प्लॅस्टीक! या प्लॅस्टीकने आपल्या रोजच्या जगण्यावर आक्रमण केले आहेच, पण एका संशोधनानुसार आपल्या शरीरातही प्लॅस्टीकने प्रवेश केला आहे. अनेक आजारांना आमंत्रण देणारे प्लॅस्टीक आयुष्यातून संपूर्ण हद्दपार करण्याशिवाय आता पर्याय नाही, असे नेहाताईं तळमळीने सांगतात. यूज & थ्रोच्या जमान्यात वापरून फेकून देण्याच्या वस्तूतही ष्लॅस्टीकच्या पातळ फिल्मचा वापर केलेला असतो. अशा कृत्रिम कागदी कपात गरम चहा पिणे किंवा अशा प्लेटमध्ये गरम अन्न खाणे, हे प्रकृतीला उपायकारक आहे. नकळत या रासायनिक प्रक्रियेतून आपल्याच शरीरात प्लॅस्टीचा अंश आपण खुशाल मिसळू देतो.
हजारो-लाखो लोक तयार पॅकबंद चटपटीत अन्नपदार्थ खाऊन ती प्लॅस्टीक पिशवी,पाण्याची बाटली हवेत भिरकावून मोकळे होतात. तरंगणा-या या प्लॅस्टीकचा प्रवास पाईप लाईन किंवा ड्रेनेजलाईनपर्यंत पोहचतो आणि तिथेच सुरू होते, एक भयंकर समस्या! पाण्यात विघटीत न होणारे प्लॅस्टीक पाईपलाईनमध्ये आडकून ड्रेनेज तुंबतात. पावसाळ्यात ही समस्या उग्र रूप धारण करते. शहरे पाण्यात बुडतात, पूरात लोक वाहून जातात. तरी आपले डोळे उघडत नाहीत.
जिथे अपरिहार्य असेल तिथे प्लॅस्टीक वापराची वेळ आली तर मी ते आठवणीने रि – सायकलींगला देते, असे सांगताना प्लॅस्टीक निर्मुलन हे अवघड काम सोपे करणारी
‘ पूर्णम इकोविजन ‘ या संस्थेच्या कार्याबद्दल त्यांनी सांगितले. ही संस्था लोकांकडून ‘वेस्ट पॅल्स्टीक’ गोळा करून त्यावर प्रक्रिया तंत्र घडवून आणते. त्यातून प्लॅस्टीकचा पुनर्वापर होतो. त्यामुळेच नैसर्गिक वातावरणात प्लॅस्टीक मिसळून निर्माण होणारा धोका टळतो. ‘प्लॅस्टीक रि सायकलींग’ मोहिमेत प्रत्येकाने सहभागी होणे अनिवार्य आहे, असे नेहाताईंचे सांगणे आहे.
मुलांची हरीत सेना- आशेचा नवा अंकूर:
डाॅ. नेहा देशपांडे गरवारे काॅलेजमध्ये प्राध्यापिका आहेत. काॅलेजने त्यांच्या या पर्यावरण कार्याला भरपूर प्रोत्साहन दिले. ‘ग्रीन ऑडीट कमिटी’ सदस्य म्हणून त्यांची नेमणूक केली. समितीच्या माध्यमातून त्यांना भरीव आणि रचनात्मक काम करता आले. पर्यावरणा विषयक अनेक उपक्रम राबवून समाजापर्यंत पोहचवण्याचे कामही साध्य झाले.
याशिवाय, कंपोस्टींगचा मोठा प्लाॅन्ट ‘पर्यावरण संरक्षण गतीविधी’ मार्फत उभा करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. आज मितीला यातून दहा टन खत निर्मिती होते. या क्षेत्रात काम करणारे समर्पित कार्यकर्ते विवेक देशपांडे यांच्या मार्गदर्शनात नेहाताईंचे विद्यार्थी आणि पालकही पर्यावरण जागृतीच्या कामाशी जोडले गेले आहेत. त्याचबरोबर मएसोची बालशिक्षण संस्था तसेच राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळा या संस्थेत विशेष प्रतिनिधी , ‘महामात्र’ म्हणून काम करताना उत्साही विद्यार्थ्यांची हरीत सेना नेहाताईंना हताशी मिळाली. लहानपणीच जर पर्यावरणाचे महत्त्वं समजले तर ही मुले मोठी होऊन निसर्गाचा आदर करतील. म्हणून ‘हरीतसेना’ हा त्यांना आशेचा नवा अंकूर वाटतात. कारण सेनेची मुले कागदाच्या पिशव्या तयार करून भाजीवाल्यांना देतात, तेव्हा प्लॅस्टीक टाळण्याचा संदेश लोकांच्या मनावर प्रभावीपणे ठसतो. याशिवाय, टाकाऊ वस्तू, रद्दी, जुन्या जिन्स अशा वस्तू गोळा करून ‘टाकाऊतून टिकाऊ’ वस्तू बनवून त्या गरजू व्यक्तींना पुरवणे या मोहिमेत विद्यार्थ्यांचा कृतीशील सहभाग खूप बोलका असतो.
याशिवाय आमच्या ‘क्रीडा करंडक’ या उपक्रमात आम्ही मुलांसाठी खाणे पिणे या सर्व गोष्टींसाठी नैसर्गिक घटकांपासून बनवलेल्या वस्तूचा वापर करतो. स्पर्धेत सहभागी झालेल्या हजारो विद्यार्थ्यांना आपोआप हा संदेश पोहचतो. नंतर तेही सहजतेने अशाच वस्तू आपल्या आयुष्यात वारपण्यास प्राधान्य देतात. यांचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे या मुलांचे पालकही नकळतपणे या मोहीमेत सहभागी होतात.
पर्यावरणाची हानी आणि लोकसहभाग कमी:
पर्यावरण संरक्षण आणि त्याची लोकमानसात जागृती करणे हे फार चिकाटीचे आणि दीर्घकालीन काम आहे. ज्या प्रमाणात आज पर्यावरण समस्या ‘आ’ वासून ऊभ्या आहेत, त्यामानाने या कामाला मिळणारा प्रतिसाद फारच अल्प आहे. काही निसर्गप्रोमी समूह , व्यक्ती आणि संस्था यात झटून काम करीत आहेत, पण त्यांना लोकांचा हवा तसा भरभरून प्रतिसाद नाही. प्रदर्शने, प्रात्यक्षिके असे उपक्रम जेव्हा होतात तेव्हा लोकांचा मिश्र प्रतिसाद असतो. दुषित हवा, पाणी, अन्न यातून आपल्या शरीरात इतके विष पसरते आहे. परंतु त्यावरचे उपाय आणि मार्ग सांगितल्यावर ” याचा खरंच उपयोग होईल का..” अशी शंका लोक उघडपणे व्यक्त करतात. अर्थात अशा शंका तेव्हाच निरसन होतील, जेव्हा लोक स्वतः नैसर्गिक साधनांचा वापर करतील. पर्यावरणाची क्षणोक्षणी होणारी हानी आणि त्यातून होणारे भयंकर परीणाम याची जाणीव लोकांमध्ये निर्माण व्हावी यासाठी खूप मोठ्या प्रयत्नांची गरज आहे. आम्ही कार्यकर्ते जेवढे सध्या काम करतोय, तेवढं पुरेसं नाही. काही बाबतीत धोक्याची पातळी ओलांडून आपल्या हातून वर्तन घडते आहे. ते थांबवण्यासाठी तातडीने काही गोष्टी करायला हव्यात.
उदा. वाढती वाहनसंख्या:
प्रत्येक घरी आजकाल चार दोन वाहने असतात. दुचाकी चारचाकींचा हा प्रताप प्रदुषणाला मोठा आडथळा ठरतो आहे. एकतर भयानक वाहतुक कोंडी आणि दुसरे हवेचे बेसुमार प्रदुषण, हाॅर्नचे कर्कश्य आवाज अशी तिहेरी संकट मालिका टाळायची असेल तर एकत्रित प्रवास किंवा पब्लीक ट्रान्सपोर्टचा वापर या गोष्टी ठरवून, कटाळाने कराव्या लागतील.
ऑनलाईन वस्तू मागवणे:
आजकाल हे फॅड वाढले आहे. लोकांना ते सोयीस्कर वाटते. पण एका वस्तूंचे शिपींग, त्याच्या पॅकेजिंगची खोकी यामुळे प्रदूषणास कारणीभूत होईल असे वर्तन आपण करीत आहोत. कारण यातून कृत्रिम घटकांचा विघटीत न होणारा मोठा कचरा तयार होतो. पॅकींग घट्ट होण्यासाठी वापरलेली प्लॅस्टीकची पांढरी पट्टी खूपच धोकादायक ठरते. फेकून दिलेल्या कच-यातून रस्त्यावर येणा-या या दोरीमुळे लहान मुले, वृध्द किंवा वाहन चालक पाय आडकून पडतात. अपघात होतो. शिवाय पुढे जाऊन हिच पट्टी ड्रनेजला आडथळा करते.
रासायनिक वस्तूंचा वापर;
आपल्या रोजच्या जीवनात साबण, शाम्पू, औषधे, सौंदर्य प्रसाधने, कृत्रीम धाग्याचे तयार कपडे यातून रासायनिक वस्तूंचा अति वापर आपण घडोघडी करीत आहोत. तो सतर्क राहून टाळायला हवा. या वस्तूंच्याद्वारे होणारे प्रदूषण प्रकृतीला थेट हानी पोहचवते हे लक्षात घेतलेच पाहिजे. नाही तर या वरवर आकर्षक आणि सुंदर दिसणा-या वस्तूंची भयावह कुरूप बाजू दिसणारच नाही.
लघुपटातून जनजागृती:
कुठलीही जनजागृती करायची असेल तर उपदेश, व्याख्याने यापेक्षा लघुपटासारखे दृश्य माध्यम जास्त प्रभावी ठरते. ‘सालमन मासा’ सारख्या लघुपटातील प्रदूषित पाण्यातल्या माशाची घालमेल किंवा ‘अवकारिका’ माहितीपटातील कचरा वेचणा-या लोकांच्या वेदना पाहून लोकांच्या पर्यावरण विषयक जाणीवांना हात घातला आहे. असे भावनांना हात घालणारे परीणाम प्रबोधनपर लघुपटातून नकळत साधता येतील.
गार्बेज इव्हेंट:
पर्यावरण जागृती मोहीमेतील कार्यकर्ते ‘गार्बेज इव्हेंट’ असा एक उपक्रम आकर्षक पध्दतीने राबवून लोकांचे लक्ष वेधून घेतात. पथनाट्य, गाणी आणि प्रात्यक्षिके या माध्यमातून घातक कचरा, इ-वेस्ट अशा प्रकरच्या रासायनिक गोष्टींची विल्हेवाट योग्य त-हेने लावण्याचे शिक्षण मिळते. पर्यावरण संरक्षणाचे काम पुढे नेणारा हा संदेश लोकांपर्यंत थेट पोहचतो. अशाच संदेशातून सर्व सामान्य व्यक्तीच्या मनात पर्यावरण संरक्षणाचे भान जागे होईल. यातूनच एक लोकचळवळ निर्माण होईल, असे खात्री नेहाताईंनी व्यक्त केली.
लोकांचा प्रतिसाद कसा मिळवावा:
लोकांचा प्रतिसाद कसा मिळवावा, हा मोठा प्रश्न आहे. पण प्रश्नांना उत्तर शोधणे हेच आपले काम आहे. ‘अमृत प्रकृती वंदना’ या गतीविधीतून असे प्रयत्न जोमाने सुरू आहेत. त्यास प्रतिसादही मिळतो आहे. आपला समृध्द निसर्ग, जैव विविधतेने नटलेली जिवंत सृष्टी याचे महत्वं ‘अमृत प्रकृती वंदना’ या गतीविधीतून लोकांच्या मनावर ठसवले जाते. प्लॅस्टीक टाळणे, टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करून कागदी,कापडी, लाकडी वस्तूंचा दैनंदिन व्यवहारात उपयोग कसा फायदेशीर आहे, हे मनावर बिंबवण्यासाठी प्रात्यक्षिकांसह व्याख्याने घेतली जातात. या कामी तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभते. पॅकबंद पाण्याची बाटली टाळून स्वतःजवळ घरचे शुध्द पाणी बाळगणे, विषमुक्त अन्नधान्य आणि फळे-भाजीपाला हे थोडे महाग वाटले तरी आरोग्य रक्षणासाठी त्यांचाच आवर्जुन आहारात समावेश करणे, या गोष्टी सोदाहरण पटवून दिल्या जातात.
मी स्वतः वैयक्तीक पातळीवर माझ्या वागण्यातून नैसर्गिक वस्तूंचा प्रचार करीत राहते. उदा. मी पर्समध्ये पाण्याची बाटली आणि स्टीलचा एक फोल्र्डींग ग्लास बाळगते. कुठेही बाहेर चहाकाॅफी प्यायची वेळ आली तर गाडीवर किंवा कॅन्टीनमध्ये कागदी ग्लास न वापरता स्वतःचा पेला पर्समधून काढते. ते पाहून लोक कुतुहलाने चौकशी करतात, तेव्हा ही आयती आलेली संधी मी सोडत नाही, लगेच कृत्रिम वस्तूंच्या वापरातवे धोके सांगून मोकळी होते.
घरी कुणी पाहुणे आले, की घरातल्या फुलदाणीतली ताजी टवटवीत फुले पाहून लोक कौतुक करतात. लगेच त्यांना नेऊन माझी बाग दाखवते. झाडावेलीवरचे एखादे फळ-फुल, भाजी, भेट म्हणून देते. घरच्या बागेतली ताजे लिंबू-मिरची समोरच्यावर जादू करतात. आपणही अशी टेरेस गार्डन फुलवावी असा विचार त्यांच्या मनात रूजतो, आणि तिथेच माझे काम होऊन जाते. कुणाच्याही घरी जाताना माझ्या हरीत सेनेच्या मुलांनी बनवलेल्या कागदी पिशवित भाजी, फुले घालून भेट देते. देताना त्याची सविस्तर कहाणी सांगते. ऐकून लोक आश्चर्यात पडतात.तिथेच माझे काम होते. बागेतल्या पोपटी ताज्या पानातले हरितद्रव्य बघणा-याच्या मनात एक आशावाद जागवते. निसर्गाचा हा मेवा, ठेवा म्हणून जपण्याची खूणगाठ मनोमन बांधली जाते. लोकप्रतिसाद असाच छोट्या छोट्या कृतीतून मिळवावा लागेल. यातूनच पर्यावरणाचे प्रेम सर्वत्र जागेल. असेच ‘शुध्द पर्यावरण’ या स्वप्नाचे बीज हजारो मनात रूजावे आणि लाखो हात पर्यवरणाच्या कामात लागावेत, हेच माझे ध्येय आहे.
नवरात्रात व्हावा ‘प्रदूषण’राक्षसाचा नाश:
नवरात्र संपताना सीमोल्लंघन करून प्राचीन काळी जशी युध्दाची मोहीम सुरू होत असे, तसे आजच्या काळात प्लॅस्टीक, थर्माकोल अशा विघटीत न होणा-या वस्तूंचा वापर टाळून निसर्ग रक्षणाची मोहीम युध्द पातळीवर प्रत्येकाने राबवली पाहिजे, तरच आपल्या पुढच्या पिढीला मोकळा श्वास घेता येईल. शुध्द अन्नपाणी आपल्या पोटात जाईल. दस-याला रावण दहनाची प्रथा आहे. त्यानुसार रावणासारख्याच दहा तोंडाच्या ‘प्रदूषण’ नावाच्या राक्षसाचा नाश आता दुर्गेचा अवतार धारण करून महिलांनीच करायला हवा, अशी अपेक्षा नेहाताईंनी व्यक्त केली. कारण घरातली स्त्री हिच कुटूंबाचा केंद्रबिंदू असते. तिने निश्चय केला तर घरात प्लॅस्टीक येणार नाही. कागदी, कापडी, लाकडी किंवा मातीच्या वस्तूंचा वापर करणे तिच्याच हातात आहे. केमीकलयुक्त वस्तूंना ठामपणे नकार दिला तर घरातले इतर सदस्य आपोआप ऐकतील. छोटे प्लॅस्टीक सॅचेट वापरून उपद्रवी कचरा करण्यापेक्षा मोठ्या बाटलीतील उत्पादने वापरण्याची पध्दत घरात प्रचलीत करावी.
पर्यावरण संरक्षणाचे काम स्रिया अधिक सक्षमपणे करू शकतात, असा विश्वास व्यक्त करून नेहाताईंनी महिलांना संदेश दिलाय की, हळदीकुंकू समारंभ, घरातले सण-वार यामध्ये आवर्जुन नैसर्गिक उत्पादनेच खरेदी करून वापवित. कन्या पूजन, सबाष्णवाण अशा प्रसंगी भेट वस्तू देताना झाडांची रोपे किंवा अशीच छानसी कोण नैसर्गिक वस्तू द्यावी. पाहुण्यांना प्रसाद देताना, खाण्यापिण्याच्या प्लेट, ग्लास , वाट्या -द्रोण या वस्तू केळीचे सूत, झाडपानांनी बनवलेले आणावेत. अशा कृतीतून स्वतःच प्रदूषणाचा हा दुष्ट राक्षस निर्दालन करण्याचा विडा उचलावा. अशी ठोस भूमिका घेऊन काम केले तर पर्यावरण चळवळीत नारीशक्तीचा वाटा उद्या सर्वात मोठा असेल, असा अशावाद मांडून नेहाताईंनी संवादाचा समारोप केला.
नेहाताईंच्या या संवादातून जाणवले की, त्यांच्यासारख्या समर्पित पर्यावरण कार्यकर्त्यांची समाजाला फार गरज आहे. या नवरात्र महोत्सवात त्यांचे जिवंत अनुभव ऐकून प्रत्येक स्त्रीमध्ये एक प्रबळ अंतरिक शक्ती जागी व्हावी, आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन निसर्ग रक्षणाच्या मोहीमेत अनेकींनी सामील व्हावे.
अमृता खाकुर्डीकर,पुणे



