प्रेमा तुझा रंग असा: भावरंगात रंगलेला; वृंदा करमरकर
सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परीक्षण
प्रेमा तुझा रंग असा: भावरंगात रंगलेला; वृंदा करमरकर
सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परीक्षण
प्रेम हे देवानं दिलेलं अमोल वरदान आहे.खऱ्या प्रेमात त्याग असतो. प्रेम हृदयाची भाषा बोलतं, जी कुठल्याही भाषेपेक्षा अधिक प्रभावी असते.प्रेमात असणारा विश्वास नात्याला मजबूत करतो. प्रेम दुःखात आशा देतं आणि एकटेपणात साथ देतं.ते केवळ देहाशी जोडलेलं नसतं, तर आत्म्याच्या गाभ्याशी जुळलेलं असतं.खरं प्रेम निरपेक्ष, निस्वार्थी असतं.
प्रेमाचे अनेक रंग असतात — कोवळ्या उन्हासारखा सोज्वळ, कधी आसमंतासारखा गहिरा, तर कधी अंधारासारखा वेदनादायक.”प्रेमा, तुझा रंग असा” असं म्हणताना प्रत्येकाच्या मनात वेगवेगळं चित्र उभं राहतं. कारण प्रत्येकाचं प्रेम वेगळं असतं, त्याची अनुभूती वेगळी असते.बालपणीचं प्रेम म्हणजे आईच्या कुशीतला शांत रंग – मायेचा. मैत्रीतला प्रेमाचा रंग असतो उत्साही आणि खेळकर निरागस हास्याच्या रंगछटांनी भरलेला.तर युवावस्थेतील प्रेम अगदी पहिल्या पावसा सारखं नवथर – नवलाईनं भरलेलं, थोडंसं भिजलेलं आणि कधी कधी धूसरही. त्यात आकर्षण आहे, भावना आहेत, थोडं गोंधळलेपण आहे… पण त्या प्रेमात हृदयाची स्पंदनं वाढवणारं काहीसं अनामिक आकर्षण असतं.
प्रेमाची अनेक रुपं असतात. आईचं आपल्या लेकरांवरचं प्रेम, भावबहिणींचं प्रेम, मित्र प्रेम, पती पत्नीतील प्रेम. आईचं प्रेम निरपेक्ष असतं.श्रीराम आणि भरत यांचं बंधुप्रेम अलौकिक.चौदा वर्ष श्रीरामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून भरतानं राज्य कारभार केला. लक्ष्मण आणि रामाचं प्रेम तर सर्वश्रुत आहे. कृष्ण -सुदामा यांच्यातील मित्रप्रेम. सुदाम्याच्या मूठभर पोह्यांनी तृप्त होणारा हा द्वारकाधीश आपल्या मित्राला न मागता सारं ऐश्वर्य देतो.गोपगोपिकांचं श्रीकृष्णा वरील प्रेम त्यागमय होतं. राधाकृष्ण यांचं अद्वैत साधणारं प्रेम. मीरेची मधुरा भक्ती आणि त्या भक्ती प्रेमात आकंठ बुडालेला श्रीहरी.त्या प्रेमाच्या अलौकिकतेतून विष मीरेनं प्यालं आणि श्री हरी निळासावळा झाला.
आता भर पावसात पंढरीला जाणाऱ्या हजारो वारकऱ्यांच्या भक्ती पुरात विठूराया नाहून जातो. हे अबीरानं गंधित झालेलं भक्ति प्रेम.आपले जवान रात्रंदिवस सीमेचं रक्षण करतात. उन्ह,वारा पाऊस,कडक गोठवणारी थंडी यांची ते तमा करत नाहीत. केवळ देशप्रेमातून हा अपार त्याग जन्म घेतो.मदर तेरेसा यांनी याच प्रेमभावनेतून समाजसेवा केली. बाबासाहेब आमटे, प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटे,सिंधुताई सपकाळ हे सर्वजण ज्या अंतरीच्या कळवळ्यातून समाजसेवा करतात ते निस्वार्थी प्रेम अक्षरश: अनुपमेय आहे. त्यागाचा रंग ल्यायलेलं.शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं.त्या स्वराज्याच्या प्रेमापोटी,शिवरायां वरील निष्ठेसाठी प्राण पणाला लावणारे मावळे,यांचं प्रेमसुध्दा अलौकिकच.
अजून एक प्रेम, एकतर्फी. हे फारसं चांगलं नसतंच.कारणहे स्वार्थाचं टोक गाठून आपल्या प्रेमिकेची हत्या करतं.हे रक्तरंजित प्रेमच असतं का या विषयी शंका येते. प्रेमाचा रंग कसा याचा विचार करताना जशा भावना तशा रंगात प्रेम रंगतं.कधी सकाळ चा कोवळा गुलाबी रंग तर कधी सौंदर्याचा सोनेरी रंग लेवून प्रेम येतं.प्रियकर प्रेयसी या रंगात रंगून जातात.त्यागाचा केशरी रंग कधी ते पांघरतं तर कधी मातृप्रेमात चिंब भिजतं. भावंडांच्या रंगबिरंगी प्रेमात नाहतं तर कधी भक्तीरसात आकंठ बुडतं.प्रेम निळ्या आकाशासारखं विशाल आणि सागरासारखं गहिरं असतं. आजच्या ‘काव्य त्रिवेणी’ स्पर्धेसाठी आदरणीय राहुल सरांनी दिलेला ‘प्रेमा तुझा रंग असा’ हा वैचारिक विषयचिंतन करावा असा आहे. शिलेदारांनी स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
वृंदा(चित्रा)करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह



