अशीही एक खंत
सौ. स्वाती मराडे-आटोळे

अशीही एक खंत
लहान होतो… नातीगोती तशी कळतही नव्हती. तेव्हा मी चार पाच वर्षांचा असेन. शेजारी एक कामानिमित्त कुटुंब आलेलं. त्यांच्या कुटुंबात तिघेच. ते दोघे त्यांची तीन चार वर्षांची गोड मुलगी. मित्र- मैत्रीण, बहीण-भाऊ ही नाती कळण्याचे वय नव्हतेच. पण थोड्याच दिवसात माझी आई व तिची आई मैत्रिणी झाल्या. अन् माझंही प्रमोशन झालं. मी त्या मुलीचा दादा झालो नं..! म्हणजे बघा हं.. इतक्या लहान वयात मला मैत्रीण मिळण्याचा चान्स होता पण आमच्या आयांनी तो पार धुळीला मिळवला. झालं त्या लहान वयातही मला मैत्रीण मिळाली नाही.
पुढे पहिलीत प्रवेश झाला.अनेक गोड मुली वर्गात आल्या. दंगामस्ती करण्यात नंबर माझा असायचा. तसाच मदतीलाही सदैव तयार असायचा.. मुलगा असो, मुलगी असो सगळ्यांनाच मदत करायला असायची माझी घाई. तुम्ही सगळे बहीण भाऊ असं म्हणायच्या बाई. मुले सगळी मित्र म्हणायची, मुली मात्र भाऊ..रक्षाबंधन आलं की हातावर राखी बांधायला जागाच उरायची नाही. काय भारी वाटायचं ते तेव्हा.. तेव्हाही कळलं नाही बरं.. आपल्याला मैत्रीणच नाही.
मग प्रवेश झाला हायस्कूलला, कधीतरी डोक्यात यायचा विचार, सगळ्यांचा मी भाऊ… मग मैत्रीण कधी मिळणार? शाळेत होतो आम्ही हिरो, मुली होत्या वर्गात भारी. पण म्हणायच्या, “भाऊ” अगदी रोज साऱ्या. “भाऊ, पेन दे”, “भाऊ, वही उघड”, “भाऊ, अभ्यासाकडे बघ, नको बडबड!” सगळं ऐकलं, समजून घेतलं, पण मनाचं एक कोपरं मात्र ओकंबोकं राहिलं. मग फ्रेंडशिप डे ला गिफ्ट दिलं, ती म्हणाली, “तू तर माझा ‘बिग ब्रदर’ ना! तरीही हसत हसत दिलखुलास दिलं!”. बस्स… पुन्हा कधी धाडस नाही केलं, मैत्रिणीचं स्वप्न तिथंच गुपचूप गाडून टाकलं.
आजही वाटतं, कोणीतरी म्हणावं, “अरे मित्रा, तू माझा खास मैत्रीचा साथी!” पण काय सांगू, नियतीचीही मजा भारी, भाऊ झालो साऱ्यांचा, पण ‘कोणीच मैत्रीण’ मात्र नाही.. आहेत आठवणी आजही ताज्या,त्या वर्गाच्या, मुली होत्या गोड, निरागस स्वभावाच्या. पण प्रत्येकीने नाव दिलं ‘भाऊ’. मैत्रीची ओढ, मनात खोल कुठेतरी, गप्पा, खोड्या, हसू… पण कमी काहीतरी. जीवनात एक ‘मैत्रीण’ हवी होती खरी. मनात उरते कधी कधी ती गूढशी खंत, ‘कधी तरी एखादी मैत्रीण होईल का, घेऊन थोडी उसंत?’ मनातलं सर्व काही ओळखणारी मात्र जिथं चुकलो तिथं हक्काने रागावणारी..!
( फ्रेंडशिप डे निमित्त मनात आलेली अशीच एक कल्पना..)
सौ. स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध





