नाव आणि टोपण नाव
सौ अनिता अनिल व्यवहारे
नाव आणि टोपण नाव
नावात काय आहे, शब्दांचा खेळ सारा
शिवबा म्हणता झळकते तेज
औरंगजेब म्हटलं की हिंसेचा पसारा
इंग्रजी नाटककार शेक्सपियरच्या रोमिओ जुलीएट’ या नाटकात एक वाक्य होतं की,नावात काय आहे?” त्यात ज्यु म्हणते की,नावात तरी काय आहे? ‘गुलाबाला दुसरे नाव दिले तर त्याचा सुगंध तसाच दरवळत राहील’
यानंतर याच्यावर भरपूर उहापोह झाला, बरेच निष्कर्ष निघाले. अमर नावाची व्यक्ती अल्पवयात मरण पावते,नकोशी नावाची व्यक्ती कधी कुणाकुणाला हवीहवीशी वाटते. तर लक्ष्मी नावाची भिकारीण भेटते तेव्हा या वाक्यात तथ्यता जाणवायला लागते.
नांव हे जरी ओळखीचं साधन असलं तरी व्यक्तीच्या कर्मावरून किंवा कार्यावरूनच त्याची पारख होते, पण मग फार विचार केला तर असं वाटतं की, नावा मागं खरं तर भावना दडलेली असते, त्यामागे एक इतिहास असतो.
लहानपणी जेव्हा आपल्याला एखादं nav दिलं जातं,ते केवळ उच्चारासाठी किंवा संवादासाठी नसतं तर त्यामागे आई-वडील आत्या मामा अर्थात आप्तेष्ट यांच्या आशा अपेक्षा आपली संस्कृती आणि परंपरा यांचा संगम असतो. एखाद्या देव-देवतेच्या संत महंत किंवा एखादी थोर, महान व्यक्ती यांच्या वरूनही आपले नांव ठेवलेलं असतं. त्यामुळे नां व हा केवळ एक शब्द नसून तो एक वारसा असतो त्यामागे कथा असते, एक इतिहास असतो. जन्मदिन, जन्म नक्षत्र,जन्मवेळ यावरून ही आपल्याकडे नांव ठेवण्याची प्रथा आहे. आपल्याला जे नांव दिलं जातं त्या नावाच्या व्यक्तीने त्या दिलेल्या नावाला आपल्या कृतीतून कर्तुत्वाचा साज चढवायला हवाय. आपलं नाव हे ओळखी पुरतं मर्यादित न ठेवता ते आपल्या आत्मविश्वासाचं, व्यक्तिमत्त्वाचं प्रतीक बनवायला हवंय. अन्यथा शेक्सपियरचा नावात काय आहे? हा प्रश्न आजही विचार करायला भाग पाडतो.
हे झालं नावाबाबत आणि मग टोपण नावाचं काय? मूळ नावा व्यक्तिरिक्त एखाद्या व्यक्तीला काही ठिकाणी ओळख मिळवलेलं दुसरं नाव किंवा कोणी प्रेमान,गंमतीने,चेष्टेने किंवा विशिष्ट गुणधर्मावरून दिलं जातं ते नांव… अर्थात ते ज्याला दिलं त्याला आवडतं ही…. पण काही महाभाग असे असतात की ते व्यक्तीच्या व्यंगावरून, रंग रूपावरूनही टोपण नाव देतात. ते मात्र चुकीचं असतं. टोपण नाव हे देखील त्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो.त्या त्या माणसाचं खास वैशिष्ट्य, त्याच्यावरील प्रेमाची किंवा आदराची झलक असते. त्यात त्याचे कौशल्य दडलेलं असतं जसं की,, एखादा मुलगा खूप छान क्रिकेट खेळत असला तर आपण सहज त्याला *सचिन*,*विराट* या टोपण नावाने हाक मारतो. गोड आवाजाची मुलगी असेल तर *लता मंगेशकर*, *गान कोकिळा* असं आणि मग हे साहजिकच समोरच्याला आवडायला लागतं.
हा सगळा नाव आणि टोपण नावावर चा हा सगळा लेखन प्रपंच मांडण्याचं कारण एवढंच की मी पेशाने एक शिक्षिका आणि मला एक सवय होती की पाचवीच्या वर्गात नवीन मुलं आले की, एखाद दोन मुलांना माझ्याकडून सहजच टोपण नांव दिले जायचं. ते त्या मुलांच्या वागण्यावरून वैशिष्ट्यावरून कधी दिसण्यावरून,बोलण्यावरून… आणि त्या मुलाला ते आवडायचं ही. त्याला ते आवडलं की, ते नांव तो फक्त शाळेत असेपर्यंतच नव्हे तर त्याच्या कुटुंबात मित्र-मैत्रिणीतही रूढ होऊन जायचं. एवढेच नव्हे तर त्याची ओळख होऊन जायचं.आणि कधी कधी तर मी स्वतः देखील त्याचं नाव विसरून जायची. आज त्यातली काही मुलं सोडून गेलेली, मोठी झालेली पण ती मला भेटली तर त्यांची टोपण नावानेच ओळख सांगतात. शांती,,काशी,भानामती स्वीटी,ऐश्वर्या लाडू, मोदक पिल्लू चिमणी, स्वीटी अशी अनेक नावे मुलांना दिली आणि ती त्यांना आवडली सुद्धा.इतकंच नव्हे तर ही मुलं जेव्हा नवीन येणाऱ्या मुलांना सुद्धा हे सांगतात तेव्हा नव्याने प्रवेश घेतलेली काही मुलं मला म्हणाय,ची मॅडम,मला पण द्या ना… एखादं नांव! त्यावेळी कौतुक आणि आश्चर्य या भावना मनात यायच्या.
एकदा असंच झालं दोन सख्खे भाऊ पाचवीला आमच्या शाळेत आले त्यातील मोठा भाऊ इतका सालंस, हुशार. त्याला माझ्या शाळेतील एक शिक्षक जे की विद्यार्थी प्रिय मन मिळाऊ आणि विद्यार्थ्यांचे कौतुक करणारे.. त्यांनी त्याला सहज नाव दिले स्वामी
आणि काही दिवसांनी त्याच्या छोट्या भावाला मी समर्थ म्हणून संबोधलं आणि मग काय आश्चर्य! ती स्वामी-समर्थ नावाची जोडी रूढ झाली.
अजूनही त्यांची खरी नावे आम्हाला लवकर आठवत नाही. इतकच काय तर व्हाट्सअप मध्ये माझे वेगवेगळे समूह आहेत. त्यात मी माझ्याकडून काही व्यक्तीला सहज नाव पाडून गेलं आणि ते रूढ झालं. ज्ञानाग्रज दादा, स्मितहास्यकारा व बा गजानना, छोटी दीदी बडा धमाका असं बरच काही…असो
आज साप्ताहिक साहित्यगंधासाठी काहीतरी लिहायचं होतं विषय सापडत नव्हता आणि मग वाटलं नावावर तर बऱ्याच जणांनी लिहिलेलं असेलही. आपण नांव आणि टोपणनांव यावर लिहावं.. वाचून तुम्हाला आवडेल की नाही हे माहीत नाही पण माझ्या लेखणीतून कागदावर उतरवलं पण खात्री आहे मला वाचलं तर तुम्ही तर प्रतिक्रिया द्यायला विसरणार नाही..
सौ अनिता अनिल व्यवहारे
ता. श्रीरामपूर जि अहिल्यानगर



