मालेवाडा येथील शेतक-याची शेतात गळफास घेऊन आत्महत्या
रजत डेकाटे प्रतिनिधी
मालेवाडा येथील शेतक-याची शेतात गळफास घेऊन आत्महत्या
मालेवाडा (दि ७) : भिवापूर तालुक्यातील पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मालेवाडा शिवारात शेतक-याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. दिलीप कुंडलिक जाधव रा. मालेवाडा (५०) असे मृताचे नाव आहे. दिलीप हा (दि. ६) रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास घरच्यांना शौचालयाला जातो असे सांगून घराबाहेर पडला. त्यानंतर तो दिवसभर कुणालाही दिसला नाही. शोधाशोध करूनही त्याचा ठाव ठिकाणा लागला नाही. गावकऱ्यांनी संपूर्ण शेत शिवार शोधले, पण त्यांना दिलीप कुठेही आढळला नाही.
मयत दिलीप यांच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती. हलाखीच्या परिस्थितीत हे कुटुंब दिवस काढत होते. दिलीप यांना पत्नी मंजूषा व दोन मुले आहे. मध्यंतरी व्हिडिओ व्हायरल प्रकरण मालेवाडा येथे चांगलेच गाजले होते. त्या प्रकरणात दिलीप यांच्या दोन मुलांचा समावेश होता. स्थानिक पोलीसांनी दिलीप यांच्या दोन्ही मुलांना सूचना पत्राच्या आधारावर सोडले होते. यात सूत्रांच्या आधारे पोलीस यंत्रणेचा दबाव असल्याची माहिती मिळाली आहे.
दोन्ही मुले व्हिडिओ व्हायरल प्रकरणात अडकल्याने दिलीप जाधव नेहमी निराश असायचे. हीच चिंता त्यांना नेहमी सतावत होती. ते सतत नैराश्यामय आयुष्य जगत होते. दिलीप दुसऱ्यांकडे शेतीच्या कामाला नेहमीप्रमाणे जाऊन कुटुंबाचा उदारनिर्वाह करत होता. आज (दि ७) रोजी शेतात दुपारी त्यांचा मृतदेह झाडाला लटकल्याचे गावक-यांच्या निदर्शनास आले. मृतदेह शवच्छेदनासाठी भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.



