संसारातून परमार्थ
तृप्ती पाटील मुलुंड (इस्ट), मुंबई

संसारातून परमार्थ
संसारी असलेल्या व्यक्तींनी आपली सर्व कर्तव्य उत्तम करावी. आपला व्यवसायही प्रामाणिकपणाने करावा. कुठेही लांडी लबाडी करू नये. संसारी मनुष्याने धर्माप्रमाणे वागावे. जो मनुष्य धर्माला मानत नाही, ‘अ’धर्माप्रमाणे वागतो त्याची अधोगती होते. स्त्रियांनी आपली दैविक शक्ती टिकून ठेवावी. जर दैविक शक्ती स्त्रियांनी टिकवली नाही, तर तिचा व्याभिचार वाढतो आणि स्त्रियांचा व्याभिचार वाढला; तर समाजाची अधोगती होते. संसार करत असताना गुरु, ईश्वर आणि घरातली मोठी माणसे यांना अंतर देऊ नका. त्यांच्यावर पण प्रेम करा, श्रद्धा ठेवा. आपलं मन ईश्वराठाई ठेवावे. प्रत्येक कर्म हे कर्तव्य बुद्धीने करावे. तसे तर संसारी माणसाला तसा व्याप खूप असतो. पैशांचा व्याप, मुलांचा व्याप, बाहेरच्या लोकांचा व्याप, व्यवहाराचा व्याप. पण मनुष्याने त्या सर्व गोष्टी सहन करत आपलं जीवन जगावं.
कर्म करत असताना मनामध्ये ईश्वर चिंतनाची सवय ठेवायची. दारूमध्ये, परस्त्री, सुखाचे व्यसन, पर पुरुषाचे व्यसन मनुष्याने ठेवू नये. जितकं तुम्ही नामस्मरण करत राहाल, तितके तुमचे कर्म उत्तम होत जातील. प्रारब्ध्याच भोग नष्ट होतील. स्त्रीने आपलं मांगल्य, सौम्यता, मृदुता, कोमलता हे जे देवांने गुण दिलेले आहेत, त्या गुणाचं रक्षण करावे. त्या स्त्रीच्या गुणांनी पुरुषांची शक्ती वाढते. म्हणजे जी स्त्री पतीव्रतेचे पालन करणारी असेल, अव्याभिचारी असेल तर तिच्या दैविक शक्तीने पुरुषांची शक्ती वाढते आणि ती खऱ्या अर्थाने त्या पुरुषाची धर्मचरणी होते. स्त्रीला पुरुषांनी योग्य मानसन्मान दिला पाहिजे. तिला शांत आनंदी समाधानी ठेवलं पाहिजे. आई-वडिलांची सेवा करून त्यांच्या ऋणातून मुक्त झालं पाहिजे. गुरु सेवा करावी. समाजसेवा करावी. धार्मिक संस्थांना जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करावी. “धर्म म्हणजे अंधश्रद्धा नाही, तर धर्म म्हणजे शुद्ध व स्वच्छ नितीन नियमांचे आचरण करणे होय.”
आपले आचार विचार शुद्ध असावे.देवावरती विश्वास ठेवला पाहिजे. देवावरती प्रेम केलं पाहिजे. मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजेत. मुलं जर कोणत्या वाम मार्गाला लागलेली असेल तर त्यांना त्यातून काढलं पाहिजे. संसारी माणसाने उपास तापास केले नाहीत तरी चालतील. पण आपलं कर्म जास्तीत जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न करावा. जी स्त्री आपल्या दैविक शक्तीचा वापर धर्माचे पालन करण्यासाठी करते. ती स्त्री सर्वगुण संपन्न असते. संसारी माणसाने कोणाला फसवू नये, लुबाडू नये, कोणाच्या ऋणानुबंधनांमध्ये राहू नये. जे आपलं कर्म असेल ना ते कर्म उत्तम करावं आणि ते कर्म करत असताना ईश्वराचा नामस्मरण करावं. दान धर्म जास्तीत जास्त करत राहावं. रागाच्या भरामध्ये कोणाला पण अभद्र बोलू नये. संसार करत असतांना दुसऱ्याचा संसार उध्वस्त करू नये हे नियम मात्र तंतोतंत पाळावे. संसार करत असताना मनुष्य हा देवधर्म करतो. पण देव धर्म करत असताना ईश्वराकडून मनुष्याने काहीही अपेक्षा न करता भक्ती करावी. निष्काम भावनांची भक्ती जर संसारी मनुष्याने उत्तमरीत्या केली.तर त्या मनुष्याला मृत्यूनंतर स्वर्गलोक किंवा मोक्षाची प्राप्ती होते.
ईश्वरावर निष्ठा ठेवणे, ईश्वरावरती प्रेम करणे आणि संतांच्या नियमाप्रमाणे आपले आचरण ठेवणे , सर्वांशी चांगले बोलणे सर्वांशी चांगले वागणे, समाजसेवा करून समाजाचे ऋण फेडणे, इतरांवरती संस्कार करणे. या जर गोष्टी मनुष्याने केल्या तर त्याला मृत्यूनंतर स्वर्गाची प्राप्ती होते. मनुष्याने आपले आचार विचार शुद्ध ठेवावे. जर संसारी मनुष्य संतांच्या वाचनाप्रमाणे वागला, तर धर्म त्याचे रक्षण करेल आणि धर्म ज्याचं रक्षण करतं त्याला आयुष्यामध्ये जरी दुःख आले, तरी पण तो दुःखात न डगमगता आपलं जीवन उत्तमरित्या जगत असतो. कारण, त्याला ईश्वराची भक्कम साथ असते.
तृप्ती पाटील
मुलुंड (इस्ट), मुंबई
=======





